गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा! सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

    02-Jun-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल इथला गोपाळगड किल्ला मालकी हक्काच्या मुद्द्यावरून वादाचा भोवऱ्यात सापडला होता. मात्र आता स्वतः राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.
मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्कासंदर्भातील वाद, न्यायालयीन प्रक्रिया, पुरातत्त्वीय महत्त्व आणि संभाव्य संपादन याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, उपसचिव महेश वाव्हळ, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी, गुहागरचे तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी अॅड. आशिष शेलार म्हणाले की, गोपाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप लक्षात घेता त्याची खासगी मालकी आणि याचा मूळ इतिहास शोधण्याची गरज आहे. किल्ला मराठा कालखंडातील असून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता उपलब्ध अभिलेख, लिलाव प्रक्रिया, इव्हॅक्युई प्रॉपर्टीचा दर्जा आणि संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी करावी, असेही निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिलेत.
पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात उभारण्यात आलेला हा किल्ला पुढे आंग्रे यांच्या आरमारी व्यवस्थेतील महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पश्चिम किनारपट्टीवरील जलनीतीत या किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. विशेष बांधकाम शैली आणि स्थापत्य वैशिष्ट्यांमुळेही हा किल्ला पुरातत्त्वीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत किल्ला परिसरातील काही अनधिकृत बांधकामे प्रशासनाने हटविल्याने संबंधित प्रकरण न्यायालयात गेले असल्याने यासंदर्भात घाईघाईने कोणताही निर्णय न घेता सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. इव्हॅक्युई प्रॉपर्टी घोषित करण्यामागील कागदपत्रे, त्यावेळची प्रक्रिया आणि उपलब्ध पुरावे यांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

निर्णय स्वागतार्ह, मात्र हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे!

सर्वप्रथम सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत. परंतु हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की; ही जागा ऐतिहासिकदृष्ट्या अंजनवेल फोर्ट म्हणून मराठा, ब्रिटिश आणि अन्य अधिकृत नोंदींमध्ये अस्तित्वात होती, तर महसूल अभिलेखांमध्ये त्याची योग्य नोंद का ठेवली गेली नाही? तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ४ नोव्हेंबर २००९ रोजी या किल्ल्याच्या संरक्षणाची प्रथम नोटिफिकेशन जाहीर झाली हेरिटेज प्रॉपर्टीचा दर्जा प्राप्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना, त्या ठिकाणी झालेले बांधकाम, तोडफोड किंवा इतर बदल हे संबंधित नियमांचे उल्लंघन करून झाले असतील, तर त्यासाठी जबाबदार व्यक्ती वर कठोर कारवाई झाली पाहिजे. हेरिटेज प्रॉपर्टीचे नुकसान हे केवळ भौतिक नुकसान नसून आपल्या इतिहास आणि सांस्कृतिक वारशावर झालेला आघात आहे. याचबरोबर, जर भविष्यात किल्ल्याच्या संवर्धनासाठी किंवा पुनर्बांधणीसाठी मोठा खर्च करावा लागणार असेल, तर तो खर्च करदात्यांच्या पैशातून सरकारने का उचलावा? ज्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा बेकायदेशीर कृत्यांमुळे हे नुकसान झाले, त्यांच्याकडूनच त्याची आर्थिक जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या प्रकरणात तथ्याधारित चौकशी, जबाबदारी निश्चिती आणि दोषींवर दंडात्मक कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे

- अक्षय पवार, गोपाळगड रक्षक (दुर्गप्रेमी)






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक