वसई रोड रेल्वे टर्मिनस प्रकल्पाला गती; ८६ कोटींच्या मुख्य कामाला सुरुवात

    02-Jun-2026
Total Views |
Railway Project Mumbai
 
मुंबई : (Railway Project Mumbai) मुंबई महानगर क्षेत्रातील वाढत्या रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वसई रोड रेल्वे टर्मिनस प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने या प्रकल्पातील ₹८६ कोटींच्या मुख्य कामाचे कंत्राट दि. १७ एप्रिल २०२६ रोजी मंजूर केले असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
माहिती अधिकार कार्यकर्ते आणि रेल्वे अभ्यासक जॉय फरगोज यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पश्चिम रेल्वेच्या बांधकाम विभागाने हा खुलासा केला आहे.
 
पश्चिम रेल्वेच्या पत्रानुसार, मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये स्टेशन इमारतीचे बांधकाम, नवीन प्लॅटफॉर्म, ट्रॅक वर्क, प्रवासी व वाहनांसाठी सर्क्युलेटिंग एरिया तसेच इतर पूरक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या संपूर्ण कामासाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.(Railway Project Mumbai)
 
 
सध्या प्रकल्पस्थळी ट्रॅक डिस्मॅन्टलिंग, भूतांत्रिक तपासणी, सर्वेक्षण आणि साइट मोबिलायझेशनची कामे सुरू असून ती प्रगतीपथावर असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. याशिवाय, स्कायवॉक आणि पादचारी उड्डाणपूल या पूरक कामांसाठी सुमारे ₹३४ कोटींचे स्वतंत्र निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. या निविदा ३ जून २०२६ रोजी उघडण्यात येणार असल्याची माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे.
 
वसई रोड रेल्वे टर्मिनस प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई सेंट्रल, दादर, बांद्रा टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरील वाढता ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या सेवांचे नियोजन अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या पत्रात प्रकल्प सक्रियपणे राबवला जात असून नियोजित वेळेत पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे.(Railway Project Mumbai)