पॅरिस जळताना...

    02-Jun-2026
Total Views |
 
Paris Riots
 
पॅरिस जळताना...
रामचन्द्र कह गए सिया से
ऐसा कलजूग आएगा
हंस चुगेगा दाना दुनका
कौआ मोती खायेगा
 
हिंदी भजनातील हे वर्णन आजचे वास्तव आहे. सध्या घडणाऱ्या घटना या अधिकाधिक आक्रितच वाटू लागल्या आहेत. अशीच एक घटना सध्या फ्रान्समध्येही घडली. साधारणतः मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडल्यावर आक्रमक होणे हा प्राण्यांचा स्वभाव असतो. हाच नियम मनुष्यालाही लागू. पण, पॅरिसमध्ये चक्क आपल्या आवडत्या संघाने स्पर्धा जिंकल्यावर त्या संघाच्या समर्थकांनी हिंसाचार केल्याचे पाहायला मिळाले. वास्तविक, संघ जिंकल्यानंतर हिंसाचार, हेच अनाकलनीय. असो, कलियुगाचा महिमा, दुसरे काय?
 
‌‘चॅम्पियन्स लीग 2026‌’ या स्पर्धेमध्ये पॅरिस सेंट जर्मन या संघाने अर्सेनल या फुटबॉल संघाला नमवत ही स्पर्र्धा जिंकली. या विजयाने सलग दोनवेळा ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी या संघाने केल्याने, पॅरिस सेंट जर्मन या संघाच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. मात्र, हा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी संपूर्ण पॅरिस शहरालाच युद्धभूमीमध्ये रूपांतरित केले. ठिकठिकाणी जाळपोळ केली. तसेच, या संघाच्या समर्थकांनी अनेक दुकाने लुटली, दुकानांना, गाड्यांना आगी लावल्या, तर एका गटाने पोलीस ठाणेच लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पॅरिस शहरामध्ये जवळपास 20 हजार दंगेखोर विरुद्ध 22 हजार पोलीस असे चित्र निर्माण झाले होते. अर्थात, अशी घटना फक्त पॅरिसमध्येच न घडता, फ्रान्समधील 15 शहरांमध्येही दंगल उसळली होती. पोलिसांनी जवळपास 780 जणांना ताब्यात घेतले असून, यामध्ये 82 अल्पवयीनांचाही समावेश आहे. अर्थात, ही घटना यावषचीच नाही, तर गतवषच्या विजयानंतरही पॅरिस सेंट जर्मन या संघाच्या पाठीराख्यांनी असाच हिंसेचा नंगानाच पॅरिसच्या रस्त्यावर केला होता. त्यावेळीही जवळपास 201 जणांना दुखापत झाली होती, तर 500 जणांना अटक करण्यात आली होती.
 
महत्त्वाची लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, समोर आलेल्या काही चित्रफितींमध्ये ‌‘अल्ला-हु-अकबर‌’च्या घोषणाही या दंगेखोरांनी दिल्या. प्रेमाचे प्रतीक असलेला ‌‘आयफेल टॉवर‌’ ज्या शहरात आहे, त्याला हिंसेचे ग्रहण का लागावे, असा प्रश्नही समाजमाध्यमांवर चर्चिला जात आहे. याला उत्तर आहे, स्थलांतरितांविषयीचा पुळका! आज एकट्या पॅरिसमध्ये स्थलातरितांची एकूण संख्या 20 टक्के आहे. यांपैकी 21 टक्के स्थलांतरित हे परदेशी आहेत. पॅरिसमध्ये साडे पाच लाखांहून अधिक परदेशी नागरिक असून, प्रमुख स्थलांतरितांमध्ये आफ्रिकन आणि आशियातील नागरिकांचा समावेश आहे. तथाकथित मानवतेच्या आडून या स्थलांतरितांना आपलेसे केल्याचे परिणाम, आज फ्रान्सला भोगावे लागत आहेत.
 
या प्रश्नाचे उत्तर केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत शोधून सापडणार नाही, तर त्यासाठी मानवी मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि आधुनिक संस्कृतीतील बदलांचाही वेध घ्यावा लागेल. 19व्या शतकातील फ्रेंच मानसशास्त्रज्ञ गुस्ताव ले बॉन यांनी ‌‘क्राऊड सायकोलॉजी‌’चा सिद्धांत मांडला होता. त्यांच्या मते, व्यक्ती एकटी असताना ज्या प्रकारे विचार करते, त्यापेक्षा समूहाचा भाग बनल्यानंतर तिचे वर्तन पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळेच, जेव्हा देशाच्या कायद्याविषयी आत्मीयता नसणाऱ्या समाजात एखादी व्यक्ती राहते, तेव्हा तीदेखील असाच विचार करू लागते. फ्रान्स आणि युरोपमध्ये नेमके हेच बघायला मिळत आहे.
 
युरोपीय समाज स्वतःला अधिक प्रगत, वैज्ञानिक आणि विवेकनिष्ठ मानतो. बाकींच्यावर त्यांनी आजवर मागासलेपणाचे आरोप करण्यातच धन्यता मानली; मात्र विजयाच्या आनंदात हिंसाचार करणे, हे कोणते विवेकनिष्ठ वर्तन? तंत्रज्ञान आणि भौतिक प्रगती झाली, म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढली, असे नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, नियंत्रण नसलेले मन हे मनुष्याचे शत्रू होते, तर संयमित मनच त्याचे मित्र ठरते! ही शिकवण आज युरोपने अभ्यासणे आवश्यक आहे. मानवी आयुष्यात दुःख आणि आनंद यांचा खेळ सुरूच राहतो. डोंगराएवढे दुःख जरी माणूस सहज पचवत असला, तरी जवाएवढा आनंद त्याला सहज पचवता येत नाही, हेच पॅरिसच्या घटनेने अधोरेखित केले.
 
- कौस्तुभ वीरकर