मत्स्यसंवर्धनाची बंदी, मच्छीमारांसाठी देवदर्शनासह पर्यटनाची संधी

    02-Jun-2026
Total Views |
Monsoon Fishing Ban
 
खानिवडे : (Monsoon Fishing Ban) पावसाळ्याच्या प्रारंभी लागू होणाऱ्या वार्षिक मासेमारी बंदीमुळे सध्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना काहीसा निवांतपणा लाभला असून, या काळात देवदर्शन आणि पर्यटनाला प्राधान्य दिले जात आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांकडे मच्छीमार कुटुंबांचा ओढा वाढला आहे.
 
राज्य सरकारकडून सागरी मासेमारी अधिनियमानुसार दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या ४५ दिवसांच्या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात येते. पावसाळ्यातील वादळी हवामान, माश्यांचा प्रजनन काळ आणि मत्स्यसंपत्तीचे संवर्धन या उद्देशाने ही बंदी लागू केली जाते. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटी सध्या किनारी गावांमध्ये स्थिरावल्या आहेत.
 
पावसाळ्यात माश्यांची अंडी व लहान पिल्लांचे संरक्षण होऊन मत्स्यसंपत्ती वाढण्यास मदत होते. गेल्या काही वर्षांत मत्स्यउत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन शासनाने लागू केलेल्या या निर्णयाला मच्छीमार संघटनांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिणामी शाश्वत मत्स्यव्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट होत आहे.
 
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लाखो मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. विविध नैसर्गिक संकटे, बदलते हवामान आणि किनारपट्टीवरील विकास प्रकल्पांच्या आव्हानांनंतरही हा पारंपरिक व्यवसाय आजही टिकून आहे.(Monsoon Fishing Ban)
 
मासेमारी बंदीच्या काळात मच्छीमार बोटींची दुरुस्ती, रंगकाम, इंजिनांची देखभाल तसेच फाटलेल्या जाळ्यांची विणणी अशी कामे पूर्ण करतात. या कामांनंतर मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत अनेक जण कुटुंबासह धार्मिक आणि पर्यटनस्थळांच्या सहलींचे नियोजन करतात.
 
महाराष्ट्रातील एकविरा देवी, पंढरपूर, तुळजाभवानी, गाणगापूर, शिर्डी, शनिशिंगणापूर, अष्टविनायक तसेच कोकणातील विविध देवस्थानांना भेटी दिल्या जातात. याशिवाय गोवा, बारा ज्योतिर्लिंगे, वैष्णोदेवी, तिरुपती बालाजी, अमरनाथ यात्रा, जगन्नाथ पुरी, अमृतसरचे सुवर्णमंदिर आणि चारधाम यात्रा यांसारख्या देशातील प्रमुख धार्मिक स्थळांनाही मच्छीमार कुटुंबे पसंती देत आहेत.
बंदी कालावधी संपल्यानंतर नारळी पौर्णिमेला समुद्रपूजन करून पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रात उतरण्याची तयारी मच्छीमारांकडून सुरू होणार आहे.(Monsoon Fishing Ban)