मुंबई : (Aarey Colony) मुंबई महानगरपालिकेकडून अवैध बांधकामांविरोधात बुलडोझर कारवाई सुरूच आहे. मंगळवारी गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या एका अवैध दर्ग्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी रविवारी पालिकेने मुलुंडच्या खिंडीपाडा परिसरातील अमरनगरमध्ये बुलडोझर कारवाई राबवली होती.
मुंबई महानगरपालिका आणि आणि पोलिसांनी ही कारवाई तेव्हा सुरू केली, जेव्हा देण्यात आलेल्या नोटिसींकडे दुर्लक्ष करण्यात आले. संबंधित कारवाईचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून कडक सुरक्षेमध्ये बुलडोझर अवैध बांधकाम पाडताना दिसत आहेत. ५० वर्षे जुन्या अवैध हजरत सय्यद बरकत अली दर्ग्यावर कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी पालिकेने मुलुंडच्या खिंडीपाडा परिसरातील अमरनगरमध्ये राबवलेल्या बुलडोझर कारवाईत सुमारे १५० अवैध निवासी आणि व्यावसायिक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. ही मोहीम टी वॉर्डच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून राबवण्यात आली होती. खरं तर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या नियोजित मार्गात ही अवैध बांधकामे अडथळा ठरत होती. त्यामुळे या अवैध इमारती हटवण्याचे काम करण्यात आले. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. (Aarey Colony)
दुध जिहादविरोधातही सक्तीची कारवाई व्हावी!
मुंबईतील अवैध घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आरे येथील दूध व्यवसायावर अवैध बांग्लादेशी मुस्लिमांनी ताबा मिळवल्याने हा लव जिहाद, लँड जिहाद सारखाच दूध जिहाद केला जात असल्याची माहिती यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने दिली होती. मुंबईला दूध पुरवण्याचे महत्वाचे काम आरे येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या वतीने करण्यात येते. आरे मिल्क कॉलनीत दूध प्रक्रिया केंद्र, गोठे आणि वितरणासाठी लागणारी पायाभूत सुविधा आहे.
यातील गोठ्यांमध्ये सुरूवातीला काम करणारे हिंदू कामगार आता जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. येथे सुमारे नव्वद टक्क्यांहून अधिक अवैध बांग्लादेशी मुस्लिम मजूर कार्यरत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच तेथील सर्व कामगारांची चौकशी व्हावी, त्यांचे सर्व कागदपत्रे तपासली जावीत, जर त्यात दोष आढळून आला तर सक्तीची कारवाई केली जावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. (Aarey Colony)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक