नरिमन पॉइंटची ऐतिहासिक एअर इंडिया इमारत अखेर महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात; मंत्रालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

    02-Jun-2026
Total Views |
AIR INDIA
 
मुंबई : (Air India Building Handover) अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मुंबईतील नरिमन पॉइंट येथील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित एअर इंडिया इमारत अखेर महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी हस्तांतरण कराराची नोंदणी पूर्ण झाली आणि राज्य सरकारने इमारतीचा अधिकृत ताबा स्वीकारला.
 
राज्य मंत्रिमंडळाने या खरेदीला तीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये ही इमारत महाराष्ट्र सरकारला विकण्यास मान्यता दिल्यानंतर व्यवहाराची प्रक्रिया सुरू झाली होती. अखेर सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा व्यवहार पूर्णत्वास गेला. या खरेदीसाठी राज्य सरकारने सुमारे 1,601 कोटी रुपये खर्च केले आहेत.
 
अरबी समुद्रालगत उभी असलेली 23 मजली एअर इंडिया इमारत मुंबईच्या ओळखीचा अविभाज्य भाग मानली जाते. 1974 मध्ये उभारण्यात आलेली ही इमारत प्रसिद्ध वास्तुविशारद जॉन बर्गी यांनी डिझाइन केली होती. अनेक दशकांपर्यंत ती एअर इंडियाचे मुख्यालय म्हणून कार्यरत होती आणि दक्षिण मुंबईच्या आकाशरेषेतील एक महत्त्वाची वास्तू म्हणून गणली जाते.
 
 
राज्य सरकारसमोर मंत्रालय आणि त्याच्या विस्तारित इमारतींमध्ये जागेची कमतरता निर्माण झाली होती. नेक विभागांची कार्यालये सध्या भाड्याच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. एअर इंडिया इमारतीच्या खरेदीमुळे सरकारला सुमारे 46,470 चौरस मीटर कार्यालयीन जागा उपलब्ध होणार असून विविध विभागांची कार्यालये एकाच परिसरात आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रशासनातील समन्वय वाढण्यास आणि भाड्यावरील खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.
 
सरकारकडून या इमारतीचे टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्यात येणार आहे. ही शासकीय विभाग आणि कार्यालये येथे स्थलांतरित करण्याची योजना असून ही इमारत मंत्रालयाचा विस्तार म्हणून वापरण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.(Air India Building Handover)