मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; पाच महिन्यांत महाराष्ट्रातील तीन पर्वतीय बोगद्यांचे उत्खनन पूर्ण

पालघरमधील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे ब्रेकथ्रू पूर्ण

Total Views |
Mumbai Ahmedabad Bullet Train
 
मुंबई : (Mumbai Ahmedabad Bullet Train) मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील कामांना आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अंबेसरी गावाजवळील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे (MT-07) ब्रेकथ्रू यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, प्रकल्पाच्या प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रातील तीन पर्वतीय बोगद्यांचे उत्खनन पूर्ण झाले असून, हा प्रकल्पातील सर्वाधिक आव्हानात्मक विभागांपैकी एक मानला जातो.
 
४१७ मीटर लांबी आणि १४.४ मीटर रुंदी असलेल्या या बोगद्याची रचना बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गिकांसाठी करण्यात आली आहे. बोगद्याचे उत्खनन दोन्ही टोकांवरून नियंत्रित ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आले. उत्खननादरम्यान संरचनेची स्थिरता, सुरक्षितता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक भू-तांत्रिक उपकरणे आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणालींचा वापर करण्यात आला.(Mumbai Ahmedabad Bullet Train)
 
कामादरम्यान परिसरातील कंपन, जमिनीची हालचाल आणि जवळील संरचनांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे सातत्याने निरीक्षण करण्यात आले. यासाठी सरफेस सेटलमेंट पॉइंट्स (SSP), 3D टार्गेट्स, स्ट्रेन गेजेस आणि सिस्मोग्राफ्स यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांची मदत घेण्यात आली. तसेच बोगद्यामध्ये कार्यरत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी वायुवीजन व्यवस्था, अग्निसुरक्षा प्रणाली, नियंत्रित प्रवेश आणि सातत्यपूर्ण भू-तांत्रिक निरीक्षणावर विशेष भर देण्यात आला.
 
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण आठ पर्वतीय बोगद्यांचा समावेश आहे. त्यापैकी सात बोगदे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात तर एक बोगदा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. आतापर्यंत MT-08, MT-07, MT-06 आणि MT-05 या चार बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण झाले आहेत. MT-04 मध्ये सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून MT-03 मध्ये ८० टक्क्यांहून अधिक उत्खनन झाले आहे. MT-02 आणि MT-01 या बोगद्यांची कामेही वेगाने सुरू आहेत.
 
या प्रगतीमुळे वापी आणि बोईसर या दोन महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांदरम्यानचा संपूर्ण पर्वतीय विभाग आता पूर्णपणे खुला झाला आहे. या मार्गावरील MT-08, MT-07 आणि MT-06 हे तिन्ही बोगदे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील औद्योगिक संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.