मुंबई : (MHADA Mumbai) म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,६४० सदनिकांच्या संगणकीय सोडतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला तरी विधान परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे सोडतीची प्रक्रिया तात्पुरती रखडली आहे. सोडतीसाठी तब्बल ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले असून प्रति सदनिका सरासरी २८.५४ अर्ज दाखल झाले आहेत.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांमुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असून ती दि. २५ जून २०२६ पर्यंत प्रभावी राहणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई मंडळाने कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ-सिद्धार्थनगर गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई, सुभाषनगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर, अँटॉप हिल आदी भागांतील २,६४० सदनिकांची सोडत जाहीर केली होती.
या घरांसाठी बाजारभावापेक्षा कमी किंमत, पार्किंग सुविधा, दर्जेदार बांधकाम आणि महत्त्वाच्या ठिकाणी असलेले प्रकल्प यामुळे अर्जदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, अर्जदारांची प्रारूप यादी दि. १० जून रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. अंतिम पात्र अर्जदारांची यादी १६ जून रोजी जाहीर केली जाईल. मात्र प्रत्यक्ष संगणकीय सोडतीसाठी नागरिकांना आचारसंहिता संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. (MHADA Mumbai)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.