मुंबई (Maharashtra ST service turns a profit): राज्यातील बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. केवळ १५ दिवसांच्या कालावधीत एसटीच्या उत्पन्नात तब्बल ४३ कोटी ८३ लाख रुपयांची वाढ झाली असून दररोजच्या सरासरी उत्पन्नात सुमारे ३ कोटी रुपयांची भर पडली आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.(Maharashtra ST service turns a profit)
एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५ कोटी ३४ लाख रुपये इतके नोंदविण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीत हे उत्पन्न ४५१ कोटी ५१ लाख रुपये होते. यंदा ९.७१ टक्के वाढीसह ४३ कोटी ८३ लाख रुपयांची अतिरिक्त कमाई झाली आहे.(Maharashtra ST service turns a profit)
उत्पन्नवाढीत रायगड, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नांदेड या विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे विभागाने सर्वाधिक ५ कोटी ९७ लाख रुपयांची वाढ नोंदविली असून सातारा विभागात ३ कोटी ४६ लाख, छत्रपती संभाजीनगर विभागात २ कोटी ६६ लाख, नांदेड विभागात २ कोटी २७ लाख, रायगड विभागात २ कोटी १७ लाख आणि अमरावती विभागात १ कोटी ६० लाख रुपयांची वाढ झाली आहे.(Maharashtra ST service turns a profit)
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बसस्थानक परिसरातील अनधिकृत प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर आणि महसुलावर विपरीत परिणाम होत होता. परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालये, पोलीस यंत्रणा आणि एसटी प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईमुळे प्रवाशांचा कल पुन्हा एसटीकडे वळत असून त्याचे प्रतिबिंब महसूल वाढीत स्पष्टपणे दिसून येत आहे.
राज्यातील सर्व बसस्थानक परिसर अवैध प्रवासी वाहतुकीपासून मुक्त करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कायदेशीर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले.(Maharashtra ST service turns a profit)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.