बंदी असूनही रस्त्यावर नमाज; यूपीत ४० जणांविरोधात गुन्हा दाखल!

    02-Jun-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात बकरी ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज अदा केल्याच्या प्रकरणी यूपी पोलिसांनी १५ नामनिर्दिष्ट व्यक्तींसह एकूण ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू करून संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये समून, नवी बख्श, एजाज, सलीम, मुशर्रफ, मोहम्मद अहमद, अलीम चौधरी, हाजी अनवर, बदरुद्दीन, बिकालुद्दीन, तमीदुद्दीन, अब्दुल रऊफ, मुमताज, छम्मन उर्फ शैफुद्दीन आणि इरफान यांना नामनिर्दिष्ट आरोपी करण्यात आले आहे. याशिवाय इतर काही अज्ञात व्यक्तींनाही आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बकरी ईदच्या नमाजसाठी मोठ्या संख्येने भाविक महमूदपूर मार्गावरील ईदगाहमध्ये जमले होते. गर्दी वाढल्यामुळे काही जण ईदगाहच्या आवाराबाहेर येऊन रस्त्याच्या कडेला नमाज अदा करू लागले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना सार्वजनिक मार्गावर नमाज न अदा करण्याचा सल्ला दिला; मात्र काहींनी या सूचनांचे पालन केले नाही.

यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल सिंह यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दावा केला आहे की, ईदगाह परिसरात नमाज अदा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध होती. तरीही सार्वजनिक रस्त्यावर नमाज अदा केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. याच आधारावर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास सुरू असून उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक