मुंबई (Taliban Bans Government Smartphones) : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने असा एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तेथील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवनच बदलून जाणार आहे. तालिबानचे प्रमुख आणि देशाचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदझादा यांच्या आदेशानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आपले स्मार्टफोन बंद करावे लागत आहेत. स्मार्टफोन वापरताना आढळल्यास नोकरी गमवावी लागू शकते, कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि काही भागांत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील विविध भागांतील सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले स्मार्टफोन बंद करण्यास सुरुवात केली आहे. हा आदेश बुधवारी लागू करण्यात आला. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्मार्टफोन वापरावर बंदी घालणारा तालिबानी आदेश गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या पत्रावर अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत चिन्ह असल्याचे दिसून आले. (Taliban Bans Government Smartphones)
या आदेशात नमूद करण्यात आले की, “सर्व प्रांतांतील विभागप्रमुखांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना, मग ते वरिष्ठ असोत किंवा कनिष्ठ, १७ जूनपासून स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बंद असल्याची माहिती द्यावी.” हा आदेश लष्करी तसेच नागरी विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. केवळ सर्वोच्च नेत्यांच्या विशेष परवानगीनेच या बंदीतून सूट मिळू शकते. (Taliban Bans Government Smartphones)
या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशी माहिती आहे की, दुर्गम बदख्शान प्रांतातील माहिती विभागातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. बदख्शानमधील तीन सरकारी कर्मचाऱ्यांनी एएफपीशी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगितले की, या निर्बंधांमुळे त्यांचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार असून दैनंदिन कामे करणे अधिक कठीण होईल. (Taliban Bans Government Smartphones)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक