'लव्ह जिहाद' पीडित हिंदू महिलांची क्रूर थट्टा; पुरुषांचाही घोर अपमान; आरफा शेरवानी आणि निवेदिता मेनन यांच्या व्हायरल संवादाने खळबळ

    02-Jun-2026
Total Views |
Love Jihad Controversy
 
मुंबई : (Love Jihad Controversy) डाव्या-उदारमतवादी आणि निधर्मी विचारसरणीचा बुरखा पांघरून स्वतःला पुरोगामी, स्त्रीवादी आणि बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ समजणाऱ्या घटकांचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. वरिष्ठ पत्रकार आरफा खानम शेरवानी आणि जेएनयू विद्यापीठाच्या प्राध्यापिका निवेदिता मेनन यांच्या एका जुन्या पॉडकास्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. यामध्ये या दोन्ही महिला लव्ह जिहादच्या पीडित हिंदू महिलांची क्रूर थट्टा उडवताना आणि हिंदू पुरुषांचा अपमान करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे हिंदू धर्मीयांमध्ये आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
 
फेब्रुवारी २०२६ मध्ये आरफा खानम शेरवानी हिने होस्ट केलेल्या एका पॉडकास्टमध्ये झालेल्या संवादादरम्यान लव्ह जिहाद ही एक गंभीर समस्या आणि नियोजनबद्ध गुन्हेगारी पॅटर्न असल्याचे नाकारत, दोन्ही महिलांनी या संकल्पनेची केवळ चेष्टाच केली नाही, तर याला हिंदू पुरुषांमधील असुरक्षिततेची भावना असल्याचे म्हटले.
 
नेहमी स्त्रीवादाच्या आणि महिलांच्या स्वतंत्र अधिकारांच्या गप्पा मारणाऱ्या आरफा खानमने या पॉडकास्टमध्ये अत्यंत पूर्वग्रहदूषित आणि जातीयवादी विधान केले. तिने विचारले, “हिंदू मुलींना मुस्लिम मुलेच का आवडतात?” यावर प्राध्यापिका निवेदिता मेनन यांनी हसत उत्तर दिले, “मुस्लिम मुले कदाचित खूप आकर्षक असतील आणि हिंदू मुलींना त्यांच्या स्वतःच्या धर्मात तशी मुलं मिळत नसतील.”
 
निवेदिता मेनन यांनी लव्ह जिहाद या संकल्पनेला हिंदू पुरुषांची "लाचारी आणि हतबलतेची अभिव्यक्ती" असे संबोधले. त्यांच्या या संवादातून आणि हसण्यातून, हिंदू महिलांना केवळ 'ट्रॉफी' (करंडक) समजण्याची आणि मुस्लिम पुरुषांच्या कथित श्रेष्ठतेचे प्रदर्शन करण्याची मानसिकताच दिसून येते, असा आरोप नेटकऱ्यांकडून सध्या केला जातो आहे.(Love Jihad Controversy)
 
कॉर्पोरेट जिहाद मधील आरोपींचे तुष्टीकरण
 
नाशिक येथील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण समोर आले तेव्हा आरफा खानम शेरवानी हिने या पीडित हिंदू महिलांना खोटे ठरवत, "मुस्लिम पुरुषांना बेरोजगार करण्यासाठी हा द्वेषातून रचलेला ड्रामा आहे," असा आरोप केला होता. तर निवेदिता मेनन यांनी दावा केला आहे की, 'लव्ह जिहाद' हा शब्द हिंदू राष्ट्रवाद्यांनी तयार केला आहे.
 
निवेदिता मेनन यांनी संपूर्ण पॉडकास्टमध्ये केलेली आक्षेपार्ह विधाने
 
* माझ्याकडे 'द काश्मीर फाइल्स'सारखा अत्यंत सामान्य (थर्ड क्लास) चित्रपट पाहण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे मी तो अद्याप पाहिलेला नाही.
* जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना आमंत्रित केले जात आहे. जो राष्ट्रवाद केवळ द्वेषावर आधारित आहे, अशा व्याख्यानांच्या माध्यमातून समाजात द्वेषाची आग भडकवण्याचा हा प्रयत्न आहे.
* उमर खालिद आणि शर्जिल इमाम यांनी केलेले आंदोलन हे सर्वसामान्य जनतेचे आयुष्य सुरळीत चालावे यासाठीच होते.
* तथाकथित दहशतवाद्यांचे सर्वात मोठे आणि सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 'भगतसिंग'.
 
कोण आहेत निवेदिता मेनन?
 
निवेदिता मेनन या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापिका आणि स्त्रीवादी लेखिका आहेत. २०१६ मध्ये जेएनयू मधील एका आंदोलनादरम्यान त्यांनी राष्ट्रवादावर व्याख्यान दिले होते. या व्याख्यानात त्यांनी कथितपणे "भारताने काश्मीरवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला आहे आणि हे जगभर मान्य केले जाते" असे विधान केल्याचा आरोप झाला. तसेच मणिपूरबाबतही त्यांनी अशाच स्वरूपाची विधाने केल्याचे समोर आले.
 
त्यांच्या एका व्याख्यानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांनी "हिंदू समाज हा जगातील सर्वात हिंसक समाज आहे" असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. २०१७ मध्ये जोधपूर येथील एका विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानादरम्यान त्यांनी भारतीय सैन्य आणि भारत माता या संकल्पनेवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाला होता. त्यांनी समान नागरी कायद्याला 'मुस्लिम विरोधी' म्हणून संबोधले होते. (Love Jihad Controversy)