मणिपूरमधील ‘पाऊ शंकर काणे विद्यालय, तमेंगलॉन्ग’ या शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. भैय्याजी काणे यांची मणिपूर येथील विद्यार्थिनी अगुइना हिला दुर्दैवाने कर्करोग झाला. भैय्याजींमुळे आपण शिकू शकलो आणि चांगलं जीवन जगू शकलो, त्यांचे ऋण फेडायलाच हवे, असे तिला सातत्याने वाटे. तिने तिच्या मालकीची जमीनच शाळेसाठी ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ला दान दिली. आज शाळेच्या आवारात भैय्याजी काणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य स्मृतिस्तंभ उभारण्यात आला असून, या लेखात शाळेच्या स्थापनेपासूनची कृतज्ञ भावना आणि मणिपूरमधील या शाळेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
पाऊ शंकर काणे विद्यालय, तमेंगलॉन्ग’ या शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दि. २९ एप्रिल रोजी मणिपूरचे राज्यपाल अजयकुमार भल्ला यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने झाले. ते स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहणार होते. मी त्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रणही दिले होते. परंतु, खराब आणि लहरी हवामानामुळे ते हेलिकॉप्टरने येऊ शकले नाहीत. रस्त्याने प्रवास करणेही धोक्याचे होते. कारण, सुरक्षादले तैनात करावी लागली असती. उद्घाटन समारंभ दि. २९ एप्रिल रोजी का ठरवण्यात आला, यामागे एक दुःखद घटना आहे.
त्याचं असं झालं की, भैय्याजी काणे यांची एक विद्यार्थिनी अगुइना (Aguina) आणि विद्यार्थी विदुंबो (Aguina) हे दोघेही म्हैसूर येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेत होते. अगुइना तमेंगलॉन्गची म्हणजे मणिपूरची, तर विदुंबो नागालॅण्ड्चा. म्हैसूर येथे शिक्षण घेत असतानाच त्यांच्यात प्रेम जमले. घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लग्नही केले. दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. पण काही वर्षे गेल्यावर त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. अगुइना आजारी पडली. वैद्यकीय तपासणीत तिला कॅन्सर झाल्याचे लक्षात आले. दीर्घ काळ उपचार घेऊनही तिचा कॅन्सर बरा झाला नाही. आता केवळ मृत्यूच कॅन्सरच्या यातनातून आपली सुटका करील, हे तिच्या लक्षात आले. तिला सारखी आपल्या गुरुजींची, म्हणजे भैय्याजी काणे यांची आठवण येऊ लागली. भैय्याजींमुळेच आपण शिक्षण घेऊन चांगले आयुष्य जगू शकलो, पण त्यांच्यासाठी मात्र आपण काहीही करू शकलो नाही, याची खंत तिला सतावत असे. निदान मृत्युपूर्वी भैय्याजींचे ऋण आपल्याला फेडायला हवे, असे विचार तिच्या मनात वारंवार येऊ लागले. त्याच सुमारास भैय्याजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ मणिपूरमध्ये शाळा सुरू करण्याचे ठरत होते. तिलाही याची माहिती होती. तिच्या मालकीचा एक जमिनीचा तुकडा होता. ती जमीनच शाळेसाठी ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ला दान देण्याचे तिने ठरवले. तसे मृत्युपत्रही तिने करून घेतले.
मी एकदा मणिपूरला गेलो असता, तिने मला भेटायला बोलावले. भैय्याजींच्या नावे शाळा सुरू करण्यासाठी जमीन दान देत असल्याचे तिने मला सांगितले. ती मला म्हणाली "जयवंत, ही माझी शेवटची इच्छा तूच पूर्ण करू शकशील. तुझ्यावर माझा विश्वास आहे आणि मी तसे मृत्युपत्रही केले आहे.” काही दिवसांनी, म्हणजे दि. २९ एप्रिल २००६ रोजी कॅन्सरच्या वेदना सहन करीतच ती मृत्यू पावली. तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी अशा प्रकारे माझ्यावर येऊन पडली, पुढे अनेक प्रयत्नांती २००९ साली एका साध्या पत्र्याच्या इमारतीत ‘पाऊ शंकर काणे विद्यालया’चा शुभारंभ झाला. ही शाळा उंचवट्यावर होती. त्यात पत्र्याची इमारत. तीही भूकंपाच्या धक्क्यामुळे अधिकच धोकादायक झाली होती. या इमारतीचा ‘शाळा’ म्हणून यापुढे उपयोग करणे, धोक्याचे ठरले असते. म्हणून कायमस्वरूपी मजबूत इमारत बांधणे आवश्यक झाले होते. परंतु, या दुर्गम भागात बांधकाम कोण करणार आणि त्यासाठी निधी कसा जमा करणार, ही एक मोठी समस्या होती. अनेकांच्या भेटीगाठी घेऊन प्रयत्न केल्यावर या दुर्गम डोंगराळ भागात ‘डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन’ (DONER) मंत्रालयाने ‘नॉर्थ ईस्टर्न काऊन्सिल’च्या सहकार्याने शाळेची दुमजली इमारत बांधण्याची योजना आखली. बांधकाम सुरूही झाले. अगुइनाने दान केलेल्या जमिनीवरच ही नवी इमारतही उभी राहिल्याने इमारतीचे उद्घाटन ही दि. २९ एप्रिल या तिच्या स्मृतिदिनीच करण्याचे ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे पदाधिकारी आणि स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी ठरवले.
परंतु मणिपूरमधील हिंसाचार थांबत नव्हता. उलट तमेंगलॉन्ग, सेनापती, उखरुल या जिल्ह्यात हिंसाचाराची व्याप्ती वाढत चालली होती. रस्ते वारंवार बंद पाडले जात होते. अशा स्थितीत उद्घाटन समारंभाच्या पूर्वतयारीसाठी मी मणिपूरला आलो.
शाळेची इमारत तर बांधून पूर्ण झाली होती, पण ‘तमेंगलॉन्ग टाऊन’च्या परिसरात कोणत्याही प्रकारचा समारंभ होऊ नये, अशी सक्त ताकीद अतिरेकी गटाने दिलेली असल्याने त्यांनी शाळेच्या उद्घाटन समारंभाला विरोध सुरू केला. स्थानिक नागरिकांच्या मनात मात्र इमारतीचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे, अशी इच्छा होती. तेवढा विश्वास आम्ही कार्यकर्त्यांनी कमावला होता. शक्य ती मदत करण्यास गावकरी तयार होते. पण, मुख्य अडचण अतिरेकी गटांकडून होणार्या विरोधाची होती. मीपण ठाम निश्चय करून अतिरेकी गटांच्या ‘सुप्रीमो’शी म्हणजे एरिया कमांडरशी दूरध्वनीवरून बोलणे केले. स्थानिक अतिरेकी गट उद्घाटन समारंभाला विरोध करीत असल्याचे सांगितले. एरिया कमांडरला आधीपासूनच माझ्याबद्दल माहिती होती आणि परिचयही होता.
अनेक वर्षे शाळा सुरू असल्याने या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांच्याही मनात आपुलकी होती. त्याने आश्वासन दिले की, "तुम्ही समारंभाची तयारी सुरू करा. तुम्हाला कोणीही अडवणार नाही, याची हमी मी देतो.” असे आश्वासन मिळाले, तरी रस्त्याने इम्फाळहून तमेंगलॉन्गला येणे धोक्याचे होते. अधूनमधून हिंसक घटना घडतंच होत्या. गाड्या अडवण्याचे प्रकार सुरू होते.
परंतु, काहीही करून मला प्रवास करणं भाग होतं. म्हणून धीर करून रात्री २ वाजता मी एका वाहनातून इम्फाळहून तमेंगलॉन्गला यायला निघालो. मनात धाकधूक होत होती. वाटेत कोणताही प्रसंग घडू शकला असता. परंतु काही अडचण न येता, सकाळी ८ वाजता मी तमेंगलॉन्गला पोहोचलो. उद्घाटनाच्या तयारीला सुरुवात झाली होती.
बुलडोझरने मैदान तयार करण्याचे काम सुरू झाले होते. त्याबरोबर अतिरेकी गट सक्रिय झाले. "कुणाच्या परवानगीने काम सुरू केलं?” अशी विचारणा झाली. एरिया कमांडरशी झालेल्या चर्चेची आणि त्याने दिलेल्या आश्वासनाची माहिती मी त्यांना दिली आणि विरोध मावळला. शाळेच्या आवारात भैय्याजींचा पुतळा न उभारता स्मृतिस्तंभ उभारण्याचे आधीच ठरले होते. त्यानुसार इम्फाळमध्ये स्तंभाचे काम सुरूही झाले होते. स्मृतिस्तंभाचे वजन आठ टन असल्याने तो आणणे, हे काम सोपे नव्हते. डम्परचा वापर करून स्मृतिस्तंभ आणून शाळेच्या आवारात उभारला गेला.
त्यावेळी मणिपूरमध्ये भयंकर पाऊस सुरू होता. म्हणून समारंभासाठी एक मुख्य मंडप आणि दोन लहान शामियाने उभारले गेले. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे’ या शिक्षण संस्थेचे डॉ. रवींद्र आचार्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. राहुल मुंगीकर, ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रदीप कदम, श्रीपाद दाबक व मी मंचावर उपस्थित होतो. प्रथेप्रमाणे ख्रिस्ती धर्मगुरूने म्हणजे पास्टरने आशीर्वचन म्हणजे ‘प्रेयर’ म्हणून समारंभाची सुरुवात केली.
या समारंभाला गावचे ‘हेडमन’ म्हणजे गावप्रमुख हजर होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, "या शाळेला रा. स्व. संघाची प्रेरणा असावी. कारण, इतक्या लांबवर येऊन निरपेक्ष भावनेने शिक्षणसंस्था चालवणे, हे सोपे काम नाही.” मुलांना खाऊचे वाटप झाले. कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न झाला आणि काय आश्चर्य सोसाट्याचे वारे वाहू लागले, तुफान पाऊस पडू लागला. वादळी वार्यामुळे मंडपाची नासधूस झाली. मनात आलं की, अर्धा तास अगोदर पाऊस सुरू झाला असता, तर समारंभ मधेच थांबवावा लागला असता. पण, निःस्वार्थपणे केलेल्या देशहिताच्या कार्यात कधी विघ्न येतं नाही, हेच खरं! आश्चर्य म्हणजे, या कामामागे रा. स्व. संघाची प्रेरणा आहे, असं म्हणणार्या हेडमनने "मुंबई किंवा पुणे शहरातील एखाद्या शिक्षण संस्थेत माझ्या मुलीला प्रवेश मिळवून द्या,” अशी मला विनंती केली. खूप वर्षे शाळा सुरू असल्याने संस्था आणि आम्हा कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली होती. हेडमनची विनंती ऐकून आपले काम योग्य दिशेने सुरू आहे, याचे समाधान मला वाटले.
भैय्याजींनी १९७१ मध्ये पाहिलेले स्वप्न या शाळेच्या भव्य इमारतीच्या स्वरूपात ५० वर्षांनी साकार झाल्याचे समाधानही वाटले. एखादा पुतळा काही काळा टिकू शकतो, पण स्मृतिस्तंभ हा दीर्घकाळासाठी टिकून राहतो. त्यातच हा स्मृतिस्तंभ म्हणजे एका तपस्वी संघप्रचारकाची आठवण करून देणारा आहे. एक संघप्रचारक महाराष्ट्रातून इथे सीमावर्ती भागात येऊन चिकाटीने आपले ध्येय साध्य करतो, याची आठवण येथील नागरिकांच्या मनात चिरकाल ठेवणारा आहे. विशेष म्हणजे, हा स्मृतिस्तंभ, ज्यावर भैय्याजींचे चित्र कोरलेले आहे, तो माजी विद्यार्थ्यांच्या आग्रहापोटीच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदतही केली. हा स्मृतिस्तंभ येणार्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, यात शंकाच नाही!
- जयवंत कोंडविलकर