काँग्रेसचे संकटमोचक ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार कोण आहेत?

    03-Jun-2026
Total Views |
D K SHIVKUMAR
 
बंगळुरू : (D.K. Shivakumar) कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिकुमार यांनी शपथ घेतली. काँग्रेसचे निष्ठावंत आणि श्रीमंत व्यक्ती अशी डी के शिवकुमार यांची ओळख आहे. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात त्यांनी तन, मन आणि धनाने पक्षाची मदत केली, त्यासाठी भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर ते आव्हान म्हणून उभे ठाकले. या सगळ्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले. काही काळ त्यांना तुरुंगवासही सहन करावा लागला. मात्र या सगळ्या प्रवासात काँग्रेस पक्षावरची त्यांची निष्ठा अबाधित राहिली. अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर आणि संधीची वाट पाहणाऱ्या डी के शिवकुमार यांना अखेर मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
 
देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री डी के
 
डी के शिवकुमार यांची गणना देशातील सर्वाधिक संपत्ती असलेले मुख्यमंत्री अशी होणार आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 1,413.7 कोटी रुपये इतकी आहे.दुसऱ्या क्रमांकावर आँध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे आहेत. त्यांची घोषित संपत्तीही शेकडो कोटी म्हणजे ६४८ कोटींच्या घरात आहे. मात्र शिवकुमार यांच्या संपत्तीपेक्षा ती खूपच कमी आहे.
 
शिवकुमार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्थावर आणि जंगम मालमत्ता, शेअर्स, व्यावसायिक गुंतवणूक, कृषी जमीन आणि व्यावसायिक मालमत्तांचा तपशील दिला आहे. त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर बंगळुरूसह कर्नाटकातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
कुठून आली एवढी संपत्ती?
 
डी.के. शिवकुमार यांचा व्यवसाय मुख्यतः रिअल इस्टेट, बांधकाम, शिक्षण संस्था, कृषी क्षेत्र आणि विविध उद्योगांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. राजकारणात येण्यापूर्वीपासूनच त्यांचे कुटुंब व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय होते. त्यामुळे गेल्या अनेक दशकांत त्यांची आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली.
 
काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख कधीपासूनची
 
जेव्हा जेव्हा काँग्रेसला आर्थिक मदत, संघटनात्मक बळ किंवा संकट व्यवस्थापनाची गरज भासली, तेव्हा तेव्हा पक्षश्रेष्ठींनी ती जबाबदारी डी के शिवकुमार यांच्याकडे सोपवली आणि त्यांनी ती यशस्वीरित्या पारही पाडली.
 
१. २००२ साली विलासराव देशमुख सरकार वाचविण्याची जबाबदारी
 
महाराष्ट्रातील काँग्रेस-नेतृत्वाखालील सरकार २००२ साली संकटात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारचा पाठिंबा काही आमदारांनी काढून घेतला. विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती निर्माण झाली.
 
यावेळी डीके शिवकुमार यांनी महाराष्ट्रातील सुमारे 40 काँग्रेस आमदारांना बंगळुरूला नेऊन त्यांच्या ईगलटन रिसॉर्टमध्ये ठेवले. आठवडाभर कडेकोट सुरक्षा ठेवून आमदारांची एकजूट कायम राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि देशमुख सरकार वाचले.
 
२. गुजरातेत अमित शाह यांना आव्हान
 
गुजरात राज्यसभा निवडणुकीत २००७ साली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. क्रॉस व्होटिंगची भीती असल्याने गुजरात काँग्रेसचे 44 आमदार बंगळुरूला हलवण्यात आले.
 
या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व डीके शिवकुमार यांनी केले.आमदारांना ईगलटन रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले. भाजपकडून अमित शाह यांनी ही निवडणूक प्रतिष्ठएची केली होती. याच काळात आयकर विभागाने त्यांच्या विविध ठिकाणी छापे टाकले. मात्र डीके यांनी आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी सोडली नाही. अखेरीस अहमद पटेल निवडून आले आणि या विजयाचे श्रेय डीके यांना देण्यात आले.
 
३. कर्नाटकमध्ये भाजपला रोखण्याची रणनीती
 
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २०१८ साली भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र बहुमतापासून दूर होता. काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा आमदार फुटण्याची भीती निर्माण झाली.डी के शिवकुमार यांनी काँग्रेसच्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवून एकजूट कायम राखली. परिणामी भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही आणि एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-जेडीएस सरकार स्थापन झाले.
 
संपत्ती आणि वाद दोन्ही सोबत
 
डीके शिवकुमार यांचे रिअल इस्टेट, खाणकाम, शिक्षण आणि वाहतूक क्षेत्रातील मोठे व्यावसायिक हितसंबंध आहेत. 2018 मध्ये त्यांनी सुमारे 860 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेत मोठी वाढ झाली. त्यांच्या कारकिर्दीला वादांचाही स्पर्श झाला. करचोरी आणि कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये ईडी चौकशी केली आणि सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांना अटकही करण्यात आली. जवळपास ५० दिवस ते तिहार कारागृहात होते.
 
काँग्रेसमधील विश्वासू चेहरा मात्र उशीर
 
2023 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाल्यानंतर डीके शिवकुमार यांनी सार्वजनिकपणे सोनिया आणि राहुल गांधींचे आभार मानले. “मी त्यांना कर्नाटक जिंकून देण्याचे वचन दिले होते, ते पूर्ण केले,” असे त्यांनी म्हटले होते. त्याच वेळी डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याचे घोषित केले. संधी समोर असतानाही डी के शिवकुमार यांनी हा निर्णय स्वीकारला आणि उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानले. अखेरीस तीन वर्षांनंतर डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. (D.K. Shivakumar)