आयुर्वेदाला लोकाश्रय लाभावा...

    02-Jun-2026   
Total Views |
 
about-dr-pragya-aptikar-
 
आयुर्वेदशास्त्राला लोकाश्रय मिळावा, म्हणून सातत्याने कार्य करणाऱ्या ठाण्याच्या डॉ. प्रज्ञा आपटीकर यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
ठाण्याच्या डॉ. प्रज्ञा आपटीकर यांचा मासिक पाळी, सर्व्हायव्हल कॅन्सर, रजोनिवृत्ती, ‌‘पीसीओडी‌’ आणि महिलांसंदर्भातल्या आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ म्हणून लौकिक. आयुर्वेदिक स्त्रीरोग, प्रसूतितज्ज्ञ म्हणून त्यांचे कार्यही मोठे आहे. ‌‘बीएमएस‌’, ‌‘एम.एस गायनॅक‌’, ‌‘मीमांसा‌’ विषय घेऊन ‌‘एम.ए संस्कृत‌’, पुढे ‌‘आयुर्वेद‌’ विषयावरच ‌‘पीएचडी‌’पर्यंत शिक्षण घेतलेल्या डॉ. प्रज्ञा आपटीकर. त्यांचे आजपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले. ‌‘आयुर्वेद व्यासपीठा‌’च्या माध्यमातून त्या अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतात, महिलांशी संबंधित रोगांवर व्याख्याने आयोजित करतात, समाजात जागृतीही करतात. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे, जसे ‌‘बेस्ट रेजिस्टार ॲवॉर्ड सेठ ताराचंद हॉस्पिटल‌’, ‌‘व्ही. डी. खडीवाले ट्रस्ट व्ही. डी. लक्ष्मीबाई बोरवाणकार स्त्रीवैद्य पुरस्कार‌’, ‌‘कार्यभूषण पुरस्कार‌’, ‌‘धन्वंतरी ॲवॉर्ड नेचर पिट ऑर्गनायझेशन‌’, ‌‘आरोग्य सेवाव्रती‌’, ‌‘मातृचार्या आयकॉन ॲवॉर्ड‌’ आणि इतर. आयुर्वेदासाठी सातत्याने तीन दशके कार्य करणाऱ्या डॉ. प्रज्ञा यांच्या आयुष्याचा मागोवा घेऊ.
 
मूळचे मालवणचे, पण नंतर कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले नागनूर कुटुंब. चंद्रशेखर आणि अंजली यांना दोन अपत्ये. त्यांपैकी एक प्रज्ञा. चंद्रशेखर हे इंजिनिअर, तर अंजली या खासगी कंपनीमध्ये कामाला. 70चे दशक होते ते. घर तसे दोन वेळचे खाऊन-पिऊन सुखी. मात्र, आर्थिक सुबत्ता नव्हती. या सगळ्या काळात नागनूर दाम्पत्याने मुलांना भरपूर संस्कार आणि प्रेम दिले. असलेल्या परिस्थितीची जाणीव आणि त्या परिस्थितीवर मात करण्याची हिंमत दिली. नागनूर कुटुंब ज्या घरात राहायचे, ते घर भाड्याचे होते आणि त्याचे मालक पगरे नावाची व्यक्ती होती. पगरे हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. आयुष्यात प्रत्येक स्तरावर शिस्त हवीच; छोट्या छोट्या गोष्टीतून आपण सामाजिक भान आणि देशाप्रतिची जबाबदारी पार पाडू शकतो, हे त्यांच्याकडून प्रज्ञा यांना शिकायला मिळाले, तर त्यांचे आजी-आजोबा (आईचे आईवडील) यांच्याकडूनही शिस्त, वक्तशीरपणा, स्वावलंबन यांबाबतचे संस्कार मिळाले. दुसरीकडे, प्रज्ञा यांचे आजोबा (वडिलांचे वडील) यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सान्निध्यात राहून शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले होते. अशा नीतिमान कुटुंबाच्या वारसदार असलेल्या प्रज्ञा या लहानपणापासून अभ्यासात हुशार. लहानपणापासून त्यांना डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली. बारावीला त्यांना चांगले गुण मिळाले. मात्र, ‌‘एमबीबीएस‌’ला केवळ एका गुणाने त्यांचा प्रवेश हुकला.
 
अनेक वर्षे पाहिलेले स्वप्न केवळ एका गुणाने मागे सारावे लागले. अशा वेळी त्यांच्या आईबाबांनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले, “निराश होऊन थांबणे योग्य नव्हे. आता जे करू शकतो, ते करणे, हेच महत्त्वाचे आहे.” प्रज्ञा यांनी निराशा झटकली. त्यांनी आयुर्वेद शिकण्यासाठी ‌‘बीएएमएस‌’मध्ये प्रवेश घेतला. तिथे ‌‘अमृतांजन‌’चे माधवराव कोलटकर हे गुरू म्हणून लाभले. आयुर्वेदाच्या प्राचीन आणि संपन्न परंपरेबद्दल ते विद्यार्थ्यांना सांगत. त्यांच्या अमृतबोलांनी प्रज्ञा यांना आयुर्वेद शिक्षणात रस वाटला. काही काळाने त्यांना ‌‘एमबीबीएस‌’ शिक्षणासाठी प्रवेश मिळत असतानाही, त्यांनी तो प्रवेश नाकारला आणि आयुर्वेदाचे शिक्षण सुरू ठेवले. हे शिक्षण घेतानाच, त्यांनी संस्कृतमधून ‌‘एमए‌’ केले. ‌‘बीएएमएस‌’ आणि ‌‘एमए संस्कृत‌’ एकाचवेळी शिक्षण घेतानाही त्यांना दोन्ही अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळाले, हे विशेष.
 
पुढे त्यांचा विवाह नितीन आपटीकर यांच्याशी झाला. त्या पतीसोबत ठाण्यात राहायला आल्या. प्रज्ञा यांना मातृत्वाची चाहूल लागली. दुर्दैवाने प्रज्ञा यांची पहिली तीन अपत्ये जन्माला येण्याआधीच मृत्यू पावली. या काळात पती आणि सासरच्यांनी प्रज्ञा यांना खूप जपले. मात्र, प्रज्ञा यांना काही अत्यंत वाईट अनुभव आले. जसे नवविवाहित स्त्री सौभाग्यवतींना घरी जेवायला बोलावते. पण, प्रज्ञा यांची तीन मुले दगावली, म्हणून त्यांना या सवाष्ण भोजनासाठी बोलावले जात नसे. एकप्रकारे बहिष्कारच होता. पण, प्रज्ञा खचल्या नाहीत. त्यांच्या आयुर्वेदिक रुग्णालयात गरजूंवर लोकोपचार करण्यासोबतच त्यांनी स्वतःकडेही विशेष लक्ष दिले. त्यांना मुलगा झाला आणि पुढे एक मुलगीही झाली.
 
वंध्यत्व असलेल्या स्त्रीला काय यातना भोगाव्या लागतात, हे त्यांनी या काळात अनुभवले. त्यामुळेच त्यांच्याकडे वंध्यत्व किंवा इतर स्त्रीरोगासंदर्भात महिला रुग्ण येतात, त्यावेळी त्यापाठच्या वेदना त्या समजून घेतात. महिलांना आत्मविश्वास देऊन त्यांच्यावर सकारात्मक उपचार करतात. पुढे वैद्य विनय वेलणकर यांच्यामुळे त्यांचा ‌‘आयुर्वेद व्यासपीठ‌’शी संपर्क झाला आणि समाजासाठी सेवाभावी वृत्तीने आयुर्वेद उपचार कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या म्हणतात, “पंतप्रधान मोदींच्या कारकिदमध्ये आयुर्वेदाला राजाश्रय मिळाला. संपन्न आणि वैभवशाली आयुर्वेद परंपरेला आता लोकाश्रय, म्हणजे घराघरांत आयुर्वेदाचा स्वीकार होणे गरजेचे आहे.” शेवटच्या श्वासापर्यंत आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार आणि त्याद्वारे आयुर्वेदाला घराघरांतून लोकाश्रय मिळवण्यासाठी कार्य करणार आहे.
 
9594969638




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.