मुंबईत पार पडणार्या ‘युवा गझल संमेलना’चे अध्यक्षपद भूषवणार्या गोपाल मापारी यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेणारा हा लेख...
गझल म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव किंवा यमक-अनुप्रासांचे बंधन नाही. गझल म्हणजे काळजातून उमटलेली स्पंदनं, जि शब्दांच्या वाटे समोरच्याला भिडतात. थोडयात काय, तर गझल म्हणजे सर्जनशीलतेच्या आत्म्याचा आवाज. सुरेश भटांनी सर्जनाची ही हाक लोकांसमोर ठेवली आणि मराठी काव्यविश्व कायमस्वरूपी बदलून गेलं. त्यांच्यानंतर गझलनवाज भीमराव नवाज यांनी हाच सांस्कृतिक वारसा आपल्या सुरांच्या रथात बसवून घराघरांत पोहोचवला. आपली वेदना, संवेदना मांडणारे असंख्य तरुण आज काव्यपुष्पांच्या रूपात अभिव्यक्त होत आहेत. अशाच एका युवा गझलकाराचे नाव म्हणजे गोपाल मापारी!
गोपाल यांचं बालपण शेतकरी कुटुंबात गेलं. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुयातील चिंचपूर गावात ते लहानाचे मोठे झाले. घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर साहित्याचे, सामाजिक जाणिवांचे, संवेदनशीलतेचे संस्कार केले. शेतातील कामं आणि शिक्षण यातच त्यांचं बालपण गेलं. परिस्थितीच्या रेट्यामुळे सुटीच्या दिवसांतसुद्धा दुसर्याच्या शेतात काम करून पैसे जमा केले, ज्यातून वह्या, पुस्तके, ‘एसटी’चा पास आदी गोष्टींचा खर्च ते भागवायचे. शेतातील असं एकही काम नव्हतं, जे त्यांना जमायचे नाही. लहानपणापासूनच त्यांना जबाबदारी जाणीव झाली. गोपाल सांगतात की, अगदी नोकरीचा आदेश ज्या दिवशी आला, त्या दिवशीसुद्धा ते घरी गुरं चारायचं काम करत होते.
कुटुंबाच्या प्रेरणेतून शैक्षणिक प्रवास चांगला झाला. वडिलांना लागलेली शिक्षणाची गोडी मुलांनासुद्धा लागली. शाळेत एक गुणी आणि हुशार विद्यार्थी म्हणून गोपाल यांचा लौकिक होता. लहान वयात त्यांनी इंग्रजी भाषा बर्यापैकी व्यवस्थित आत्मसात केली. अर्थात, याला कारण म्हणजे, त्यांना लाभलेला चांगला शिक्षकवृंद. शैक्षणिक प्रवासात यश कमावताना त्यांनी सातत्य ठेवलं. मोठ्या भावाच्या शिक्षणासाठी घरच्यांना शेत गहाण ठेवावे लागले. कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणाची दिशा बदलली. ‘डी.एड.’ला प्रवेश घेत, शिक्षक होण्याचा ध्यास घेतला. ‘डी.एड.’चं शिक्षण घेतल्यावर शिक्षकभरतीसाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. मात्र, २०१० साली काही गुणांनी त्यांची मास्तरकी चुकली, ती कायमचीच. ‘डी.एड.’ संपेपर्यंत घरात वीजसुद्धा नव्हती. कंदिलाच्या उजेडात त्यांचा शैक्षणिक प्रवास संपन्न झाला. परिस्थितीच्या या रेट्यातच गझलेने त्यांच्यावर सावली धरली. या संघर्षाच्या काळात त्यांना सुचलेला शेर असा -
तिमिरात झोपडीच्या
आई मला म्हणाली,
त्या कंदिलास अपुला,
तू सूर्य मान बाळा.
शिक्षकभरतीत संधी हुकल्यावर एकंदर परिस्थिती पाहता, घरी मिळेल ती नोकरी करण्याची परिस्थिती होती; म्हणून त्यांनी अगदी शिपायाची नोकरी स्वीकारली. पण, सगळ्या संघर्षात स्वतःवर विश्वास ठेवत चालत राहिले. अखेर स्पर्धा-परीक्षेच्या माध्यमातून पाटबंधारे विभागात त्यांनी नोकरी मिळवली. संघर्षाच्या या सगळ्या प्रवासामध्ये एकच एक ध्येय ठेवून, काहीतरी होण्याचा विचार त्यांना परवडणारा नव्हता. मात्र, एक गोष्टी त्यांनी मनाशी पक्की केली होती, ती म्हणजे चांगला माणूस व्हायचं. आपण बरेचदा पद, प्रतिष्ठा, नाव, सन्मान आदी गोष्टींच्या मागे लागून, माणसाच्या अंतरंगात डोकावायचे विसरतो. याच अंतरंगाला घडवण्याचे काम गोपाल यांनी केले. आजच्या काळात तरुणांच्या अवतीभोवती असंख्य मोहाचे पाश आपल्याला बघायला मिळतात. व्यसनांच्या मोहापायी दरवर्षी हजारो युवक आपली जीवनयात्रा संपवतात. आपण या सगळ्या जंजाळात सापडायचं नाही, असा निर्धार गोपाल यांनी केला आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, तितयाच कसोशीने तो पाळलासुद्धा!
गोपाल सांगतात की, साहित्यामुळे त्यांच्या जीवनात तर फार मोठा बदल घडला. वडील कवी असल्याने अनेक कवी-लेखकांचा परिचय लहानपणीच झाला. साहित्याची गोडी लागली. शालेय जीवनातच अनेक पुस्तके वाचली होती. मराठीसह हिंदी आणि उर्दूची गोडीसुद्धा होती. वाचनामुळे विचारांच्या कक्षा रुंदावल्या. स्वतः लिहायला प्रेरणा मिळाली. बालपणापासून पु. ल. यांचं मिश्किल साहित्य खूप आवडत होतं. बाबांचे समकालीन अनेक कवी आवडत होते. अलीकडे सतीश दराडे यांच्या गझलांवर त्यांचा जीव जडला आहे. विविधांगी असण्याचा ध्यास कायम असल्याने अनेक क्षेत्रांतील लोकांच्या योगदानाचा प्रभाव त्यांच्यावर आहे.
गझलेचे त्यांच्या जीवनातील स्थान काय, या विषयावर भाष्य करताना ते म्हणतात की, "गझल हा जीवनाचा अर्धा भाग झाला आहे. आता जे बोलतो, तेही गझलेच्या वृत्तात येतं.” प्रशांत असनारे, नितीनदादा देशमुख, दिवंगत विजय आव्हाड अशा अनेक गझलकारांच्या साहित्यकृती त्यांना भावतात. डॉ. कुमार विश्वास यांनीसुद्धा गोपाल यांना प्रभावित केलं आहे. ‘गझलमंथन’ संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘गझल युवा संमेलना’चे अध्यक्षपद गोपाल मापारी भूषवणार आहेत. त्यांच्या समृद्ध वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!