दिल्लीतील भीषण अग्नितांडवात 21 जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी खिडक्यांतून उड्या, अनेकांचा गुदमरून मृत्यू

    03-Jun-2026
Total Views |
DELHI FIRE NEWS
 
नवी दिल्ली : (Delhi Fire Accident) देशाच्या राजधानी नवी दिल्लीत मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अग्नितांडवात मृतांचा आकडा 21 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की जीव वाचवण्यासाठी अनेकांना इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून उड्या माराव्या लागल्या, तर अनेकांचा दाट धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मालवीय नगरमधील हौज राणी परिसरातील पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये बुधवारी सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही क्षणांतच आग आणि धुराने संपूर्ण इमारत वेढली. इमारतीत हॉटेल आणि निवास व्यवस्था असल्याने अनेक पाहुणे आत अडकले. त्यापैकी काही परदेशी नागरिक भारतात वैद्यकीय उपचारांसाठी आले होते. (Delhi Fire Accident)
 
आगीची तीव्रता वाढताच वरच्या मजल्यांवर अडकलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि बाल्कनीतून उड्या मारण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी खाली गाद्या टाकून काही जणांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांना धुरामुळे श्वास घेता आला नाही आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
 
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दल, पोलिस आणि आपत्कालीन पथकांनी संयुक्त बचावमोहीम राबवत 37 जणांना सुरक्षित बाहेर काढले. जखमींना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
 
प्राथमिक माहितीनुसार आग रेस्टॉरंटमधून सुरू झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाडाच्या शक्यतेचा तपास सुरू आहे.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच संबंधित यंत्रणांकडून बचाव आणि मदतकार्यावर लक्ष ठेवले जात असल्याचेही सांगितले जात आहे.
 
या घटनेने दिल्लीसह संपूर्ण देश हादरला असून व्यावसायिक आणि निवासी इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Delhi Fire Accident)