विश्व हिंदू परिषद’ कोकण प्रांतातर्फे नुकताच ‘दुर्गा वाहिनी अभ्यास वर्ग’ दि. २४ मे ते दि. ३१ मे या कालावधीमध्ये सरस्वती विद्यालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रभक्ती, स्वसंरक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रेरणादायी संगम ‘विश्व हिंदू परिषद’अंतर्गत आयोजित करण्यात आलेला सात दिवसीय निवासी ‘दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग’ उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या अभ्यासवर्गाचा मागोवा घेणारा हा लेख...
युवतींमध्ये राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘दुर्गा वाहिनी’च्या या अभ्यास शिबिराने सहभागी युवतींच्या जीवनात एक नवी प्रेरणा निर्माण केली. महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमधून आलेल्या १०८ दुर्गा भगिनी आणि २० शिक्षिकांच्या उपस्थितीमुळे हे शिबीर विशेष भव्य आणि प्रभावी ठरले.
सात दिवसांच्या या निवासी प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी युवतींना केवळ शारीरिक प्रशिक्षणच नव्हे, तर वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातूनही सक्षम करण्यासाठी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक दिवस नवे विचार, नवे अनुभव आणि नवे संकल्प घेऊन उगवत होता. शिबिरातील दिनक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी होता. प्रातःस्मरण, संघस्थान, संध्यावंदन, चर्चासत्र, कृतीसत्र, रंजनसत्र, शारीरिक प्रशिक्षण आणि बौद्धिक वर्ग यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करण्यात आला.
शिबिराच्या पहिल्या दिवशी केंद्रीय दुर्गा वाहिनी सहसंयोजिका पिंकी पवार यांनी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या विविध आयामांची सविस्तर माहिती दिली. समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या परिषदेच्या उपक्रमांचा परिचय करून देताना त्यांनी युवतींना राष्ट्रकार्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले.
दुसर्या दिवशी स्वाती भोसले यांनी ‘दुर्गा वाहिनी कार्यविस्तार आणि साप्ताहिक मिलनाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. संघटनशक्ती, नियमित संपर्क आणि कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण सहभागामुळे समाजपरिवर्तनाची प्रक्रिया अधिक प्रभावी कशी होते, याचे त्यांनी सुंदर विवेचन केले.
तिसर्या दिवशी अनिरुद्ध पंडित, क्षेत्र संघटनमंत्री यांनी ‘हिंदू संस्कृतीची वैशिष्ट्ये’ या विषयावर विचार मांडले. भारतीय संस्कृतीतील सहिष्णुता, कुटुंबव्यवस्था, अध्यात्म, मूल्याधिष्ठित जीवन आणि जगाला दिलेले सांस्कृतिक योगदान यांची त्यांनी सखोल मांडणी केली.
चौथ्या दिवशी सुवर्णा रावळ यांनी ‘आधुनिक युगातील आव्हाने आणि सक्रिय सहभाग’, तसेच ‘मास्टरमाईंड वीरांगना यांचा कार्यविस्तार’ या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांनी आत्मविश्वासाने नेतृत्व स्वीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
पाचव्या दिवशी प्रांतमंत्री मोहन सालेकर यांनी ‘पंचपरिवर्तन’ या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. स्वबोध, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, नागरिक कर्तव्य आणि सामाजिक समरसता या पाच घटकांद्वारे समाजपरिवर्तनाचा व्यापक विचार त्यांनी मांडला. राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येक व्यक्तीची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले.
सहाव्या दिवशी कॅप्टन अतुल इंदूलकर यांनी ‘इस्लामिक, इसाई आणि हिंदू धर्म यांचा तुलनात्मक आढावा’ घेतला. आपल्या सहज सुंदर शैलीत बोलताना स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान आणि जागरूकता निर्माण करण्याचा संदेश त्यांनी दिला.
शिबिराच्या अंतिम दिवशी ज्येष्ठ पत्रकार योगिता साळवी यांनी ‘राष्ट्रनिर्माणामध्ये महिलांची भूमिका’ या विषयावर प्रभावी विचार मांडले. इतिहासापासून आजपर्यंत महिलांनी राष्ट्रजीवनात बजावलेल्यामहत्त्वपूर्ण योगदानाची उदाहरणे देत, त्यांनी युवतींना समाजकार्यात सक्रिय होण्याचे आवाहन केले. शिबिराचा सर्वाधिक आकर्षक आणि उत्साहवर्धक भाग म्हणजे शारीरिक प्रशिक्षण. स्वसंरक्षणासाठी दंड, यष्टी, छुरिका आणि नियुद्ध (कराटे) यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षित शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी युवतींनी विविध शारीरिक कौशल्यांचा सराव केला. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि संकटसमयी स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता विकसित झाली. याशिवाय, सकाळी आणि संध्याकाळी दोन तास नियमित समता (परेड) आणि संघस्थानाचे आयोजन करण्यात आले. शिस्त, एकसंधता आणि संघभावना विकसित करण्यासाठी या उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली.
आठ चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेदक यांनी ‘कार्यकर्ता गुण आणि व्यवहार’ या विषयावर संवाद साधला. आदर्श कार्यकर्ता कसा असावा, त्याच्यात कोणते गुण असावेत आणि समाजात वावरताना कशा प्रकारचे आचरण ठेवावे, याबाबत त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
प्रांत मातृशक्ती सहसंयोजिका उज्ज्वला शेट्ये यांनी ‘नैतिक शिक्षण आणि मूल्ये’ या विषयावर विचार मांडले आणि समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने या प्रयत्नांना साथ द्यावी, असे कळकळीचे आवाहनही केले. मूल्याधिष्ठित जीवनाचे महत्त्व आणि आधुनिक काळात नैतिकतेची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. वर्गाधिकारी विद्या संख्ये यांनी ‘आदर्श हिंदू घर’ या विषयावर मार्गदर्शन करताना संस्कारक्षम कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट केले.
महिलांच्या कायदेशीर अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अॅड. गौतमी चाळके यांनी ‘महिलाविषयक कायदे आणि नियम’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून सक्षमपणे समाजात वावरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आधुनिक युगातील संवादमाध्यमांचे महत्त्व लक्षात घेऊन, दीपा सिंग यांनी सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले. समाजजागृती आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी सोशल मीडिया कसा उपयोगी पडू शकतो, याविषयी त्यांनी माहिती दिली.
शंकर संगपाल, बजरंग दल संयोजक, नवी मुंबई यांनी आंदोलन विषयावर मार्गदर्शन केले, तर प्रिया सावंत, प्रांत उपाध्यक्षा यांनी वक्तृत्व कलेचे प्रशिक्षण देत प्रभावी संवाद कौशल्याचे महत्त्व स्पष्ट केले. गणेश कदम, होमगार्ड अधिकारी यांनी ‘आपत्कालीन स्थिती आणि व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करून संकटसमयी धैर्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कसे कार्य करावे, याचे प्रशिक्षण दिले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रांत सहमंत्री अजय मुडपे, श्रीराज नायर, प्रांत मातृशक्ती संयोजिका मनीषा भोईर, टीना कदम, प्रिती पांडे, वर्षा भोसले, स्नेहा ढालकर, प्रतिभा नाग आणि वंदा जेधे यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या उपस्थितीमुळे आणि मार्गदर्शनामुळे शिबीर अधिक प्रभावी व यशस्वी ठरले.
या सात दिवसांच्या शौर्य प्रशिक्षण वर्गाने सहभागी युवतींमध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार, नेतृत्व, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि स्वसंरक्षणाची भावना दृढ केली. शारीरिक सामर्थ्याबरोबरच वैचारिक प्रगल्भता, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या शिबिराने साध्य केले. अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग भविष्यात राष्ट्रसेवेसाठी सज्ज, आत्मविश्वासपूर्ण आणि संस्कारक्षम महिलाशक्ती घडविण्यास निश्चितच मोलाचे योगदान देणार आहेत. ‘दुर्गा वाहिनी’च्या माध्यमातून घडणारी ही जागृत, संघटित आणि सक्षम महिलाशक्ती राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
- मोहन सालेकर