कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढा : कोळी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    03-Jun-2026   
Total Views |
Government Scheme Maharashtra
 
मुंबई : (Government Scheme Maharashtra) कोळी समाजातील बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सहज आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक जारी करावे, अशी मागणी कोळी महासंघाच्या अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. यावेळी महासंघाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भातील स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
 
स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबर २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत अनुसूचित जमातीतील बांधवांना, विशेषतः रक्तनात्यातील समाजबांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीला विलंब झाल्याचे महासंघाने म्हटले आहे.
 
या विलंबाचा परिणाम कोळी समाजातील विद्यार्थी, तरुण-तरुणी तसेच शासकीय नोकऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांवर होत असून, अनेकांना शैक्षणिक व रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागत असल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
 
२० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार संबंधित विभागाला त्वरित परिपत्रक जारी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
 
या प्रसंगी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, युवा अध्यक्ष ॲड. चेतन पाटील, प्रा. सुरेश पाटकर, जितेंद्र सपकाळे, पोपटराव पुजारी आणि सतीश धडे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.Government Scheme Maharashtra
 

 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.