वैचारिक प्रबोधनाचा दीप मालवला; विराग पाचपोर अनंतात विलीन

    18-Jun-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विराग पाचपोर (वय ७४) यांचे गुरुवार, दि. १८ जून रोजी निधन झाले. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रहित, सामाजिक समरसता आणि वैचारिक प्रबोधन यासाठी कार्य केले. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. भारतीय चर्च आणि ख्रिश्चन समाजावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथांना विशेष मान्यता मिळाली. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांतील त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण, परखड आणि विचारप्रवर्तक होते. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

विरागजी मूळचे नागपूरचे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, विवेकानंद केंद्राचे सेवाव्रती म्हणून १४ वर्षं ते ईशान्य भारतात - प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश इथे कार्यरत होते. त्यावेळी तिथल्या कामाची गरज म्हणून दि सेंटिनल या इंग्रजी वृत्तपत्रातून त्यांनी लेखन सुरू केलं. पुढे नागपूरला परतल्यावर, त्यांनी पत्रकारितेतली पदवी घेतली आणि नागपूर तरुण भारत या मराठी दैनिकात, तसंच हितवाद या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता केली. त्याच काळात सुमारे २० वर्षं नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात अतिथी व्याख्याता म्हणूनही काम केलं. तर, २०१० ते २०२० ही दहा वर्षं ते न्यूज भारती डॉट कॉम या न्यूज पोर्टलचे ते संपादक होते.

एकीकडे पत्रकार म्हणून योगदान देत असतानाच २००३ मध्ये ते मुस्लीम राष्ट्रीय मंच या संघ परिवारातल्या आयामाशी जोडले गेले. भारतीय मुस्लीम समाजात राष्ट्र प्रथम हा भाव रूजवण्याचं काम या मंचाच्या माध्यमातून केलं जातं. विरागजी या मंचाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत होते.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक