दक्षिण लेबेनॉनमधील ९०० वर्षे जुन्या ऐतिहासिक ब्युफोर्ट किल्ल्यावर इस्रायली सैन्याने ताबा मिळवला. लिटानी नदीच्या पलीकडे जाऊन करण्यात आलेली ही कारवाई गेल्या दोन दशकांतील इस्रायलची सर्वांत खोल लष्करी कारवाई मानली जाते. नाममात्र युद्धविराम लागू असतानाही इस्रायलने घेतलेला हा निर्णय या किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्वच अधोरेखित करतो.
ब्युफोर्ट किल्ल्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे भौगोलिक स्थान. हा किल्ला लिटानी खोर्याकडे नजर ठेवणार्या एका अत्यंत उंच आणि खडकाळ डोंगररांगेवर वसलेला. नबातियेह परिसरात आणि इस्रायलच्या सीमेपासून अवघ्या १४ किमीवर असलेल्या या ठिकाणावरून दक्षिण लेबेनॉन आणि उत्तर इस्रायलचा अतिशय विस्तृत भूभाग स्पष्टपणे दिसतो. लष्करी रणनीतीकारांच्या मते, हा पश्चिम आशियातील सर्वोत्तम निरीक्षण बिंदूंपैकी एक आहे. येथे नियंत्रण मिळवल्यामुळे इस्रायली सैन्याला संपूर्ण परिसरातील शत्रूच्या लष्करी हालचालींवर सहज लक्ष ठेवता येईल. या किल्ल्याच्या उंच स्थानाचा फायदा घेऊन इस्रायल तिथे आपला तोफखाना आणि आधुनिक पाळत ठेवणारी यंत्रणा तैनात करू शकतो, ज्यामुळे संपूर्ण परिसरावर त्यांचे लष्करी वर्चस्व निर्माण होईल.
इस्रायलच्या दाव्यानुसार, ‘हिजबुल्ला’ने इराणच्या मदतीने ब्युफोर्ट आणि त्याच्या आसपासच्या डोंगराळ भागात आपले एक मुख्य लष्करी केंद्र उभारले होते. या उंच ठिकाणाचा वापर करून ‘हिजबुल्ला’ आपल्या लष्करी हालचालींचे समन्वय साधत असे आणि येथूनच उत्तर इस्रायलवर व तिथे तैनात इस्रायली सैनिकांवर शेकडो रॉकेट्स डागण्यात येई. या किल्ल्यावर ताबा मिळवून इस्रायलने ‘हिजबुल्ला’ची ही महत्त्वाची ‘फॉरवर्ड डिफेन्स लाईन’ उद्ध्वस्त केली, ज्यामुळे इस्रायली भूभागावरील रॉकेट हल्ल्यांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्याचबरोबर १९८२च्या लेबेनॉन युद्धादरम्यान इस्रायलने हा किल्ला ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’कडून मोठ्या लढाईनंतर जिंकला होता. त्यानंतर २००० सालापर्यंत हा किल्ला लेबेनॉनमधील इस्रायली लष्करी उपस्थितीचे सर्वांत मोठे प्रतीक होता. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या मोहिमेला इस्रायलच्या ‘दृढनिश्चयाचे प्रतीक’ म्हटले आहे. संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी या किल्ल्यावर इस्रायली ध्वज फडकावल्याची घोषणा केली. २० वर्षांनंतर पुन्हा त्याच जागी ध्वज फडकावणे, हा इस्रायली सैन्य आणि जनतेसाठी एक मोठा मानसिक विजय मानला जात आहे.
इस्रायल बर्याच काळापासून ‘हिजबुल्ला’ला लिटानी नदीच्या उत्तरेकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. ब्युफोर्ट किल्ल्यावर ताबा मिळवणे, हा त्याच मोहिमेचा एक भाग. ‘आयडीएफ’ने स्पष्ट केले आहे की, त्यांनी लिटानी नदी ओलांडून उत्तरेकडील भागात आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. हा किल्ला ताब्यात आल्यामुळे इस्रायलला नदीच्या उत्तर भागात पुढील लष्करी मोहिमा राबवणे अधिक सोपे होणार आहे.
थोडयात सांगायचे तर, ब्युफोर्ट किल्ल्यावर नियंत्रण मिळवून इस्रायलने एकाचवेळी अनेक लक्ष्ये साध्य केली आहेत. यामुळे केवळ ‘हिजबुल्ला’च्या आक्रमक क्षमतेला मोठा धक्का बसलेला नाही, तर उत्तर इस्रायलच्या संरक्षणासाठी इस्रायलला एक अभेद्य ’वॉचटॉवर’ मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कारवाईवर कितीही टीका होत असली, तरी आपल्या दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीने इस्रायल या ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणावरील आपले नियंत्रण सहजासहजी सोडणार नाही, हे स्पष्ट आहे.
ब्युफोर्ट किल्ल्यावर इस्रायलने मिळवलेले नियंत्रण पाहिले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनीतीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. महाराजांनी किल्ल्यांना केवळ दगड-मातीच्या वास्तू म्हणून नव्हे, तर राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेचे डोळे, कान आणि कवच मानले होते. उंच पर्वतांवरील किल्ल्यांमधून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या मार्गांवर नियंत्रण मिळवणे आणि कमी सैन्यबळातही व्यापक प्रदेशावर प्रभावी वर्चस्व राखणे, हीच शिवरायांची रणनीती होती. ब्युफोर्ट किल्ल्याच्या बाबतीतही इस्रायलने हाच दृष्टिकोन स्वीकारल्याचे दिसते. म्हणूनच ब्युफोर्टवरील विजय हा केवळ लष्करी यश नसून, शिवरायांनी जगाला शिकवलेल्या ‘दुर्गसामर्थ्य आणि दूरदृष्टी’चा आधुनिक काळातील प्रत्यय मानता येईल.