काँग्रेसने अनेक वेळा चीन आणि पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली - नवनाथ बन
02-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Congress) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसने अनेक वेळा चीन आणि पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप केला. " देशाच्या सुरक्षा दलांच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित करून पुरावे मागण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केले आहेत. देशहिताच्या मुद्द्यांवर राजकारण करण्याऐवजी काँग्रेसने आपल्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे.दलालीचे आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या पक्षातील नेत्यांची भूमिका तपासावी." असे म्हणत देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार काँग्रेसला नसल्याचा टोला बन यांनी लगावला.
भाजप प्रदेश कार्यालय, नरिमन पॉइंट,मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन मंगळवार दि.२ रोजी बोलत होते.
बन यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचा दावा केला. "विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेतून संजय राऊत यांना दूर ठेवण्यात आले असून, आदित्य ठाकरे यांनी त्यांचा राजकीय पत्ता कापण्यास सुरुवात केली आहे. राऊत यांनी हिंदुत्वाचा त्याग करून काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधल्यामुळेच शिवसेनेची अधोगती झाली आहे. भाजपमध्ये येणारे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येत आहेत."असे बन यांनी स्पष्ट केले. (Congress)
लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत यांच्यावर टीका करताना बन म्हणाले की, "राऊत यांची इच्छा महिलांना या योजनेचा लाभ मिळू नये अशी होती. महिलांना स्वाभिमानाने उभे करण्याचे काम महायुती सरकारने केले असून, काही अपात्र लाभार्थींवर कारवाई होईल, मात्र पात्र महिलांचा लाभ कायम राहील."राऊतांनी सातत्याने योजनेविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही बन यांनी केली.
कांद्याच्या दरावरून रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना बन यांनी शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना किती भाव मिळाला होता, याचा हिशेब मागितला. "महायुती सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली असून अनेक ठिकाणी १५ रुपये प्रतिकिलो अनुदान दिले जात आहे. ज्या ठिकाणी खरेदी सुरू नाही, तेथेही ती लवकरच सुरू केली जाईल."असे बन यांनी स्पष्ट केले.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरील टीकेला उत्तर देताना बन यांनी संजय राऊत यांना निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान दिले. विखे पाटील अनेक वेळा जनतेतून निवडून आले आहेत, तर राऊतांना राज्यसभेवर काँग्रेसच्या मदतीने जावे लागते, असा टोला त्यांनी लगावला. जनतेनेच राऊतांच्या राजकारणाला नकार दिला असल्याचा दावाही बन यांनी केला. (Congress)