संध्याकाळ झाली की सावल्या मोठ्या होत जातात. वास्तव आणि आभास यातील दूरी वाढत जाते. आयुष्याचेही तसेच आहे. दिवसागणिक आपल्यापाशी जे काही आहे, ते मुठीतील वाळूप्रमाणे हळूवार निसटत जाते. निसटणारा तो प्रत्येक क्षण वेदनादायी असतो आणि तो क्षण जर 'दि ग्रेट' ख्रिस्तियानो रोनाल्डोचा असेल तर...
एके काळी जगभरातील बचावफळ्यांना घाम फोडणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो बुधवारी ह्यूस्टनच्या मैदानावर संघर्ष करताना दिसला. आपला विक्रमी सहावा फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या रोनाल्डोला सलामीच्या सामन्यात गोल करता आला नाही आणि पोर्तुगालला काँगो डीआरविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.
सामन्याच्या सहाव्या मिनिटाला जोआओ नेव्हेसच्या गोलने पोर्तुगालने आघाडी घेतली आणि सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे वाटत होते. मात्र, त्यानंतर खेळाचे चित्र बदलले. काँगोने निर्भय खेळ करत पुनरागमन केले आणि योआने विसाच्या गोलमुळे बरोबरी साधली. शेवटी मैदानावर आनंद काँगोच्या चेहऱ्यावर आणि निराशा पोर्तुगालच्या गळ्यात दिसत होती.
या सामन्यात सर्वांच्या नजरा रोनाल्डोकडे होत्या. वयाच्या ४१व्या वर्षी तो सहाव्या विश्वचषकात खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. पण इतिहासाच्या या क्षणी त्याच्या पायातून जादू निसटत चालली आहे. पूर्ण ९० मिनिटे खेळूनही त्याला एकही शॉट लक्ष्यावर मारता आला नाही. त्याचे प्रयत्न होत होते, धडपडही दिसत होती; पण एके काळी ज्या फुटबॉलशी तो सलगी करायचा, तोच आता त्याच्यापासून दूर जात असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसले.
रोनाल्डोचा हा गोलदुष्काळ आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे. विश्वचषक आणि युरो स्पर्धांतील त्याचे सलग दहा सामने गोलशिवाय गेले आहेत. 'अर्जेंटिनाचा मेस्सी श्रेष्ठ की ख्रिस्तियानो रोनाल्डो' अशा पैजा लागायच्या. पण जेथे मेस्सीही आपल्या सहाव्या वर्ल्डकपचा सलामा सामना (सलामी सामना) खेळत असताना हॅट्रिक नोंदवत होता, तेव्हा रोनाल्डोला साधा गोलपोस्टपर्यंतही धडकता येत नव्हते. तरीही, प्रशिक्षक राबेर्टो मार्टेनेझ यांनी आपल्या कर्णधाराची पाठराखण केली. "गोलची गरज असताना जगातील सर्वोत्तम गोलस्कोररला बाहेर काढण्यात अर्थ नाही," असे ते म्हणाले. मात्र, प्रश्न अजूनही कायम आहेत; रोनाल्डो अजूनही पोर्तुगालचा तारणहार ठरू शकेल का? की हा विश्वचषक एका महान कारकिर्दीच्या अखेरच्या अध्यायाची वेदनादायी कहाणी ठरणार आहे ?
उझबेकिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात आता केवळ पोर्तुगालच नव्हे, तर जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या नजरा रोनाल्डोकडे लागलेल्या असतील. कारण काही खेळाडू फक्त सामने खेळत नाहीत, ते इतिहास लिहितात. आणि रोनाल्डोच्या हातात अजूनही त्या इतिहासात्ते काट्री कोरी पाने शिल्लक आहेत.