‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः|
सर्वे भद्राणि पश्यन्तु,
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्॥
अर्थात, सर्व सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो. प्रत्येकाने सर्वांच्या चांगल्याची कामना करावी, कोणाचेही वाईट चिंतू नये, असा संदेश देणारी भारतीय संस्कृती! पण, बरेचदा कळत-नकळत ‘अभिध्या’ या आवेगाची लागण होते आणि इतरांचे वाईट व्हावे, ही भावना, तशी कृती केली जाते. त्याविषयी...
धारणीय वेग म्हणजे MENTAL URGES (आवेग), ज्यांना बळी गेले असता त्या व्यक्तीला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. बहुतांशी वेळेस मानस विचारांचा आवेग जेव्हा उफाळून येतो, तेव्हा सदसद्विवेकबुद्धीने सांगितलेले नियम ढाब्यावर बसविले जातात आणि घाईघाईत घेतलेले निर्णय विचार न करता केलेली कृती हातून घडून जाते. हे साहसी कर्म बरेचदा अशस्त्र म्हणजेच निषिद्ध कर्मच असते. इतरांना नुकसान पोहोचविणे (शारीरिक आघात/दुखापत किंवा घालून-पाडून बोलणे, भांडण-तंटा, वाळीत टाकणे इ. इ.) हेच त्यातून सिद्ध केले जाते. शांत डोक्याने आणि खुल्या मनाने विचार केल्यास त्या विचारांच्या प्रभावामुळे केलेली कृती किती चुकीची आहे, ते त्या व्यक्तीला जाणवते. धारणीय मानस आवेगांच्या श्रृंखलेतील पुढील आवेग म्हणजे अभिध्या. ‘अभिध्या’ या शब्दाचा आयुर्वेदातील अर्थ इतरांचे धन मिळविण्याची इच्छा. यालाच 'MALICE' असे ही म्हटले जाते. इतरांचे वाईट चिंतणे म्हणजे 'MALICE' होय. यात इतरांचे बरे-वाईट होणे, नुकसान होणे, इजा होणे ही इच्छा मनात धरून तशी केली जाणारी कृती किंवा तीव्र इच्छा ‘मनसा पर अभिद्रोह चिन्तनम्| (अर्थ - मनात इतरांना त्रास होईल, यातना होतील अशा कृतींचा विचार करणे, चिंतन करणे) ‘परद्रव्ये स्पृहा|’ इतरांच्या ऐहिक सुखावर, (धन, यश, प्रसिद्धी) ही त्यांची न राहता आपल्याकडे यावी, अशी इच्छा करणे. अभिद्रोहचा आयुर्वेदातील अर्थ असा आहे, इतरांना पीडा-यातना होतील अशी इच्छा, प्रवृत्ती मनात धरणे.
प्रत्येक व्यक्ती स्वकष्टाने आयुष्यात पुढे जात असतो. प्रगती, यश, कीत या सगळ्या गोष्टी सापेक्ष असतात. पण, आपल्या वाढीपेक्षा इतरांच्या प्रगतीवर लक्ष देणे, त्यांच्या यशाचा आनंद न होता, त्याबद्दल असुया निर्माण होणे, हे चुकीचे आहे. स्वतःला उत्तम गुण मिळाले म्हणून आनंदी होण्यापेक्षा अबक व्यक्तीला आपल्यापेक्षा कमी गुण मिळाले, यात जास्त आनंद व यशाचा अर्थ असेल, तर ते चुकीचे आहे. ही धोक्याची घंटा आहे. प्रत्येक व्यक्तीने जरी मेहनत सारखीच घेतली, तरी प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमता आणि नशीब भिन्नभिन्नच असते. त्यामुळे एकाची प्रगती दुसऱ्यापेक्षा वेगळीच असणार, असते, हे नक्की. घरातील आर्थिक परिस्थिती (सुस्थिती/बिकट) घरातील प्रत्येक नात्यातील समीकरण (inter-personal relations) हे प्रत्येक घरात वेगवेगळे असते. याचाही परिणाम त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर विविध पातळीवर होताना आढळतो. त्यानुसार स्वभाव घडत जातो. माणसांशी वागणे, बोलणे होते. उदा. घरातील वडीलधारी व्यक्ती जर मारहाण करत असेल किंवा व्यसनाधीन असेल किंवा कुकर्म करत असेल, अलील भाषेचा वापर सर्रास करत असेल, तर लहान मुलांच्या मनावर तसे संस्कार होत जातात. पुढे जाऊन ते मूल (विशेषतः पुरुष व्यक्ती)देखील तसेच वागू लागते. कारण, लहानपणी ‘हे वर्तन चुकीचे आहे,’ असे त्याला कोणी शिकवलेले नसते. ही व्यक्ती चुकीच्या संगतीमुळे चुकीच्या प्रवृत्तींना बळी पडण्याची शक्यता अधिक असते.
असे म्हटले जाते की, लहान मूल म्हणजे ओल्या मातीचा गोळा. त्याला जो आकार देऊ, तसा तो घडत जातो. बनत जाते त्याची बुद्धीही टिपकागदासारखी, स्पॉन्जसारखी असते. सगळे बघितलेले, पाहिलेले, ऐकलेले बरोबर टिपून घेतात. तेव्हाच वेळीच चांगली शिकवण आणि उत्तम संगत लाभणे खूप गरजेचे असते. नको तिथे आणि नको त्या विषयाबद्दल पालकांनीही आपल्या मुलाची इतरांशी तुलना करू नये. फक्त परीक्षेतील गुण उत्तम म्हणजे ते मूल चांगले असे होत नाही. त्या मुलाच्या यशामागची विविध कारणे, बरेच पैलू यांचा विचार होणेही तितकेच गरजेचे आहे. केवळ परीक्षेतील, स्पर्धेतील यश (तुलनात्मक) म्हणजे त्या मुलाचे कौतुक करावे, हे संपूर्णपणे चुकीचे आहे. त्या मुलांच्या प्रयत्नांना वाखाणणे महत्त्वाचे आहे.
कष्ट घेण्याची प्रवृत्ती आणि इतरांच्या यशाने राग/ईर्षा/दुःख/असुया न वाटणे हे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी अतिमहत्त्वाकांक्षी होणे टाळावे. आपल्या पाल्याची शारीरिक-मानसिक-बौद्धिक क्षमता जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधीच्या प्रगतीपेक्षा पुढे वाटचाल सुरू आहे, यश मिळत आहे ना, याकडे फक्त लक्ष केंद्रित करावे. हल्ली विविध माध्यमांतून जे मोठ्या प्रमाणात देशभरात पेपरफुटी, लाचखोरी इ.बद्दल आपण वाचतच आहोत. याला प्रगती म्हणावी की अधोगती? पालक म्हणून त्या व्यक्ती, शिक्षक म्हणून त्या व्यक्ती उत्तीर्ण झाल्या का अनुत्तीर्ण? अशा मोठ्यांकडून काय शिकवण मिळेल? काय आदर्श डोळ्यांसमोर घडवतोय? आणि तेसुद्धा एका डॉक्टकीसारख्या पेशाच्या प्रवेश परीक्षेमध्ये? यातून मनुष्याची किती अधोगती होत चालली आहे, याचे एक उत्तम ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर उघडकीस आले आहे.
देशविदेशांतील नामांकित कंपन्यांमधील धर्मांतरण व तत्सम बातम्या आपण वाचतच आहोत. त्यांना चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे, स्वतःचे मन खंबीर नसल्यामुळे जसे इतरांनी सांगितले, शिकवले, दिशाभूल केली, ते बरोबर वाटू लागले; नाही का? या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट प्रखरतेने लक्षात येते की, शेळीच्या कळपात शेळीचे रूप घेऊन कोल्हा/कोल्हे वावरत आहेत. त्यांच्यावर जर विश्वास ठेवला, तर आपले नुकसानच होणार आहे. ’Quick fixes'ने अल्पकालीन फायदा (short term) क्वचित होतो; पण दीर्घकालीन नुकसानच होणार आहे.
आपले व्यक्तिमत्त्व जर चांगले घडवायचे असेल, तर मेहनतीबरोबरच आचार-विचार उत्तम असणेही अत्यंत गरजेचे आहे. यासाठी चांगली साथ, उत्तम वाचन आणि सकारात्मक गोष्टींचे ध्येय मनात ठरविणे महत्त्वाचे आहे. बरेचदा घरातील एखादी व्यक्ती चुकते, कुमार्गाला लागते किंवा संगत चांगली नसते, त्या एका व्यक्तीमुळे घरातील संपूर्ण वातावरण कलुषित होते, बिघडते. वयात येणारे तरुण-तरुणी बेसुमार वागू लागले की, वडीलधाऱ्या व्यक्तींना ते वागणे बघताना हतबलता जाणवू लागते. आजी-आजोबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कालातीत आहे आणि बुरसटलेली आहे, असे काही समीकरण घराघरांतून होताना दिसत आहे. त्यांनी कितीही समजुतीने, प्रेमाने, काकुळतीला येऊन सांगितले, तरी नातवंडांना ‘इकडून-तिकडून गेले वारे’ असे होते. झोपेच्या सवयी, उठायच्या वेळा, रोजच्या दिनक्रमाची लागलेली वाट, आहारातील सवयी, अभ्यासाची शिस्त प्रत्येक गोष्टीत जो बेशिस्तपणा आला आहे (आणि तो वाढत चालला आहे,) ते डोळ्यांदेखत होताना बघूनही काहीच करता न येण्यामुळे, काहीच बदलू शकत नसल्यामुळे आजी-आजोबा खूप व्यथित होतात, अगतिक होतात. आपल्या नातवंडांचे, (शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांचे) भविष्य बिघडू नये, या विवंचनेत असतात. सतत सांगत राहणे, समजावत राहणे हे तर गरजेचे आहेच; पण काही वेळेस बघ्याची भूमिका फक्त अवलंबविणे, हेदेखील महत्त्वाचे होते.
काळ बदलला आहे, नवीन पिढीसमोर असलेले प्रसंग आणि प्रश्न हे आधीच्या पिढीपेक्षा खूप भिन्न आहेत. त्यामुळे Approach Method देखील बदलावी लागते. हतबलतेतून (Helplessness, Hopelessness) मधून जर बाहेर पडायचे असेल, काही वेळेस परिस्थितीनुरूप मौनव्रतही धारण करावे लागेल. परिस्थिती बघून स्वीकारणे, हेदेखील गरजेचे असते. जरी घरातील व्यक्तींनी सांगितलेली गोष्ट बरोबर असली, तरी समजणे जाणणे आणि आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. हतबल होण्याऐवजी तीच ताकद, तीच ऊर्जा इतर सकारात्मक गोष्टींवर लावणे केंद्रबिंदू बदलून कृती करणे, त्या काळाची गरज असू शकते. विचारांची दिशा बदलून नवीन विचारधारा अंगीकारणे, नवीन लक्ष्ये निश्चित करणे सुरू करावे. स्वतःची प्रकृती, स्वास्थ्य जपावे. ध्यानधारणा, उत्तम आहार, नियमित व्यायाम, नवीन छंद-आवड जोपासून आयुष्यातील नवीन समस्यांना अशा प्रकारे सामोरे जावे. (क्रमशः)
- वैद्य किर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429