लातूर विमानतळाला नवसंजीवनी; मराठवाड्याच्या विकासाला नवे पंख; 56.74 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता

Total Views |
Latur Airport
 
मुंबई : (Latur Airport) मराठवाड्याच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लातूर विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी मोठे पाऊल उचलले आहे. लातूर विमानतळावर अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट फ्लाईट रुल्स (IFR) प्रणालीसह नॉन शेड्युल ऑपरेशन्स (NSOP) सुविधा विकसित करण्यासाठी तब्बल 56.74 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
 
या निर्णयामुळे लातूर आणि संपूर्ण मराठवाडा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक ठरण्याची शक्यता आहे. खराब हवामान, धुके किंवा कमी दृश्यमानतेतही विमानांची सुरक्षित उड्डाणे आणि लँडिंग शक्य होणार असल्याने विमानसेवा अधिक विश्वासार्ह बनेल. विमानतळ विकासाच्या कामांमध्ये धावपट्टीचे नूतनीकरण, सुरक्षा क्षेत्र उभारणी, 3.38 किमी लांबीची संरक्षक भिंत, 8 किमी परिमिती रस्ता, आधुनिक प्रकाशयोजना, पीएपीआय प्रणाली, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे नूतनीकरण, अग्निशमन सुविधा आणि सीसीटीव्ही यंत्रणा यांचा समावेश आहे. याशिवाय १० हजार लिटर क्षमतेचे अत्याधुनिक फायर क्रॅश फोम टेंडरही खरेदी करण्यात येणार आहे.
 
 
या प्रकल्पामुळे लातूरमध्ये उद्योग, पर्यटन, वैद्यकीय सेवा आणि शिक्षण क्षेत्राला नवी चालना मिळेल. विशेषतः दुष्काळ व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, कृषी उत्पादनांची जलद वाहतूक आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तज्ज्ञांच्या मते, मजबूत हवाई संपर्कामुळे एखाद्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाचा वेग अनेक पटींनी वाढतो.(Latur Airport)
 
राज्य सरकारने विमानतळाच्या वार्षिक संचालनासाठीही 37.78 लाखांची तरतूद मंजूर केली आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी, व्यवस्थापन कर्मचारी, स्वच्छता सेवा तसेच वीज-पाणी आणि इंटरनेट सुविधांचा खर्च समाविष्ट आहे. लातूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा हा निर्णय केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरता मर्यादित नसून, मराठवाड्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचा पाया ठरणार आहे. आगामी काळात नियमित विमानसेवा सुरू झाल्यास लातूर हे प्रदेशातील महत्त्वाचे हवाई प्रवेशद्वार म्हणून उदयास येऊ शकते.
 
लातूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह आवश्यक पायाभूत सुविधा व सुधारणा कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी मी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून शासनाने लातूर विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 56 कोटी रकमेच्या खर्चास वित्तीय मान्यता दिली आहे. लातूर येथील विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे.
- अभिमन्यू पवार, आमदार, औसा विधानसभा (Latur Airport)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.