मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही - अदिती तटकरे
02-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Ladki Bahin Yojana) "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती आर टी ओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे.
तसेच काही अर्जदारांनी विहित कालावधीत e-KYC न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे." अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवार दि.१ रोजी माध्यमांशी बोलताना दिली. (Ladki Bahin Yojana)
"ज्या अर्जदारांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते. " असेही तटकरे म्हणाल्या.
"महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." असे प्रतिपादन तटकरे यांनी केले. (Ladki Bahin Yojana)