बंगालमध्ये राष्ट्रहिताचे वारे, जनहितार्थ सारे...

    02-Jun-2026   
Total Views |
Chicken Neck Security
 
‘चिकन नेक‌’ या भागाला असलेला बाह्यशत्रूंचा धोका गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढला होता. त्याच्या उपाययोजनेसाठी आवश्यक जमीन केंद्र सरकारला देण्यास बंगालमधील ममता सरकारने टाळाटाळ केल्याने, राष्ट्रसुरक्षेला धोका निर्माण झाला होता. मात्र, आता प. बंगालमधील सत्तांतरानंतर सुवेंदू अधिकारी सरकारने राष्ट्रहिताला प्राधान्य देत, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून, सीमासुरक्षेला बळकटीच दिली आहे.
 
प. बंगालमध्ये सत्तांतर झाले आणि तेथील भाजप सरकारने, ‌‘सिलीगुडी कॉरिडॉर‌’ किंवा ‌‘चिकन नेक‌’या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चिंचोळ्या भूभागाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या हेतूने निर्णय घेण्यास प्रारंभ केला. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असले की, त्या सरकारकडून लगेच कसे योग्य निर्णय घेतले जातात, ते या लहानशा उदाहरणावरूनच दिसून येते. या ‌‘चिकन नेक‌’ परिसरात योग्य अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि त्या भागातील सीमेवर कुंपण घालण्यासाठी, प. बंगालच्या सरकारने लगेचच 75 हेक्टर जमीन ‌‘सीमा सुरक्षा दला‌’ला देण्याचा निर्णय घेतला. ही जमीन देण्यात आल्याने 27 किमी सीमेवर कुंपण घालणे शक्य होणार आहे. प. बंगाल सरकारने सुरुवातीस 75 हेक्टर जमीन दिली असली, तरी ते सरकार लवकरच 600 हेक्टर जमीनही याच कामासाठी हस्तांतरित करणार आहे.
 
त्याचप्रमाणे सिलीगुडी मार्गिकेवरील 121 हेक्टर जमीन आणि त्या राष्ट्रीय महामार्गावरील सात महत्त्वाचे भूभागही, केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिलीगुडी मार्गिका ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचीच मार्गिका आहे. तसेच, प. बंगाल राज्याचा विचार करताही, ही मार्गिका महत्त्वाची अशीच. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्वरितच त्या दृष्टीने पावले उचलली, हे महत्त्वाचे! ‌‘चिकन नेक‌’ किंवा सिलीगुडी मार्गिका हा प. बंगालमधील जमिनीचा एक अरुंद पट्टा आहे. 20 ते 22 किमी रुंद आणि सुमारे 60 किमी लांब असलेला हा पट्टा, प. बंगालमधील जलपैगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यात आहे. या मार्गिकेमुळे ईशान्येकडील सिक्कीमसह आठ राज्ये भारताच्या मुख्य भागाशी जोडली जातात. हा भूभाग अत्यंत संवेदनशील असून, तो विविध आंतरराष्ट्रीय सीमांशीही जोडला गेला आहे.
 
सिलीगुडी मार्गिकेच्या पश्चिमेस नेपाळ, उत्तरेस भूतान, दक्षिणेस बांगलादेश आणि पूर्वेस चीनचा भूभाग आहे. ही मार्गिका म्हणजे, ईशान्येकडील राज्यांना जोडणारी जीवनरेखाच ठरते. ईशान्य भारतातील चार कोटी जनतेस केला जाणारा पुरवठा आणि लष्कराला पुरविली जाणारी रसद याच मार्गिकेद्वारे जाते. प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारने, आपल्या 15 वर्षांच्या राजवटीत या मार्गिकेकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. महत्त्वाचे महामार्ग हस्तांतरित करण्यात ममता सरकारकडून विलंब झाला. या मार्गिकेच्या माध्यमातूनच, बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली. सिलीगुडी हे या मार्गिकेवरील महत्त्वाचे शहर. ईशान्य भारतासमवेत व्यापार करण्याच्या दृष्टीने, सिलीगुडी हे अत्यंत महत्त्वाचे व्यापारी केंद्र. या भागाचे हे महत्त्व लक्षात घेता, त्या परिसरात मोठ्या संख्येने बेकायदेशीर नागरिक वस्ती करून राहिले. तसेच आसपासच्या जिल्ह्यांमधील लोकसंख्येचा विचार करता, त्यात महत्त्वाचे बदल झाल्याचेही दिसून आले. उदाहरणार्थ, उत्तर दिनाजपूर जिल्हा हा आता मुस्लीमबहुल जिल्हा झाला आहे.
 
सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा सिलीगुडी मार्गिकेकडे योग्य लक्ष न दिल्याने, तेथील आव्हाने वाढली असल्याचे दिसते. डोकलाम परिसरात भारतीय सैन्याकडून जो पराभव झाला, तो चीन विसरलेला नाही. भूतान सरकारच्या विनंतीवरून, भारतीय सैन्याने दि. 16 जून 2017 या दिवशी डोकलाम भागात प्रवेश केला. त्या भागात चीनकडून जो रस्ता बांधला जात होता, ते काम भारतीय सैन्याने रोखले. दि. 28 ऑगस्ट 2017 या दिवशी, चिनी सैन्याला तेथून माघारही घ्यावी लागली होती. हा सर्व पूर्व इतिहास लक्षात घेऊनच, सिलीगुडी मार्गिका अधिक सुरक्षित होण्याच्या हेतूने सुवेंदू अधिकारी सरकारने सत्तेवर येताच, लगेच काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे, आता ही मार्गिका अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत. या भागात जे घुसखोर वसले आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांचीही बांगलादशात हकालपट्टी करण्याची प्रक्रिया या ‌‘डबल इंजिन‌’ सरकारमुळे सुकर होणार आहे.
 
अढाई दिन का झोपडा!
 
इस्लामी आक्रमकांनी दहाव्या आणि 11व्या शतकामध्ये, राजस्थानमध्ये अजमेर येथे असलेले मंदिर आणि त्या मंदिराच्या परिसरात असलेले एक संस्कृत विद्वत्केंद्र उद्ध्वस्त केले. शिवाय, त्या परिसराचे मशिदीमध्ये परिवर्तन केले. हिंदू समाजाच्या या विद्वत्केंद्रास आज ‌‘अढाई दिन का झोपडा‌’ म्हणून ओळखले जाते. हिंदू मंदिराच्या खाणाखुणा, देवदेवतांच्या मूत, संस्कृत भाषेतील शिलालेख आदी अजूनही विद्यमान असलेल्या या परिसरास ‌‘मशीद‌’ म्हणून ओळखले जावे, हे हिंदू समाजाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. ‌‘अढाई दिन का झोपडा‌’ म्हणून ओळखली जाणारी ही मशीद, एके काळी भव्य असे संस्कृत विद्यापीठ होते. हे स्थान अजमेर शहरात असून, इसवीसन 1192 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने हा मंदिर परिसर उद्ध्वस्त केला, असे इतिहास सांगतो.
 
महमद घोरी हा अजमेरला आला असताना, त्याने त्या भागात अनेक मंदिरे पाहिली आणि आपला सेनापती कुतुबुद्दीन ऐबक यास, ती मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला. 60 तासांच्या आत तेथे मशीद उभारण्याचाही आदेश त्याने दिला. 60 तासांमध्ये मशीद उभारणे काही जमले नाही; पण तेथे विटांची एक भिंत उभारण्यात आली. महमद घोरी यास नमाज पढण्यासाठी विटांची भिंत उभारण्यात आली. नंतर पुढे ही मशीद उभी राहिली. कुतुबुद्दीन ऐबकचा उत्तराधिकारी असलेल्या इल्तुत्मिश याने, 1213 मध्ये ही मशीद ‌‘सुशोभित‌’ केली. संस्कृत विद्यालय आणि मंदिर परिसर नष्ट करून जी मशीद उभारली गेली, त्यास ‌‘अढाई दिन का झोपडा‌’ म्हणून ओळखले जाते.
 
1875-76 या कालखंडात त्या परिसरात जे पुरातत्त्वीय सर्वेक्षण करण्यात आले, त्यात तेथे संस्कृत विद्यालय असल्याचा शिलालेख प्राप्त झाला. तसेच अनेक देवदेवतांच्या मूतही मिळाल्या. तसेच देवनागरी भाषेत मजकूर लिहिलेल्या काही शिळादेखील आढळल्या. त्यामध्येही काही संस्कृत गद्य आणि काव्य यांचा समावेश आहे. जेम्स टॉड नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने 1819 मध्ये त्या परिसरास भेट दिली होती. त्यानंतर त्याने लिहिलेल्या पुस्तकात “हिंदू वास्तुकलेचे सर्वांत उत्तम उदाहरण, आणि सर्वांत प्राचीन स्मारकांपैकी एक‌’ असा त्या परिसराचा उल्लेख केला. अनेक मंदिरे आणि संस्कृत विद्यालय नष्ट करून, त्या मंदिरांच्या अवशेषांचा वापर करून जी मशीद उभारण्यात आली, त्यास ‌‘अढाई दिन का झोपडा‌’ म्हणून ओळखले जाते. हिंदू मंदिराच्या खाणाखुणा, शिलालेख आजही तेथे आढळतात. पण, तरीही हा परिसर ‌‘अढाई दिन का झोपडा‌’ म्हणूनच ओळखला जातो, याला काय म्हणायचे!
 
‌‘विहिंप‌’कडून हत्येचा निषेध
 
कॅनडामध्ये गुजराती हिंदू विद्यार्थिनी विधी मेघा हिची, नायगारा भागात हत्या करण्यात आली. कॅनडामधील भारतीय नागरिकांना ठरवून लक्ष्य केले जात असल्याबद्दल, आणि विधी मेघा हिच्या हत्येबद्दल कॅनडाच्या ‌‘विश्व हिंदू परिषदे‌’ने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. कॅनडा सरकारने विधी मेघा हिच्या हत्येस जबाबदार असलेल्यांविरुद्ध त्वरित कारवाई करावी आणि कॅनडामधील भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करावी, असे आवाहन ‌‘विश्व हिंदू परिषदे‌’ने कॅनडा सरकारला केले. विधी मेघा ही 22 वर्षांची विद्यार्थिनी, उच्च शिक्षण घेण्यासाठी गुजरातमधील आणंद जिल्ह्यातून कॅनडात आली होती. तिची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या घटनेनंतर, कॅनडामधील भारतीयांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कॅनडा, अमेरिका आणि अन्य काही देशांमध्ये, भारतीय नागरिकांच्या विरुद्ध वांशिक हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. 2018 ते 2025 या कालावधीत, कॅनडामध्ये 17 भारतीयांना आपले प्राण गमावावे लागले, अशी सरकारी सूत्रांची माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‌‘विश्व हिंदू परिषदे‌’ने विधी मेघाच्या हत्येबद्दल चिंता व्यक्त केली. अशा घटना घडू नयेत, म्हणून कॅनडामधील हिंदू समाजाने सामूहिक कृती करण्याची आवश्यकता असल्याचेही आवाहन, ‌‘विश्व हिंदू परिषदे‌’ने तेथील हिंदू समाजास केले आहे.
 
9869020732




दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.