हिंदू पंचांगानुसार तिथींना महत्त्व असून, देशात या तिथींवरच उत्सव साजरे होतात. कार्तिकेय स्वामींच्या नावे प्रसिद्ध असलेली स्कंद षष्ठीही अशीच देशभर साजरी केली जाते. येत्या शनिवारी स्कंद षष्ठी देशभर साजरी होणार असून, त्यानिमित्ताने याचे महत्त्व, पूजाविधी अशा विविध अंगाने घेतलेला मागोवा...
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथीला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. यामध्ये ‘षष्ठी’ ही तिथी प्रामुख्याने भगवान शिवाचे ज्येष्ठ सुपुत्र, शक्ती आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या भगवान कार्तिकेय म्हणजेच स्कंद यांना समर्पित मानली जाते. दर महिन्याच्या शुल पक्षातील षष्ठीला ‘स्कंद षष्ठी’ साजरी होते, तर कार्तिक महिन्यातील शुद्ध षष्ठीला येणारी ‘महा स्कंद षष्ठी’ अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. हा दिवस आपल्यातील असुरी प्रवृत्तींवर, जीवनातील संकटांवर आणि अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवण्याचा उत्सव आहे. भगवान कार्तिकेयांचे पराक्रम, त्यांचे विविध प्रांतांतील स्वरूप आणि या तिथीचे महत्त्व मानवी जीवनाला एक नवी दिशा देणारे ठरते.
भगवान कार्तिकेय आणि तारकासुर वधाची पौराणिक कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. तारकासुर नावाच्या राक्षसाने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला होता की, त्याचा मृत्यू केवळ भगवान शिवाच्या पुत्राच्या हातानेच होऊ शकेल. शिव तपात लीन असल्यामुळे आपल्याला कोणीही मारू शकत नाही, अशाच अहंकारातून तारकासुराने देवलोकावर ताबा मिळवला. पुढे ऋषिमुनींवर अनन्वित अत्याचारही सुरू केले. देवांच्या प्रार्थनेनंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य ऊर्जेतून कार्तिकेयांचा जन्म झाला. सहा कृत्तिकांनी त्यांचे अत्यंत प्रेमाने पालनपोषण केले, म्हणून त्यांना ‘कार्तिकेय’ असे नाव मिळाले. शुल पक्षातील षष्ठी तिथीला भगवान कार्तिकेयांनी देवांचे सेनापतीपद स्वीकारले आणि आपल्या ‘दिव्य वेल’ म्हणजेच भाला या अस्त्राने, तारकासुराचा वध केला. या अभूतपूर्व विजयामुळे त्रिलोकात पुन्हा धर्माची स्थापना झाली आणि देवांना त्यांचे गमावलेले स्थान परत मिळाले. हाच विजयोत्सव आणि अधर्माचा नाश झाल्याचा आनंद दरवर्षी स्कंद षष्ठीच्या रूपाने, संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये भगवान कार्तिकेयांना ‘मुरुगन’ या नावाने अत्यंत श्रद्धाभावाने पूजले जाते. ‘मुरुगन’ या शब्दाचा अर्थच अत्यंत सुंदर, देखणा आणि चिरतरुण असा होतो. ते तामिळ भाषेचे आणि संस्कृतीचे आद्य रक्षक मानले जातात. मुरुगन ही केवळ युद्धाचीच देवता नसून ते ज्ञान, करुणा, दया आणि आध्यात्मिक गुरुत्वाचेही प्रतीक आहेत. त्यांच्या हातातील वेल हा मानवी बुद्धीचे आणि एकाग्रतेचे दर्शन घडवतो, जो वरून रुंद, खाली तीक्ष्ण आणि खोल असतो, अगदी मानवी प्रगल्भ ज्ञानाप्रमाणे. मुरुगन यांच्या पूजेमध्ये कावडी अट्टम हा नृत्यप्रकार आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो, जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी समर्पित करतात. दक्षिण भारतातील संस्कृतीत मुरुगन हे लोकांच्या दैनंदिन जीवनाचा आणि अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कार्तिकेयांना ‘सुब्रह्मण्य’ या नावाने ओळखले जाते. सुब्रह्मण्य म्हणजे जे सर्वोच्च ब्रह्म किंवा ज्ञान अत्यंत सुंदर आणि सुस्पष्ट रितीने प्रकट करते. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी कार्तिकेय आणि गणेश यांच्यात पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा लावली, तेव्हा कार्तिकेयांनी आपल्या मयुर वाहनावर बसून संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातली होती. जरी ते ही स्पर्धा तांत्रिकदृष्ट्या हरले, तरी त्यांनी मिळवलेले ज्ञान अगाध आणि ब्रह्मांड कवेत घेणारे होते. सुब्रह्मण्य हे शिवाच्या दिव्य ज्ञानाचे स्वरूप मानले जातात. त्यांनी स्वतः भगवान शिवांना ‘प्रणव’ मंत्राचा म्हणजेच ‘ॐ’चा गूढ अर्थ समजावून सांगितला होता. त्यामुळे त्यांना ‘शिवगुरु’ किंवा ‘स्वामीनाथ’ असेही म्हटले जाते. सर्प आणि निसर्गाशी त्यांचे अत्यंत जवळचे नाते असल्याने, कुंडलिनी शक्ती जागृत करणारे आणि कालसर्प दोषाचे निवारण करणारी मुख्य देवता म्हणूनही सुब्रह्मण्य यांचे ध्यान केले जाते.
प्रत्येक महिन्याच्या शुल पक्षातील षष्ठी तिथीला मासिक स्कंद षष्ठी म्हटले जाते आणि प्रत्येक महिन्यात या तिथीचे व्रत करण्याचे विशेष आध्यात्मिक महत्त्वही आहे. मानवी जीवनात येणारे मानसिक ताणतणाव, अंतर्गत शत्रू म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि बाह्य संकटे यांच्याशी लढण्याची आत्मिक शक्ती, ही मासिक षष्ठीच्या व्रतामुळे मिळते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ दोष किंवा अंगारक दोष असतो, त्यांच्यासाठी मासिक स्कंद षष्ठीचे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते, कारण कार्तिकेय हे मंगळ ग्रहाचे अधिपती देव आहेत. हे व्रत नियमित केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळते, जमीन-जुमल्याचे जुने वाद मिटतात आणि कुटुंबात सुख-शांती नांदते, अशी श्रद्धा अनेक भाविकांची आहे.
मासिक स्कंद षष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून, भगवान कार्तिकेय आणि भगवान शिव-पार्वती यांच्या पूजेचा मनोभावे संकल्प करावा. देवघरात एका चौरंगावर लाल वस्त्र अंथरून, त्यावर भगवान कार्तिकेय किंवा शिवपरिवाराची मूर्ती अथवा छायाचित्र स्थापित केले जाते. त्यानंतर कार्तिकेयांच्या मूर्तीला पंचामृताने आणि शुद्ध जलाने अभिषेक करून, चंदनाचा टिळक लावला जातो. कार्तिकेयांना लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंद किंवा कण्हेरची फुले अत्यंत प्रिय असल्याने, तीही आवर्जून अर्पण केली जातात. पूजेमध्ये फळे आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईचा किंवा खिरीचा भोग चढवला जातो. पूजेदरम्यान ‘ॐ शरवणभवाय नमः’ या महामंत्राचा किमान १०८ वेळा जप करुन, शेवटी कापूर आरती केली जाते. या दिवशी भक्त दिवसभर उपवास करुन, संध्याकाळी पूजेनंतर सात्त्विक भोजन किंवा फलाहार करून उपवास सोडतात.
कार्तिक महिन्याच्या शुल पक्षातील षष्ठीला ‘महा स्कंद षष्ठी’ किंवा ‘कुमार षष्ठी’ म्हटले जाते, जी वर्षातील सर्वांत मोठी तिथी मानली जाते. हा भगवान कार्तिकेयांच्या प्रकट होण्याचा आणि तारकासुर वधाचा मुख्य दिवस असल्यामुळे, या दिवशी केली जाणारी पूजा अत्यंत विशेष आणि भव्य स्वरूपाची असते. महा स्कंद षष्ठीला दक्षिण भारतातील मुरुगन मंदिरांमध्ये सहा दिवसांचा ‘स्कंद षष्ठी कवाचम’चा भव्य उत्सव साजरा होतो. याची सांगता या तिथीला महाअभिषेकाने होते. घरगुती पूजेमध्ये या दिवशी भगवान कार्तिकेयांच्या ‘वेल’ म्हणजेच भाला या अस्त्राची विशेष पूजा केली जाते. भाल्याला दूध आणि चंदनाने अभिषेक करून, त्याला हळद-कुंकू वाहिले जाते. हे अस्त्र दुष्टांचा संहार करणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे मानले जाते. या दिवशी कार्तिकेयांना सुगंधी तेल आणि पंचामृताचा महाअभिषेक केला जातो. या महा तिथीला विवाहित महिला संतती प्राप्तीसाठी आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी षष्ठी व्रत अतिशय निष्ठेने करतात. ज्या मातांची मुले आजारी असतात किंवा अभ्यासात मागे असतात, त्या विशेषतः या दिवशी कार्तिकेयांची आराधना करतात; कारण ते बुद्धी आणि उत्तम आरोग्याचे स्वामी आहेत. या दिवशी स्कंद षष्ठी महात्म्य किंवा स्कंद पुराणातील शौर्यकथांचे वाचन आणि श्रवण केले जाते. असे मानले जाते की, या दिवशी केलेल्या अन्नदानाला आणि वस्त्रदानाला अक्षय पुण्य लाभते.
भगवान कार्तिकेय, मुरुगन किंवा सुब्रह्मण्य या वेगवेगळ्या नावांनी आणि रूपांनी नटलेले हे ईश्वर तत्त्व, आपल्याला जीवनातील संघर्षाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची प्रेरणा देते. मासिक षष्ठीच्या नियमित उपासनेने मनाला कमालीची स्थिरता आणि मानसिक बळ मिळते, तर कार्तिकी महा षष्ठीच्या विशेष पूजेने जीवनात समृद्धी, तेज आणि शौर्य येते. निसर्ग, ज्ञान, भक्ती आणि शक्ती यांचा हा अपूर्व संगम प्रत्येकाच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून प्रगतीचा आणि प्रकाशाचा मार्ग दाखवणारा ठरतो.
-ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज