हल्दीघाटीच्या युद्धासंदर्भातही तथ्यांचे पुनर्मूल्यांकन आवश्यक! : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

    18-Jun-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : "इतिहास अनेकदा सत्तेच्या जवळ राहणाऱ्यांनी आपल्या दृष्टिकोनातून मांडला, त्यामुळे अनेक राष्ट्रीय नायकांच्या योगदानाला अपेक्षित स्थान मिळाले नाही. हल्दीघाटीच्या युद्धासंदर्भातही तथ्यांचे पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे. आज देशभर महाराणा प्रताप यांची जयंती श्रद्धा आणि सन्मानाने साजरी केली जाते, हेच राष्ट्र आपल्या खऱ्या नायकांना कधीच विसरत नाही याचे मोठे प्रमाण आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

हल्दीघाटी विजयाच्या ४५० वर्षपूर्ती आणि वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त गांधी ग्राउंड उदयपूर येथे प्रताप गौरव केंद्र ‘राष्ट्रीय तीर्थ’च्या वतीने आयोजित ‘राष्ट्र चेतना संकल्प सभे’त ते बोलत होते.


उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, महाराणा प्रताप यांना ‘हिंदुआ सूरज’ हे बिरुद विनाकारण मिळाले नाही. धर्म, संस्कृती, स्वाभिमान आणि राष्ट्रहितासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे जीवन सत्ताप्राप्तीचे नव्हे, तर लोककल्याण, आदर्श शासन आणि राष्ट्रीय अस्मितेच्या संरक्षणाचे उदाहरण आहे. त्यांनी भावी पिढ्यांसाठी असा आदर्श निर्माण केला, जो आजही राष्ट्रजीवनाला प्रेरणा देत आहे. भारताचा इतिहास हा पराधीनतेचा नसून परकीय आक्रमकांविरुद्ध अखंड चाललेल्या संघर्ष, प्रतिकार आणि आत्मगौरवाचा इतिहास आहे. हल्दीघाटीचे युद्ध हे केवळ दोन सैन्यांमधील युद्ध नव्हते, तर राष्ट्रचेतना आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी संपूर्ण समाजाने लढलेला महासंग्राम होता.

हल्दीघाटी विजय सार्द्ध चतु:शती सोहळ्यात बोलताना त्यांनी सांगितले की, उपलब्ध ऐतिहासिक नोंदी, समकालीन स्रोत आणि स्वतः मुघल इतिहासकारांच्या वर्णनांवरून हे स्पष्ट होते की युद्धाच्या विविध टप्प्यांमध्ये मुघल सैन्याला माघार घ्यावी लागली होती. युद्धानंतरही शत्रू भय आणि असुरक्षिततेच्या अवस्थेत राहिला असेल, तर खरी विजयश्री कोणाची होती, याचा निर्णय इतिहास स्वतःच देतो.

युद्धाच्या प्रसंगांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, महाराणा प्रताप यांच्या सैन्याच्या पहिल्याच आक्रमणाने मुघल सैन्याला दूरवर माघार घेण्यास भाग पाडले होते. चेतकचा अद्वितीय पराक्रम, प्रताप यांची युद्धनीती आणि सैनिकांचे आत्मबल यामुळे मर्यादित साधनसंपत्ती असूनही विशाल साम्राज्याच्या सैन्यशक्तीला आव्हान देणे शक्य झाले. महाराणा प्रताप यांच्या सैन्यात केवळ राजघराणे किंवा योद्धा वर्ग नव्हता, तर संपूर्ण समाज उभा होता. जात, पंथ, प्रदेश आणि सामाजिक भेद विसरून समाज राष्ट्ररक्षणासाठी एकत्र आला होता.

पुढे त्यांनी सांगितले की, भारतीय समाज कधीही स्वेच्छेने पराधीनता स्वीकारणारा नव्हता. जेव्हा जेव्हा परकीय आक्रमकांनी या भूमीवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा प्रतिकाराची ज्योत प्रज्वलित झाली. त्यांनी बप्पा रावल, ललितादित्य, महाराणा प्रताप आणि इतर वीरांचा उल्लेख करत सांगितले की, भारताच्या आत्म्याला पराभूत करणे कोणत्याही आक्रमकाला शक्य झाले नाही. जगात कुठेही अकबराची जयंती साजरी केली जात नाही, मात्र महाराणा प्रताप यांचे स्मरण आजही जनमानस करत आहे. इतिहासाचा हा लोकनिर्णयच विजय कोणाचा झाला हे स्पष्ट करतो.


समारंभाचे अध्यक्ष वीरशिरोमणी महाराणा प्रताप समितीचे अध्यक्ष डॉ. भगवती प्रकाश शर्मा यांनी सांगितले की, आता हल्दीघाटी युद्धाचा वास्तविक इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्याची आणि अनेक वर्षे पसरविण्यात आलेल्या गैरसमजुती दूर करण्याची वेळ आली आहे. उपलब्ध ऐतिहासिक पुरावे स्पष्ट करतात की, हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रताप यांनी मुघल सैन्याचा पराभव करून स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि राष्ट्रधर्म रक्षणाचे अद्वितीय उदाहरण घालून दिले. हल्दीघाटीचे युद्ध हे केवळ दोन सैन्यांमधील संघर्ष नव्हते, तर परकीय साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध भारतीय अस्मितेच्या रक्षणासाठी उभारलेले महान अभियान होते. मेवाडने कधीही परकीय सत्तेसमोर शरणागती पत्करली नाही आणि आपले स्वातंत्र्य अबाधित राखले. समाजातील सर्व घटकांनी आपापल्या क्षेत्रात जाऊन हल्दीघाटी विजयाचे ऐतिहासिक सत्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्र चेतना संकल्प सभेला मेवाड-वागड परिसरातील अनेक संत-महंतांचे सान्निध्य लाभले. मेवाड राजघराण्याचे महाराणा विश्वराज सिंह मेवाड हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

भारताची शक्ती त्याच्या एकता, समरसता आणि आत्मविश्वासात
सरसंघचालकांनी सांगितले की, भारताची शक्ती त्याच्या एकता, समरसता आणि आत्मविश्वासात आहे. केवळ संकटाच्या काळातच नव्हे, तर सामान्य परिस्थितीतही समाज संघटित आणि जागृत राहिला पाहिजे. स्वाभिमान आणि ‘स्व’ची भावना जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत भारत प्रत्येक आव्हानाला सामोरे जात नवनव्या विजयगाथा रचत राहील. सर्व नागरिकांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन राष्ट्रोत्थान, समाजसंघटन आणि विश्वकल्याणाचा संकल्प करावा. भारताचा उत्कर्ष हाच विश्वकल्याणाचा मार्ग असून त्या दिशेने कार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

हल्दीघाटी विजयाचा गौरव इतिहासातील भ्रमांचा अंत करेल - श्रीजी श्याम शरण
समारंभातील प्रमुख अतिथी निम्बार्काचार्य श्रीजी श्याम शरण देवाचार्य यांनी सांगितले की, मेवाडची भूमी शौर्य आणि भक्ती यांची पवित्र भूमी आहे. एका बाजूला या भूमीने वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांसारखा राष्ट्रनायक दिला, तर दुसऱ्या बाजूला भक्तिमती मीराबाई यांसारखी महान कृष्णभक्त दिली. जेव्हा मातृभूमी आणि सनातन संस्कृतीवर संकट आले, तेव्हा महाराणा प्रताप यांनी भगवान श्रीरामांच्या “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” या आदर्शाला आत्मसात करून आपले सर्वस्व राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी अर्पण केले. राष्ट्रभक्तीची ही चेतना काळानुरूप विविध स्वरूपात प्रकट होत राहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक स्वयंसेवक “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे” या भावनेने मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित आहे. समाजाने जात, वर्ग आणि संकुचित विचारांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भारताची सनातन संस्कृती “वसुधैव कुटुंबकम्” आणि “सर्वे भवन्तु सुखिनः”चा संदेश देते, असेही त्यांनी नमूद केले. 






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक