गागाभट्ट विरचित ‘राज्याभिषेक प्रयोग’

    03-Jun-2026
Total Views |

 Gagabhatta 
 
भारतीय इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा! ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १५९६ आनंदनाम संवत्सरे म्हणजे फिरंगी दि. ६ जून १६७४ रोजी दुर्गदुर्गेश्वर रायगडावरती शिवरायांचा राज्याभिषेक वेदघोषात संपन्न झाला. ३५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर हिंदू सार्वभौम सत्तेचं स्वतंत्र सिंहासन या महाराष्ट्राच्या भूमीत स्थापन झालं. भारतावर विविध काळांत राज्य करणार्‍या विविध यौवनी सत्तांवर मात करून शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील पातशाही दक्षिणेत ठेवून स्वतःला ‘छत्रपती’ घोषित केले. सभासद बखरकार सांगतात, "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मर्‍हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.” अखंड भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण घटना होती. त्यानिमित्ताने आजपासून ६ जूनपर्यंत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे विविध ऐतिहासिक पैलू उलगडणार्‍या विशेष लेखमालेतील हे प्रथम पुष्प...
 
शिवरायांचा राज्याभिषेक विधियुक्त पद्धतीने संपन्न करण्यासाठी काशी क्षेत्री असलेल्या गागाभट्ट यांना पाचारण करण्यात आले. ‘विष्णुधर्मोत्तर पुराण’ या ग्रंथाच्या आधारे ‘राजाभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ सिद्ध करण्यात आला. ‘गागाभट्टकृतः राज्याभिषेकप्रयोगः’ या ग्रंथाची सुरुवात खालील श्लोकाने करण्यात आलेली आहे.

नत्वा गणेशं शिवशारदे च मूलं
समालोच्य व विष्णुधर्मम्|
राज्याभिषेकस्य महाप्रयोगं
विश्वेश्वरो दैनकरिस्तनोति ॥१॥
 
श्री गणेश, शिव आणि शारदेला नमन करून दिनकराचा पुत्र विश्वेश्वर, जे गागाभट्टांचे मूळ नाव आहे, त्यांनी ‘विष्णुधर्मोत्तर पुराण’ या ग्रंथाच्या आधारे याची रचना केली आहे. यामध्ये दोन प्रकारचे विधी सांगण्यात आले आहेत, ज्यात ‘प्रथमाभिषेक’ आणि ‘सांवत्सरिक अभिषेक’ हे विधी करण्यात आले. राज्याभिषेकाचे विधी ज्येष्ठ शुद्ध षष्ठी म्हणजेच राज्याभिषेकाच्या सात दिवस अगोदरपासून हे विधी सुरू होते. मौंजीबंधन विधी, पुरुषतुलादान, सुवर्णादि तुलादान त्याचबरोबर राज्ञी सोयराबाई यांच्या सोबत शिवरायांचा समंत्रक विवाह पुन्हा करण्यात आला. त्यामुळे राज्याभिषेक विधी सपत्निक करण्यास धर्मशास्त्राप्रमाणे मोकळीक झाली. पहिल्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध ६ शके १५९६ रोजी शिवरायांनी देश-कालाचा निर्देश करून, प्रजापालनाधिकाराच्या सिद्धीद्वारा परमेश्वराप्रीत्यर्थ, साम्राज्यादिफलाच्या प्रीत्यर्थ, गणेशपूजन, त्यांचे अंग म्हणून ब्राह्मणाकरवी पुण्याहवाचन, मातृकापूजन वसोर्धारापूजन नांदीश्राद्ध, पुरोहितवरण इत्यादी विधी करण्याचा संकल्प सोडला. अंबिका व त्र्यंबका यांच्या कन्या, ऋद्धिसिद्धीसहित सर्व देवतांचे आवाहन केले. अशा प्रकारे आवाहन करून षोडशोपचारांनी व गंधादि पाच उपचारांनी योग्य पूजा करून पुष्प-फलासहित अर्घ्य अर्पण केले. पुढे पुण्याहवाचनमध्ये लोककल्याणासाठी प्रार्थना करताना शिवरायांनी देवाकडे आशीर्वचन मागितले की, "मला विघ्न, पाप आणि शत्रू नसावेत, सर्व लोक सुखी, सुखावह आणि सौम्य असोत.” सर्व देवी-देवतांना अभिषेक घालण्यात आला. विष्णुपत्नी लक्ष्मीला आवाहन करून आराधना केली. यावेळी पौराणिक मंत्रानी शिवरायांना स्नान घालण्यात आले. अशा प्रकारे मंत्र म्हणून अभिषेक घातल्यावर, ‘करोतु ते स्वस्ति ब्रह्मा’ इत्यादी मंत्र म्हणून शिवरायांना निरांजनाने ओवाळून व तिलक लावून आशीर्वाद देण्यात आले. त्यानंतर तांदळांची पूजा करताना गौरी इत्यादि १६ मातृकांचे आवाहन केले गेले व त्यानंतर पाच किंवा सात तुपाच्या धारा करून ‘वसुधारायै नमः’ असे म्हणून त्यांचे पूजन करण्यात आले.
 
पहिल्या दिवशी एकूण नऊ कार्यक्रम पार पडले. त्यात गणेशपूजन, कलशस्थापन, पुण्याहवाचन, यजमानास स्नान, षोडशमातृकापूजन, नांदी-श्राद्ध, पुरोहितवरण (मधुपर्क), रक्तसूत्रधारण आणि पट्टबंधन व होमासहित विनायकशांति असे विधी करण्यात आले. दुसरे दिवशी ऐन्द्रीशांतीचा विधी करावयाचा असल्याने शिवरायांना त्या दिवशी फलाहार, भूमीवर शयन व ब्रह्मचर्य पालन करावे लागले. दुसरा दिवस म्हणजे ज्येष्ठ शु. ७ शके १५९६ या दिवशी ऐन्द्रीशांती या विधीला प्रारंभ झाला. देशकालाचा उच्चार करून "पुढे करावयाच्या राज्याभिषेकाचे अंग म्हणून ऐन्द्रीशांती करीत आहे,” असा संकल्प करण्यात आला. आचार्याने मोहरी सर्वत्र उधळून पंचगव्याने प्रोक्षण करून ‘अम्बयो यन्ति’ इत्यादि आठ ऋचांचे व ‘इन्द्र जुषस्व’ इत्यादी सात ऋचांचे सूक्त म्हणून त्यांनी अभिमंत्रित झालेल्या उदकाने मंडपात व सामग्रीवर प्रोक्षण करण्यात आले. "राज्याभिषेक भरपूर समृद्ध होण्यासाठी हे शतरश्मी असणार्‍या, अंधकार नाहीसा करणार्‍या भगवंता, तुला नमस्कार असो. हे देवा, माझे दुर्भाग्य नष्ट कर. मला सौभाग्य मिळू दे,” असे शिवरायांनी आशीर्वचन मागितले. ऐन्द्रीशांतीचे अंग म्हणून ऐशान याग करण्याचा संकल्प करण्यात आला. अशा प्रकारे दुसर्‍या दिवशीच्या समारंभात ऐन्द्रीशांतीनिमित्त कुंडात अग्निप्रतिष्ठा, इन्द्राणीपूजन,चार कुंभांची स्थापना बलिदान, आचार्य ऋत्विजांना दक्षिणादान व शेवटी ऐन्द्रीशांतीचे अंग म्हणून ऐशान याग हे विधी करण्यात आले.
 
ज्येष्ठ शुद्ध ८ शके १५९६च्या तिसर्‍या दिवशी ग्रहमखाप्रमाणे ग्रहयाग करण्यात आला. "ऐन्द्रीशांतीचे अंग म्हणून ग्रहयज्ञ करीन,” असा संकल्प सोडून आचार्याने स्वतःच्या कुंडात अग्नीची प्रतिष्ठापना केली व त्याच्या पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे वेदिकेवरील ग्रहपीठावर ग्रहांचे आवाहन करण्यात आले. स्विष्टकृतादि होम, बलिदान व पूर्णाहुति समाप्त करून, ग्रहांच्या प्रसन्नतेसाठी गाय, शंख इत्यादीची दक्षिणा व नक्षत्रांच्या प्रसन्नतेसाठी घृत इत्यादींची दक्षिणा देण्यात आल्या. ‘विष्णुधर्मोत्तर पुराणा’त मंगळवार, चतुर्थी, नवमी व चतुर्दशी हे दिवस राज्याभिषेक विधीसाठी निषिद्ध मानले गेले आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभात चौथ्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध नवमी व मंगळवार आल्याने या दिवशी काहीही विधी झाला नाही. हा दिवस भाकड म्हणून सोडून देण्यात आला.
 
पाचव्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध १० शके १५९६ नक्षत्र यज्ञ करण्यात आला. "ऐन्द्रीशांतीचे अंग म्हणून नक्षत्रयज्ञ करीन,” असा संकल्प सोडून कुंडामध्ये अग्नीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याच्या पूर्वेकडे वेदीवर किंवा पीठावर नक्षत्र प्रतिमांच्या ठिकाणी २८ नक्षत्रे व नक्षत्रदेवतांच्या प्रतिमांच्या ठिकाणी नक्षत्रदेवता यांचे पूर्वोक्त मंत्रांनी किंवा ‘अग्निर्नः पातु’ इत्यादी आठ वायांनी आवाहन करण्यात आले. समिधा, चरु, यवमिश्रित तीळ व आज्य यांनी प्रत्येकी ८०० संख्येने पूर्वोक्त होम मंत्रांनी व ‘अग्निर्नः पातु’ या आठ वायांनी आहुती देण्यात आली. अभयगणाने अग्नीचे उपस्थान करून, स्विष्टकृतादिक होमाचा अवशिष्ट भाग समाप्त करण्यात आला. त्यानंतर नक्षत्रांना प्रसन्न करण्यासाठी घृतादिक दक्षिणा देऊन ब्राह्मणभोजनाचा संकल्प करण्यात आला. शेवटी उत्तरपूजन विसर्जन करून प्रतिमा आचार्यांनादेण्यात आली.
 
ज्येष्ठ शु. ११, गुरुवार, शके १५९६ म्हणजेच सहाव्या दिवशी रात्री निर्ऋतियाग करण्यात आला. निर्ऋतीला प्रामुख्याने विनाश, मृत्यू, दुःख, विघ्नाची देवता मानले जाते. ऋग्वेदात त्यांना ‘पापांची शिक्षा देणारी आणि बंधनात टाकणारी शक्ती’ म्हटले आहे. वास्तुशास्त्रानुसार, निर्ऋती ही नैऋत्य दिशेची स्वामी मानले गेले आहे. यासाठी आचायनि मंडपांच्या नैऋत्य भागात अग्नीची प्रतिष्ठापना केली. अग्नीच्या दक्षिणेला गाढवावर बसविलेल्या मातीच्या व काळे वस्त्र पांघरलेल्या उत्तराभिमुख मूर्तीचे पूजन आटोपून बळी. या पूजेमध्ये शिवरायांनी काळी वस्त्रे परिधान केली होती. पूजेमध्ये गंध, वस्त्र व फुले काळीच होती. एका सुपात धान, मांस, मीठ मिसळलेले पाणी, पुरी, तीळाचे पीठ, अपक्व मांस, जवाचे पीठ, कुळथा, माखलेले भांडे, फळे व काळी फुले, खिचडी, मासे मिसळलेला भात व धारगे हे पदार्थ ठेवून ‘असुन्वन्तम...’ इत्यादी मंत्राने निर्ऋतीला नैवेद्य दाखवून नमस्कार करण्यात आला. त्यानंतर स्नान करून, काळे वस्त्र, जोडे इत्यादी टाकून, पांढरे वस्त्र घालून गंध, अक्षता हातात घेऊन पुण्याहवाचन करण्यात आले. यजमानाने कास्याचे भांडे, वस्त्र व गाय यांची दक्षिणा दिली व त्यानंतर महाशांतिमंडपाकडे प्रस्थान करण्यात आले.
 
सातव्या दिवशी ज्येष्ठ शु. १२ शुक्रवार शके १५९६ यानंतर ऐन्द्रीशांती करण्यात आली. सातव्या दिवशी आचार्याने ‘सं सं स्रवन्तुनद्यः’ या तीन ऋचा म्हणत, शुद्ध जल आणून ‘शतं आपो हैमवती’ इत्यादी पाच मंत्रांनी उत्तरेस स्थापन करून, त्या जलाने सामग्रीवर प्रोक्षण करण्यात आले. सोन्याची इन्द्रप्रतिमा अग्नीतून तापवून व पंचगव्याने धुवून शुद्ध केल्यावर स्थापन करण्यात आली. ‘इन्द्र जुषस्व’ इत्यादी मंत्रांनी इंद्राचे आवाहन करून षोडशोपचारांनी पूजन केले गेले. गंध, वस्त्र व पिवळी फुले वापरून हे पूजन करण्यात आले. पूजा संपल्यावर कुंडल, अंगठी, चवरी, छत्र, पादत्राण, उशी (वितान) ध्वज, पताका, अर्पण केल्यावर दक्षिणा व पुष्पांजली समर्पण करण्यात आली. कास्याच्या भांडचात ‘अतिसृष्टोऽ पां भागः’ हा मंत्र म्हणत उदक आणून हे औषधिस्वरूप जल घेऊन औषधींचे आवाहन करून गायत्रीमंत्र, ‘अम्बयो यन्ति’ या आठ ऋचा, ‘आपो हि ष्ठा’ ही एक ऋचा, ‘हिरण्यवर्णा’ इत्यादी १५ ऋचा ‘शिवा नः शंतमा भव, शं नो वातः’ एक ऋचा, ‘इन्द्र जुषस्व’ हे सूक्त म्हणून, ते जल अभिमंत्रित करून तीनदा अग्रीवर प्रोक्षण करून उरलेले जल पूर्वेकडील कुंभात टाकण्यात आले. विविध फुलांनी तसेच पिंपळ, आतसी, पारिजात, जारूषी, त्रापसी, खदिर अपामार्ग (आघाडा), पळस, शमी यांच्या समिधांचा वापर करून आहुती दिली गेली. अशा रितीने विविध पूजा संपन्न करून सर्व आचार्यांनी मंत्रपठण केले. "तू इंद्राचे वृत्रवध करणारे वज्र आहेस. तुझ्यायोगे हा वृत्राचा वध करो. तुम्ही शत्रूंना बाधा करणारे व्हा. माझे सर्व भागांनी सर्व दिशांपासून रक्षण करा. सर्व दुष्टांपासून माझे रक्षण करा,” या अर्थाचे मंत्र म्हणत, धनुष्याला बाण जोडून मंडपाला प्रदक्षिणा घातली. गुरूला नमस्कार करून पांढरे वस्त्र देऊन सवत्स गायीचे पूजन करून तिच्या पाठीवरून हात फिरविल्यावर घोड्याजवळ जाऊन त्याचे पूजन करण्यात आले. हत्ती व अश्वाचे पूजन करून "हे उत्कृष्ट गजा! तुला राजाने स्वीकारले आहे. तू त्याच्या गजांचा अग्रणी हो. गंधमाळा, अन्न व इतर भक्ष्य पदार्थांनी हा राजा तुझे पूजन करील,” असे म्हणून पूजा करण्यात आली.
 
राज्याभिषेकप्रसंगी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १५९६ या दिवशी पहाटे शिवरायांनी सपत्निक मंगलघोषात मंडपातील सभेत प्रवेश केला. अनेक पूजनाचे विधी करून शिवराय सभामंडपातील वेदीवर बसले. त्यांनी १६, आठ आणि चार फासे घेऊन एका क्षत्रियासोबत द्यूतक्रीडा करत त्यांच्या विजयाची घोषणा केली. पुढे अभिषेक शाळेमध्ये एक आसन स्थापन करण्यात आले. भोवती आठ दिशांस गंधमाळांनी पूजिलेले, वस्त्राने वेष्टिलेले असे आठ जलपूर्ण कुंभ स्थापन करण्यात आले. त्यामध्ये समुद्र, नदी, सरोवर, पवित्र विहीर, गंगा-यमुना यातील मिळतील, त्या प्रमाणात जल टाकण्यात आले. महान सामर्थ्य, महान अधिपत्य, महान जनराज्य यांच्यासाठी तुमचे भरण करणारा राजा असो. "सोम आम्हा ब्राह्मणांचा राजा आहे,” या अर्थाच्या मंत्रांची घोषणा करीत यजमानाच्या हाती धरून त्याने (घृतपूर्ण हेमकुंभाने) निमूटपणे अभिषेक घालण्यात आला, याचप्रमाणे क्षत्रिय अमात्याने दक्षिण दिशेस ठेवलेल्या दुग्धपूर्ण चांदीच्या कुंभाने, वैश्य अमात्याने पश्चिम दिशेस ठेवलेल्या दह्याने भरलेल्या तांब्यांच्या कुंभाने व शूद्र अमात्याने उत्तर दिशेस ठेवलेल्या जलपूर्ण मातीच्या कुंभाने अभिषेक घालावा, असे सांगितल्याप्रमाणे विधिवत अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सामवेदी ऋत्विजाने पूर्व दिशेस ठेवलेल्या मधाने भरलेल्या सोन्याच्या कुंभाने, आचार्याने कुशोदकाच्या कुंभाने व त्यानंतर १०० छिद्रांच्या भवनाच्या आतील वेदीवर उभे असलेल्यांनी सर्व प्रकारच्या कलशांनी अभिषेक घालावा. याप्रमाणे राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेवले होते. उपदिशांच्या ठायी क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैॠत्येला पक्वान्नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्येला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते. त्यानंतर आचार्याने संस्त्रव कलश एका भागाला धरून त्याने पुढे सांगितलेल्या मंत्रांनी अभिषेक घालावा. ‘देवस्य त्वा’ हा मंत्र म्हणून "हे देवहो, महनीय अशी क्षात्र पदवी, सर्वमान्य असे सर्वश्रेष्ठत्व अत्यंत विस्तीर्ण असे जनराज्य व देवराज इंद्रांचे आत्मज्ञानसामर्थ्य संपादन करण्याची शक्ती असलेल्या शहाजीराजे व जिजाऊ यांचा सुपुत्र शिवाजी राजांनी या सर्व जातींच्या प्रजाजनांचा अधिपती म्हणून शत्रूरहित असलेल्या या यज्ञकर्त्या राजाला तुम्ही प्रेरणा करा.”
 
सभामंडपात स्थापन केलेल्या सिंहासनावर बैल, मांजर, हत्ती, सिंह, वाघ यांची कातडी अंथरून, त्यावर मंगलघोषात छत्रपती शिवाजी महाराजांना बसवून त्यांच्या मस्तकावर ‘स्वस्ति नो मिमीत्य’ इत्यादी मंत्र म्हणत ‘पट्टबंधन’ म्हणजेच फेटा बांधण्यात आला. त्यानंतर तेथल्या प्रतिहाराने अमात्य, नगरप्रमुख, वेदज्ञ पंडित, व्यापारी व इतर लोकांची ओळख करून देण्यात आली. "ज्याप्रमाणे युद्धामध्ये पालन होण्यासाठी विष्णुमंदिरात राजा तुझी पूजा करतो, त्याप्रमाणे लोक तुझी निर्भयपणे पूजा करतील,” हा मंत्र म्हणत पुरोहिताने पूजा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुष्पांजलीने त्या गजाची पूजा केली व त्यावर आरोहण करून नगराला प्रदक्षिणा घातली. देवालयात जाऊन तेथील देवांची पूजा केल्यावर राजवाड्यात जाऊन यथाशक्ति ब्राह्मणभोजन आटोपल्यानंतर दीन, अनाथ, नट, नर्तक इत्यादींना भरपूर दक्षिणा देण्याचा संकल्प सोडून, मंडपादिकांची सामग्री आचार्याला देण्याचा संकल्प सोडून, सुवर्णादिकांचे कलश अमात्यांना देण्याचा संकल्प सोडून कर्म ईश्वरार्पण केल्यावर मित्रमंडळीसहित शिवरायांनी भोजनाचा आनंद घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा देदीप्यमान सोहळा मोठ्या उत्साहाने वैदिक मंत्रांच्या जयघोषात किल्ले रायगडावर संपन्न झाला. ‘विष्णुधर्मोत्तर पुराणा’प्रमाणे राज्याभिषेकाचे धार्मिक विधी करण्यात आले. हिंदू धर्मशास्त्रातील एका स्वर्णिम घटिकेला पुण्यपावन करणारा हा सुदिन म्हणजे ‘शिवराज्याभिषेक सोहळा.’ अखंड हिंदुस्थानातील हिंदूंच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा एक सुवर्णक्षण ठरला.
 
- पंकज भोसले