भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी; पाकिस्तानस्थित हँडलर्सशी दुवा असल्याचा संशय

    02-Jun-2026
Total Views |
Narpoli Police Station
 
मुंबई : (Narpoli Police Station) भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा तपास यंत्रणांनी केला आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अटक केलेले दानियाल अशरफ (23) आणि कृष्णा मिश्रा (20) हे आरोपी पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या संपर्कात असल्याचा आरोप असून, त्यांनी पोलिसांवर हल्ल्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दानियाल अशरफ काही काळ भिवंडीत वास्तव्यास होता. त्याने नरपोली पोलीस ठाण्याचे फोटो तसेच परिसरातील पुलाचा 18 सेकंदांचा व्हिडिओ तयार करून तो पाकिस्तानस्थित हँडलर्सना पाठवला होता. हे फोटो आणि व्हिडिओ शहजाद भट्टी या पाकिस्तानस्थित गँगस्टरकडे पाठवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
 
तपास यंत्रणांच्या मते, वांद्रे येथील गरीब नगर परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवताना करण्यात आलेल्या अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर हल्ला करण्याचा कट रचला जात होता. या पार्श्वभूमीवर भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
हेही वाचा :  मीरा-भाईंदर परिसरात केरळ स्टोरीची पुनरावृत्ती!;जिहादी शब्बास शेख विरोधात गुन्हा दाखल
 
या संपूर्ण नेटवर्कचे संबंध कथितपणे शहजाद भट्टी आणि "तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान" (Tehreek-e-Taliban Hindustan) या संघटनेशी असल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत. तसेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) यांचीही भूमिका तपासली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना पैशांचे आमिष दाखवून संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.(Narpoli Police Station)
 
उत्तर प्रदेश एटीएसने मे महिन्यात दानियाल अशरफ आणि कृष्णा मिश्रा यांना अटक केली होती. त्यांच्या मोबाईलमधून व्हिडिओ, व्हॉइस नोट्स, व्हॉट्सअॅप ग्रुप कॉल्स, संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे आणि पाकिस्तानस्थित संशयित क्रमांकांशी झालेल्या संपर्काचे पुरावे मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास विविध केंद्रीय आणि राज्य यंत्रणांकडून सुरू आहे.(Narpoli Police Station)