दि. 19 मे रोजीच्या याच स्तंभात ‘झुरळांच्या झुंडीशी झुंज’ या लेखातून ‘कॉकरोच जनता पार्टी’ अराजकवादी राजकीय पक्षाचे रूपडे धारण करेल, असे भाकीत वर्तविले होते. ते आता अवघ्या काही दिवसांत सत्यात उतरेल, असेच सध्याचे चित्र. कारण, दि. 6 जून रोजी दिल्लीच्या ‘जंतरमंतर’वर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ही झुरळे एकत्र येणार आहेत. त्यानिमित्ताने...
‘कॉकरोच जनता पार्टी’ अर्थात ‘सीजेपी’चा म्होरक्या अभिजीत दीपके अमेरिकेहून शनिवार, दि. 6 जून रोजी अखेरीस दिल्लीत अवतरणार आहे. ‘नीट’ पेपरफुटी आणि ‘सीबीएसई’च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन घोळाप्रकरणी देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘जंतरमंतर’वर शांततापूर्वक मार्गाने आंदोलनाचे मनसुबे दीपकेने जाहीर केले. तसेच ‘स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर भेटू’ असे ‘सीजेपी’च्या झुरळांना समाजमाध्यमांवरून आवाहनही केले. म्हणजे, अवघ्या महिन्याभरात समाजमाध्यमांच्या आभासी जगातून आता थेट समाजात उतरण्याची ही झुरळांची चपळता विलक्षणच म्हणावी लागेल. आधी ऑनलाईन प्रतिसादाची चाचपणी करायची आणि नंतर ऑफलाईन जगतात ताकदीने झुरळांनी झेप घ्यायची, अशी ही एकूणच पूर्वनियोजित रणनीती. पण, दीपके आणि ‘सीजेपी’च्या झुरळांनी एक बाब ध्यानात घ्यावी की, 140 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात आंदोलनासाठी गद जमविणे अगदी सोपे असले, तरी ती गद कायम आपल्या पाठीशी समर्थपणे उभी राहील, यासाठी वर्षानुवर्षांची अथक साधना, परिश्रम हे अपरिहार्यच!
भारतीय राजकारणाला विद्याथ आंदोलनातून निर्माण झालेल्या नेतृत्वाची आणि नेत्यांची म्हणा मोठी परंपरा. अरुण जेटली, नितीन गडकरी ते अगदी देवेंद्र फडणवीसांपर्यंत अशी कित्येक बड्या नेत्यांची नावे घेता येतील. व्यक्तिनिर्माणाच्या संस्कारांचे बीजारोपण करणाऱ्या भाजप आणि संघ परिवारात ही प्रक्रिया निरंतर सुरू होती, आहे आणि ती भविष्यातही राहील. पण, देशातील अन्य पक्षांमध्ये अशाप्रकारे नेतृत्वनिर्माणाची प्रक्रिया बव्हंशी घराणेशाहीच्या रोगामुळे खुंटलेलीच दिसते. आणि नाही म्हणायला, स्वतःला ‘विद्याथ नेता’ म्हणवून घेणाऱ्या कन्हैय्या कुमारछाप ‘जेएनयू’बहादुरांचे पुढे काय झाले, ते वेगळे सांगायला नको. कोणेएकेकाळी कम्युनिस्टांची ‘लाली’ प्रिय असलेल्या कन्हैय्याला स्वअस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसचा ‘हात’ धरावाच लागला. 2019 साली कम्युनिस्टांच्या तिकिटावरून आपल्याच राज्यात-बिहारच्या बेगूसरायमधून आणि नंतर 2014 साली काँग्रेसच्या तिकिटावरून उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून, असा कन्हैय्याला एकदा नव्हे, तर दोनदा जनतेने मतपेटीतून जबरदस्त धोबीपछाड दिला. यानिमित्ताने सांगायचा मुद्दा एवढाच की, ‘विद्यार्थी नेता ते राजकीय नेता’ हे स्थित्यंतर पूर्वीसारखे सरळ, साधे आता अजिबात राहिलेले नाही. त्याउलट, राष्ट्रविरोधी थिल्लरपणामुळे अशा विद्यार्थी नेत्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही गेल्या दोन दशकांत प्रकर्षाने कलुषितच झाला. म्हणजे, ‘जेएनयू’मध्ये धिंगाणा घालणारे, ‘भारत तेरे तुकडे होंगे’ची राष्ट्रद्रोही नारेबाजी करणाऱ्यांना हा देश, इथले तरुण, ‘जेन-झी’ मतदार आता वाऱ्यालाही उभे करणार नाही, हे कन्हैय्या आणि त्याच्यासारख्या उपद्रवींच्या अधोगतीतून एव्हाना सिद्ध झाले आहेच.
खरं तर, एखादा राजकीय पक्ष स्थापन करणे सोपे. भारतात तर असे 2 हजार 927 इतके पक्ष नोंदणीकृत. पण, हे पक्ष यशस्वी करण्यासाठी, ते ज्या उद्देशासाठी स्थापन झाले, त्या उद्देशाप्रतिची प्रामाणिकता, त्यासाठी लढण्याचा निर्धार आणि मुख्यत्वे समर्पित कार्यकर्त्यांची शक्ती पाठीशी लागते. ते म्हणतात ना, राजकीय पक्षाच्या यशस्वितेसाठी ‘मनी, मसल आणि मीडिया’ या तीन ‘एम’ची उत्तम सांगड घालावी लागते. ‘आम आदमी पक्षा’नेही अल्पावधीत या तीन ‘एम’ची येनेकेनप्रकारेण जुळवाजुळव करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली. अण्णांच्या आंदोलनाची पुण्याई हा तर ‘आप’साठी फुकटचा ‘बोनस’च ठरला. पण, भ्रष्टाचारविरोधातील ‘आप’चा ‘झाडू’च नंतर भ्रष्टाचाराने इतका बरबटला की, अखेरीस जनतेने केजरीवालांना राजकीय पटावरूनच कचऱ्यासारखे झाडून साफ झिडकारले. दशकभरापूव बाळसे धरलेल्या ‘आप’ची ही स्थिती, पण 140 वर्षांचा इतिहास पाठीशी असलेल्या काँग्रेसची देशात आज काय स्थिती आहे? त्यामुळे निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतात. पण, राजकारणात पाय भक्कमपणे रोवून उभे राहायचे असेल, तर साहजिकच पक्षाचा आलेख चढाच हवा. भाजपने अवघ्या दोन खासदारांपासून ते आता 200 पेक्षा अधिक खासदारांपर्यंत मारलेली मजल, 21 राज्यांतील मित्रपक्षांसह सत्ता, हे सारे राजकीय यश नेत्रदीपकच. पण, त्यामागेही कित्येक दशकांची तपश्चर्या, त्याग आहेच. आजचा जमाना हा तसा ‘इन्स्टंट’चा. राजकारणातही बरेचदा अशा ‘इन्स्टंट’ प्रयोगांना यश मिळते. तामिळनाडूतील ‘टीव्हीके’चे राजकीय यशही याच पठडीतले. पण, बरेचदा हे ‘इन्स्टंट’ यश तात्पुरता ‘स्टंट’ ठरण्याचीच शक्यता अधिक असते. आता पुन्हा एकदा ‘विद्याथ नेता’ या फसलेल्या राजकीय साच्यात अभिजीत दीपके आणि त्यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या झुरळांचा नवा प्रयोग दि. 6 जूनपासून देशात पाहायला मिळणार आहे.
दीपके हा माध्यमांमध्ये झळकण्यासाठी रणनीती आखण्यात हुशार असला, तरी पिंडाने तो अजिबात नेता नाही. तसेच दीपके आणि त्याच्यासारख्या उपद्रवींकडे तरुणांसाठी, देशासाठी, समाजहितासाठी मुळात दीर्घकालीन वास्तववादी अशा ‘व्हिजन’चाही अभावच! त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आणि त्याच विद्यार्थ्यांच्या जीवावर पुढे राजकीय पक्षाची स्थापना करून, निवडणुका लढवून पुढे सरकार वगैरे स्थापन करणे, या परस्पर भिन्न गोष्टी! शेजारी नेपाळचेच उदाहरण घ्या. ‘जेन-झी’ने डोक्यावर बसवलेला तरुण राजकारणी बालेन शाह पंतप्रधान झाला खरा. पण, ‘100 पॉईंट अजेंडा’मधील अवघ्या 12 आश्वासनांचीच पूर्तता करण्यात तो दोन महिन्यांत यशस्वी ठरला. त्यामुळे राजकारण आणि त्यातही देशाचे नेतृत्व करणे, हे येड्यागबाळ्याचे मुळी कामच नाही. त्यासाठी राष्ट्रवादी विचारांचे अधिष्ठानही हवे आणि अनुभवी, कणखर नेतृत्वही! हे बघता, दीपकेचे आंदोलनही अल्पायुषीच ठरण्याची शक्यता अधिक. त्यामुळे ‘आमचे आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव’ नामक हे राजकीय नाट्य दि. 6 जूनपासून दिल्लीत पुढील काही दिवस नित्यनेमाने रंगलेले पाहायला मिळेल.
म्हणूनच, देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रसारमाध्यमांना इशारा देताना ‘सकारात्मक’ पत्रकारितेचे नुकतेच आवाहन केले. ते म्हणाले, “माध्यमांनी केवळ नकारात्मकतेला प्रसिद्धी न देता, देशातील यशोगाथांना प्राधान्य दिले पाहिजे; अन्यथा तरुण पिढी दिशाहीन होऊन ‘कॉकरोच जनता पार्टी’सारख्या समाजमाध्यमांवरील उपरोधिक घटकांच्या मागे धावू लागेल.” तरीही दि. 6 जूनपासून दिल्लीत ‘मोदी सरकार मुर्दाबाद’ची नारेबाजी‘, ‘मी अण्णा’प्रमाणे ‘मीसुद्धा झुरळ’च्या टोप्या आणि एकूणच आंदोलनजीवींचे अराजक डोके वर काढेल. देशातील बहुसंख्य ‘जेन-झी’ अशा झुरळांना बळी पडणार नाहीच. पण, जे त्यांच्या कच्छपी लागतील, त्यांनी ठरवावे की, त्यांचा नेता झुरळासारखा झिंगूर हवा की सिंहासारखा सामर्थ्यवान?