वंचित समाजघटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार : अतुल सावे
03-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Government Schemes Benefits) भटके-विमुक्त, मायक्रो ओबीसी तसेच इतर वंचित समाजघटकांतील पात्र नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
लातूर जिल्ह्यातील वंचित समाजघटकांच्या विविध प्रश्नांवर आयोजित बैठकीत समाज प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक शासकीय कागदपत्रे वेळेत उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.(Government Schemes Benefits)
बैठकीत अनेक पात्र नागरिक केवळ आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, आरक्षण तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याची बाब समोर आली. या पार्श्वभूमीवर प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करणे, जनजागृती मोहीम राबविणे तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.
समाजातील कोणताही पात्र नागरिक केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी शासन स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सावे यांनी यावेळी सांगितले. बैठकीत वंचित समाजघटकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.(Government Schemes Benefits)