ऊर्जाक्षयाची बदलती कारणे...

    02-Jun-2026
Total Views |
 
energy loss
 
आज धावपळ ही अनेकांच्या आयुष्याचा भाग झाली आहे. दोन क्षणांची उसंत ही चैनीची बाब ठरावी, इतकी धावपळ माणूस आज करू लागला असून, थकवा हादेखील जीवनाचा भाग झाला आहे. त्याचे कारण म्हणून आपण बहुधा ताणतणाव, अपुरी झोप किंवा धकाधकीची जीवनशैली यांनाच जबाबदार धरतो. मात्र, यापलीकडेही अशी काही कारणे आहेत, जी या थकव्याचे कारक म्हणून समोर आली. थकव्याच्या या नव्या कारक घटकांचा आणि त्यातील गुंतागुंतीचा मागोवा घेणारा हा लेख...
 
अलीकडच्या काळात ‌‘थकलोय‌’ हा शब्द अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला दिसतो. कामाचे तास वाढले आहेत, स्पर्धा तीव्र झाली आहे, डिजिटल माध्यमांमुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही आणि जीवनशैली अधिकाधिक धावपळीची. त्यामुळे थकवा, अनुत्साह किंवा एकाग्रता कमी होणे या समस्या आधुनिक जीवनाचा अपरिहार्य भाग असल्याचेच अलीकडे गृहीत धरले जाते. मात्र, संशोधक आता या प्रश्नाकडे अधिक सूक्ष्मतेने पाहू लागले आहेत. अलीकडेच जपानमधील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासाने, सततच्या थकव्यामागे केवळ मानसिक किंवा सामाजिक कारणेच नसून, शरीरातील विशिष्ट पोषणघटकांची कमतरताही असू शकते, याकडे लक्ष वेधले गेले.
 
या संशोधनात व्हिटॅमिन बी-12 आणि ‌‘फोलेट‌’ अर्थात व्हिटॅमिन बी-9 या दोन जीवनसत्त्वांचा आणि थकवा, प्रेरणाशक्ती, तसेच मानसिक ऊर्जेचा परस्परसंबंध तपासण्यात आला. संशोधकांना असे आढळून आले की, शरीरात या जीवनसत्त्वांची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये थकवा, कामातील अनिच्छा आणि दैनंदिन कृतींबाबतचा उत्साह घटण्यासारख्या समस्या अधिक प्रमाणात जाणवतात. हे संशोधन महत्त्वाचे आहे, कारण आजवर अशा तक्रारींकडे बहुतेक वेळा ‌‘मानसिक ताण किंवा जीवनशैलीशी संबंधित समस्या‌’ म्हणूनच पाहिले जात होते.
 
खरे तर, व्हिटॅमिन बी-12 आणि ‌‘फोलेट‌’ ही दोन्ही जीवनसत्त्वे शरीराच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशीच. रक्तनिर्मिती, पेशींची वाढ, ‌‘डीएनए‌’ची निर्मिती, मज्जासंस्थेचे आरोग्य आणि मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी त्यांची आवश्यकता असते. या जीवनसत्त्वांच्या अभावामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होण्याच्या प्रक्रियाच प्रभावित होतात. त्यामुळे व्यक्तीला कोणतेही मोठे आजार नसतानाही सतत अशक्तपणा जाणवू शकतो. अनेक वेळा अशा व्यक्ती विविध तपासण्या करून घेतात खऱ्या; परंतु त्यामागील खरे कारण असलेली या पोषणघटकांची कमतरता त्यातून लक्षातच येत नाही.
 
या अभ्यासात संशोधकांनी ‌‘होमोसिस्टीन‌’ या जैव-रासायनिक घटकाचाही अभ्यास केला. शरीरात व्हिटॅमिन बी-12 आणि ‌‘फोलेट‌’ची कमतरता निर्माण झाल्यास, रक्तातील ‌‘होमोसिस्टीन‌’चे प्रमाण वाढू शकते. ‌‘होमोसिस्टीन‌’ची वाढ ही केवळ पोषणाच्या कमतरतेचे लक्षण नसून, हृदयविकार, मेंदूविकार आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याशीही संबंधित मानली जाते. संशोधनात असे आढळले की, ज्या व्यक्तींमध्ये ‌‘होमोसिस्टीन‌’चे प्रमाण जास्त होते, त्यांच्यामध्ये थकवा आणि इच्छाशक्ती कमी होण्याची लक्षणेही अधिक होती. यावरूनच शरीरातील जैव-रासायनिक बदलातील संबंध किती गुंतागुंतीचा आहे, हे स्पष्ट होते.
 
भारतीयांसंदर्भात हे संशोधन अधिक महत्त्वाचे ठरते. भारतात शाकाहारी लोकसंख्या मोठी आहे. व्हिटॅमिन बी-12 हे प्रामुख्याने प्राणीजन्य पदार्थांमधून मिळते. दूध, दही, पनीर, अंडी, मासे आणि मांसाहार हे त्याचे प्रमुख स्रोत आहेत. परिणामी, अनेक शाकाहारी व्यक्तींमध्ये ‌‘बी-12‌’ची कमतरता आढळते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध अभ्यासांतही भारतीय लोकसंख्येतील ‌‘बी-12‌’च्या कमतरतेचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, मधुमेहावरील काही औषधे घेणारे रुग्ण आणि पचनसंस्थेचे विकार असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका अधिक असतो.
 
‌‘फोलेट‌’च्या बाबतीत परिस्थिती काहीशी वेगळी आहे. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, मोड आलेली धान्ये, फळे आणि काही प्रकारच्या बियांमधून ‌‘फोलेट‌’ शरीराला मिळते. तथापि, वाढत्या शहरीकरणामुळे आहारातील नैसर्गिक घटकांचे प्रमाण कमी होत आहे. प्रक्रिया केलेले अन्न, तत्काळ खाण्याचे पदार्थ आणि ‌‘फास्ट फूड‌’मुळे शरीराला आवश्यक असलेले सूक्ष्म पोषक घटकच पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे कॅलरीज भरपूर मिळूनही शरीर पोषणाच्या दृष्टीने उपाशीच राहते. विशेष म्हणजे, थकवा ही केवळ शारीरिक समस्याच नसते. त्याचा परिणाम व्यक्तीच्या कामगिरीवर, सामाजिक संबंधांवर, मानसिक आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर होतो. सतत थकलेली व्यक्ती निर्णय घेण्यात कमी सक्षम असल्याने, तिची उत्पादकता घटते. अनेकदा नैराश्य वा चिंतेच्या समस्यांनाही ती बळी पडू शकते. त्यामुळे थकवा हा सार्वजनिक आरोग्याचाही विषय आहे.
 
तथापि, प्रत्येक थकव्यामागे व्हिटॅमिनची कमतरताच असते, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. झोपेचा अभाव, ‌‘थायरॉईड‌’चे विकार, मधुमेह, रक्तक्षय, मानसिक ताण, नैराश्य, हृदयविकार किंवा इतर अनेक आजारही त्यामागे असू शकतात. मात्र, सततचा थकवा आणि अनुत्साह यांना केवळ जीवनशैलीचा भाग समजून दुर्लक्षित करणेही तितकेच चुकीचे ठरेल. आरोग्यशास्त्रातील अनेक महत्त्वाच्या शोधांप्रमाणे या संशोधनानेही एक मूलभूत सत्य अधोरेखित केले आहे. शरीर अनेकदा मोठ्या आजारांची सुरुवात, अगदी साध्या लक्षणांमधूनच सूचित करते. थकवा, उत्साहाचा अभाव किंवा मानसिक ऊर्जा कमी होणे, ही त्यांपैकीच काही लक्षणे. आधुनिक जीवनशैलीत या संकेतांकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागली असली, तरी शरीराचा प्रत्येक संदेश ऐकणे आवश्यक झाले आहे.
 
(प्रतिनिधी)