किरन्ती-मङ्गेभ्यः किरण-निकुरुम्बमृतरसं
हृदि त्वामाधत्ते हिमकरशिला-मूर्तिमिव यः|
स सर्पाणां दर्पं शमयति शकुन्तधिप इव
ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारसिरया॥२०॥
पदच्छेद : किरन्तीम् + अङ्गेभ्यः + किरण + निकुरुम्ब + अमृतरसम् हृदि + त्वाम् + आधत्ते + हिमकर + शिला + मूर्तिम् + इव + यः|सः + सर्पाणाम् + दर्पम् + शमयति + शकुन्ताधिपः + इव| ज्वरप्लुष्टान् + दृष्ट्या + सुखयति + सुधाधार + सिरया॥
सौन्दर्यलहरीचा प्रत्येक श्लोक हा एका विशिष्ट ध्यानपद्धतीचा, आध्यात्मिक अनुभूतीचा आणि साधनेतील अंतर्गत अवस्थेचा संकेत देणारा आहे. मुळातून सौन्दर्यलहरी हे संपूर्ण स्तोत्रच, शक्तिउपासना मार्गातील उच्च कोटीच्या साधकांना मिळणार्या अनुभूतींचे संकलन आहे. तसेच, साधकांना येणार्या अनुभूतींचे मार्गदर्शन आणि त्याचा अर्थ लावून आपली साधना कशी विकसित करावी, याचे मार्गदर्शनही आहे. २०वा श्लोक हा अशाच एका अत्यंत सुंदर आणि गूढ ध्यानाचे वर्णन करतो. या श्लोकात भगवती त्रिपुरसुंदरीच्या चंद्रमय, अमृतमय आणि शीतल स्वरूपाचे ध्यान सांगितले आहे. विशेष म्हणजे, या श्लोकात देवीच्या उग्र शक्तीचे नव्हे, तर तिच्या करुणामयी, जीवनदायी आणि शांतिदायी रूपाचे दर्शन घडते.
श्लोकात शंकराचार्य म्हणतात की, देवीच्या स्वरूपाचे ध्यान करताना साधकाने तिच्या विशिष्ट स्वरूपाचे चिंतन केल्यास त्याला त्या अनुरूप सिद्धी प्राप्त होते. या श्लोकात आचार्य देवीच्या आणि परम करूणामयी सोमस्वरूपाचा उल्लेख करतात. आचार्य म्हणतात, श्री ललितादेवीच्या प्रत्येक अंगातून चंद्रकिरणांच्या समूहांप्रमाणे अमृतरसाचा वर्षाव होतो. ती जणू चंद्रकांत मण्यापासून बनविलेल्या मूर्तीप्रमाणे शुभ्र, पारदर्शक आणि शीतल आहे. देवीच्या या स्वरूपाचे चिंतन करणारा साधक, त्याच्याही नकळत अमृतस्वरूप शक्तीचा वाहक बनतो. येथे ‘किरन्तीमङ्गेभ्यः किरणनिकुरुम्बामृतरसम्’ हा शब्दप्रयोग अत्यंत अर्थपूर्ण आहे. देवीच्या अंगातून केवळ प्रकाश निघत नाही, तर अमृतमिश्रित प्रकाशच निघतो. हा प्रकाश चेतनेचा, आनंदाचा आणि करुणेचा प्रकाश आहे. भारतीय तांत्रिक परंपरेत चंद्र हा केवळ ग्रह नाही, तर शांती, करुणा, ज्ञान आणि अमृत यांचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे देवीच्या शरीरातून झरणारे चंद्रकिरण म्हणजे, तिच्या अनंत करुणेचा प्रवाह होय.
‘हिमकरशिलामूर्तिमिव’ या शब्दात आणखी एक सुंदर प्रतीक दडलेले आहे. ‘हिमकर’ म्हणजे चंद्र आणि ‘हिमकरशिला’ म्हणजे चंद्रकांतमणी! प्राचीन भारतीय मान्यतेनुसार चंद्रकांतमण्यावर चंद्रप्रकाश पडला की, त्यातून जलस्राव होतो. आधुनिक विज्ञान या मान्यतेला स्वीकारत नसले, तरी तांत्रिक आणि काव्यपरंपरेत हे एक प्रभावी प्रतीक मानले जाते. शंकराचार्य देवीची तुलना अशा चंद्रकांत मण्याशी करतात, जी स्वतःच चंद्रस्वरूप आहे आणि सतत अमृतधारा प्रकट करीत आहे. येथे देवी ही केवळ उपास्य देवताच नसून, विश्वातील सर्व जीवनाला पोषण देणारी चेतनाशक्ती म्हणून उभी राहते.
या ध्यानाचे फळ सांगताना शंकराचार्य म्हणतात की, असा साधक ‘सर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिप इव’ म्हणजे, गरुड जसा सर्पांचे विष आणि सामर्थ्य निष्प्रभ करतो, तसा सर्पांचा दर्प शांत करू शकतो. वरवर पाहता, हे विधान एखाद्या तांत्रिक सिद्धीचे वर्णन वाटते. प्राचीन भारतात मंत्रोपासक, नाथयोगी आणि श्रीविद्योपासक यांच्याविषयी अशा अनेक कथा सांगितल्या जातात की, ते सर्पदंशावर मंत्रोपचार करीत. म्हणून या श्लोकाचा एक अर्थ प्रत्यक्ष विषनाशक सामर्थ्याशी संबंधित आहे. परंतु, शंकराचार्यांचा आशय केवळ इतकाच नाही. भारतीय अध्यात्मात सर्प हा अनेकदा अंतर्मनातील दोषांचे प्रतीक मानला जातो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार हे मनुष्याच्या अंतःकरणात वेटोळे घालून बसलेले विषारी सर्पच आहेत. या दोषांमुळे मनुष्य स्वतः दुःखी होतो आणि इतरांनाही दुःखच देतो. देवीच्या अमृतमय ध्यानामुळे साधकाच्या मनात शीतलता, करुणा आणि विवेक प्रकट होतो. परिणामी, या अंतर्गत सर्पांचे विष कमी होऊ लागते. क्रोधाऐवजी क्षमा, द्वेषाऐवजी प्रेम आणि अहंकाराऐवजी नम्रता जन्म घेते. म्हणूनच येथे सर्पांचे विष शांत करणे म्हणजे, अंतःकरणातील विकारांचे रूपांतर होय.
गरुडाचे प्रतीकदेखील तितकेच गूढ आहे. गरुड हा विष्णूचे वाहन म्हणून ओळखला जातो; परंतु तत्त्वज्ञानात तो ज्ञानाचे प्रतीक आहे. सर्प हे अज्ञानाचे प्रतीक मानले जातात. ज्या क्षणी ज्ञानाचा उदय होतो, त्या क्षणी अज्ञानरूपी सर्पांचे सामर्थ्य नष्ट होते. म्हणूनच या श्लोकात गरुड आणि सर्प यांचा उल्लेख करून, शंकराचार्य प्रत्यक्षात ज्ञान आणि अज्ञान यांच्यातील संघर्षाचे चित्र रेखाटत आहेत. देवीच्या कृपेने जागृत झालेले ज्ञान अज्ञानरूपी विषाचा नाश करते. श्लोकाचा पुढील भाग आणखी सूक्ष्म आहे. शंकराचार्य म्हणतात की, असा साधक ‘ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारसिरया’ म्हणजे, तापाने त्रस्त झालेल्या लोकांना केवळ आपल्या दृष्टीने सुख देतो. येथे ‘ज्वर’ म्हणजे फक्त शरीराचा ताप नाही. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक मनुष्य तीन प्रकारच्या तापांनी ग्रस्त असतो, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. बाह्य जगातील संकटे, निसर्गाचे प्रकोप, आर्थिक आणि सामाजिक अडचणी हे आधिभौतिक व आधिदैविक ताप आहेत, तर चिंता, भीती, असुरक्षितता, नैराश्य, द्वेष आणि रिकामेपणा हे आध्यात्मिक ताप आहेत. आधुनिक काळातील बहुतांश लोक या मानसिक तापांनी जळत आहेत.
अशावेळी काही व्यक्तींच्या सहवासात गेल्यावर मनाला अनाकलनीय शांती मिळते. त्यांनी काही विशेष बोललेले नसते, कोणताही चमत्कार केलेला नसतो; तरी त्यांच्या उपस्थितीत अस्वस्थता कमी होते. भारतीय संतपरंपरेत अशा अवस्थेला ‘कृपादृष्टी’ म्हटले आहे. शंकराचार्य याच अवस्थेचे वर्णन येथे करतात. देवीच्या अमृतमय ध्यानात पूर्णपणे तल्लीन झालेला साधक स्वतः अमृताचा झरा होतो. त्याच्या नजरेतून, वाणीतून आणि सहवासातून शांतीचा प्रवाह वाहू लागतो. त्यामुळे दुःखी आणि व्याकुळ लोकांनाही त्याच्याजवळ समाधान मिळते. श्रीविद्येच्या दृष्टीने पाहिले, तर हा श्लोक सहस्रारातील चंद्रमंडलाशी संबंधित आहे. तंत्रशास्त्रात सांगितले आहे की, सहस्रारकमलाच्या मध्यभागी एक दिव्य चंद्रमंडल आहे. त्यातून सतत अमृतधारा झरत असते. सामान्य मनुष्याला तिची जाणीव होत नाही; कारण त्याची चेतना बाह्य विषयांमध्ये गुंतलेली असते. परंतु योगसाधनेद्वारे जेव्हा कुंडलिनी शक्ती सहस्राराशी एकरूप होते, तेव्हा साधकाला या अमृतधारेचा अनुभव येऊ लागतो. त्या अवस्थेत मनातील संघर्ष विरघळतात, अहंकार क्षीण होतो आणि एक विलक्षण आनंद अनुभवास येतो. शंकराचार्यांनी या अवस्थेचे काव्यमय चित्रण देवीच्या चंद्रमय स्वरूपाद्वारे केले आहे.
अध्यात्म म्हणजे केवळ शक्ती, चमत्कार किंवा सिद्धी मिळविणे नव्हे. खर्या साधनेचे फल अंतःकरणातील तापत्रय शांत होणे, मनात शीतलता, करुणा आणि प्रेम जागृत होणे. देवीची कृपा म्हणजे बाह्य जगावर सत्ता मिळविणे नव्हे, तर स्वतःच्या मनावर विजय मिळविणे. जो स्वतः शांत होतो, तोच इतरांना शांती देऊ शकतो. जो स्वतः अमृताचा अनुभव घेतो, तोच इतरांच्या जीवनात अमृतवर्षाव घडवू शकतो. सौन्दर्यलहरीतील साधकाच्या अंतर्गत रूपांतरणाची प्रक्रिया उलगडणारा आहे. चंद्रकिरणांप्रमाणे शीतल, अमृतधारेप्रमाणे जीवनदायी आणि गरुडाप्रमाणे अज्ञानाचा नाश करणारी ही त्रिपुरसुंदरी साधकाला अशा अवस्थेत नेते, की तो स्वतःच करुणा, शांती आणि आनंदाचा स्रोत बनतो. हाच या श्लोकाचा गूढ, योगमय आणि अद्वैतपर अर्थ आहे.
हा श्लोक कुंडलिनी जागृती आणि तिच्या परिणामस्वरूप फळांवर, अर्थात सिद्धींवर भाष्य करत आहे. ‘कुंडलिनी जागृती’ हा तंत्र शाखेतील अत्यंत कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय. कुंडलिनी जागृती अत्यंत कठीण सिद्धी असून, या अवस्थेला पोहोचणारा साधक हा जीवन्मुक्त होतो. आणि संपूर्ण जीवन काळात तो सातत्याने सच्चिदानंद अवस्थेत रममाण असतो.
सुजीत भोगले
(क्रमश:)
९३७००४३९०१