राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

    02-Jun-2026
Total Views |
PM MODI MEETING
 
मुंबई : (PM Modi Meeting) राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांनी आपल्या कुटुंबासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मंगळवार दि.२ रोजी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी पंतप्रधानांनी त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधत आदिवासी, पीडित, शोषित आणि वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
 
"ही सदिच्छा भेट समाजाच्या उन्नतीसाठी सुरू असलेल्या विकासकार्यांना नवी दिशा आणि प्रेरणा देणारी ठरली आहे." अशी भावना यावेळी खासदार मायाताई इवनाते यांनी व्यक्त केली.
 
हेही वाचा :  महायुतीचा १७ पैकी १७ जागांवर विजय निश्चित;-राज्यात मोठा राजकीय विजय मिळणार; लाडक्या बहिणी योजनेतील पात्रता पुनर्तपासणी होणार - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
 
भेटीदरम्यान पंतप्रधानांनी विशेषतः अतिदुर्गम व वनवासी भागांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी व्यापक प्रमाणात कार्य करण्याची गरज अधोरेखित केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे हे केंद्र सरकारचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
खासदार मायाताई इवनाते यांनी पंतप्रधानांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आदिवासी, पीडित, शोषित व वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.(PM Modi Meeting)