गेल्या २० वर्षांहून अधिक काळ महिला सक्षमीकरण, पर्यावरणसंवर्धन, आरोग्य, बालविकास, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजजागृती क्षेत्रांत कार्यरत सुप्रिया बिभीषण जेधे यांचा जीवनप्रवास...
समाजासाठी काहीतरी करायचे, वंचितांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करायचा आणि महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवायचा, हा ध्यास ज्या व्यक्तीच्या मनात असतो; त्यांच्यासाठी कोणतीही अडचण मोठी नसते. अशाच ध्येयवेड्या, संवेदनशील आणि समाजकार्याला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे सुप्रिया बिभीषण जेधे. अलिबाग येथील एक समर्पित, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी सामाजिक कार्यकर्त्या.
मूळच्या बारामतीच्या एका सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या सुप्रिया जेधे या आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. त्यांना दोन भाऊसुद्धा होते. त्यांनी ‘बीए’, ‘एमएसडब्ल्यू’ (मास्टर ऑफ सोशल वर्क) आणि ‘योग व निसर्गोपचार पदविका’ अशा विविध शाखांमध्ये उच्चशिक्षण घेतले. शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांच्या बळावर त्यांनी समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी प्रभावी कार्य उभे केले.
लग्नानंतर पतीच्या नोकरीच्या निमित्ताने त्या अलिबाग येथे स्थायिक झाल्या. नव्या ठिकाणी नव्या आयुष्याची सुरुवात करत असताना, त्यांनी स्वतःच्या स्वप्नांना विराम दिला नाही, उलट समाजाशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. वाशी आणि मशीदबंदर येथे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काहीकाळ नोकरीही केली. मात्र, चौकटीत अडकलेले जीवन त्यांना कधीच भावले नाही. त्यांच्या मनाला सतत खुणावत होती, ती समाजसेवेची हाक! मधल्या काळात त्यांचा अनेक महिलांशी संपर्क आला. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांशी झुंजणार्या महिलांचे जीवन जवळून पाहिल्यानंतर त्यांनी समाजकार्यात पूर्णवेळ कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि काही समविचारी महिलांच्या सहकार्याने ‘सुरभी स्वयंसेवी संस्थे’ची स्थापना केली.
सुरुवातीच्या संघर्षमय काळात निधी आणि साधनसामग्रीची कमतरता असूनही, त्यांनी जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर कार्याचा पाया भक्कम केला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांची स्थापना, स्वयंरोजगार प्रशिक्षण, टेलरिंग, अन्नप्रक्रिया, लघुउद्योग आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवून हजारो महिलांना स्वावलंबी बनविले.
२०११ पासून ‘नाबार्ड’च्या सहकार्याने महिला बचत गटांचे ‘बँक लिंकिंग’ आणि आर्थिक सक्षमीकरणाचे काम अधिक व्यापक झाले. केवळ आर्थिक नव्हे, तर वैचारिकदृष्ट्याही महिलांना सबळ बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ‘महिला आयोगा’च्या माध्यमातून सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता आणि कायदेविषयक कार्यशाळा आयोजित करून त्यांनी महिलांमध्ये जागरूकतेची नवी चळवळ उभी केली. अलिबाग, नागाव आणि आवास परिसरातील महिलांना पर्यटन व्यवसायाशी जोडून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १५०हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये हजारो लाभार्थींना प्रशिक्षण देऊन शाश्वत विकासासाठी मोलाचे योगदान दिले.
समाजसेवा ही केवळ कार्यक्रम किंवा प्रकल्पांपुरती मर्यादित नसते, हे सुप्रिया जेधे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. ‘कोविड-१९’ महामारीच्या काळात संपूर्ण देश संकटात असताना त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जवळपास तीन लाख गरजूंना मोफत भोजन उपलब्ध करून दिले. या काळात त्यांनी ‘आरोग्यमित्र’ म्हणून तीन हजारांहून अधिक रुग्णांचे समुपदेशन केले. भीती, नैराश्य आणि अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना मानसिक आधार दिला.
रायगड जिल्ह्याला तडाखा देणार्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वेळीही त्यांचा सेवाभाव तितकाच सक्रिय होता. ‘एनडीआरएफ’चे जवान, शासकीय अधिकारी आणि बचावकार्यादरम्यान स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी भोजन व मदतीची व्यवस्था करत त्यांनी दिवस-रात्र एक केले. संकट कितीही मोठे असो, माणुसकीची साथ कधीही कमी पडू नये, हा त्यांचा जीवनमंत्र या कार्यातून दिसून आला.
सुप्रिया जेधे यांच्या अथक परिश्रमांची आणि निःस्वार्थ सेवाभावाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली आहे. ‘अलिबाग चेंढरे सन्मान’ (२००९-१०), ‘प्रियदर्शनी’ पुरस्कार, ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार (२०१८-१९) यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. आज त्या ‘पंतप्रधान आवास योजना समिती’ आणि ‘जिल्हा पशुधन विभाग समिती’वर अशासकीय सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. पर्यावरणसंवर्धन क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. २००९ ते २०१५ या कालावधीत रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रदूषण करणार्या फटायांविरोधी अभियान राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण केली. गणपतिदान, समुद्रकिनारा स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि संविधान जागृती कार्यक्रमांद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
आज ‘सुरभी’ संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेली त्यांची वाटचाल हजारो महिला, युवक आणि गरजू नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारी चळवळ बनली आहे. महिलांचा वैचारिक विकास, सामाजिक सहिष्णुता आणि आत्मविश्वास यांचा संगम झाला; तर त्या कोणतीही उंची गाठू शकतात, हा सुप्रिया जेधे यांचा विश्वास हजारो महिलांच्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने सुप्रिया जेधे यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९४२०६४५५७९ )