अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने ‘फिफा’ विश्वचषकाच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. अल्जेरियाविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक झळकावत अर्जेंटिनाला ३-० असा विजय मिळवून देताना, त्याने ‘विश्वचषकातील सर्वाधिक गौरवशाली खेळाडू’ म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले. विशेष म्हणजे, हा त्याचा विक्रमी सहावा विश्वचषक आहे.
मंगळवारी कॅन्सस सिटी स्टेडियमवर आपल्या २००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानात उतरतानाच ३८ वर्षीय मेस्सीने इतिहास रचला. विश्वचषकाच्या सहा स्पर्धांमध्ये खेळणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला. हा विक्रम पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मेसिकोचा अनुभवी गोलरक्षक गिलर्मो ओचोआ यांनाही गाठण्याची संधी आहे.
मेस्सीने सामन्यातील पहिला गोल १७व्या मिनिटाला केला. त्यासह त्याच्या विश्वचषकातील गोलसंख्येने १४चा टप्पा गाठला आणि त्याने फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेची बरोबरी केली. मात्र काही वेळातच त्याने आणखी गोल करत स्वतःची संख्या १५ वर नेली. अल्जेरियाचा गोलरक्षक लुका झिदान याने दिलेल्या ‘रीबाऊंड’वर त्याने अचूक ‘फिनिशिंग’ करत गोल नोंदवला.
विशेष म्हणजे, मेस्सीचा पहिलाच गोल चौथ्या मिनिटाला झाला होता; मात्र पंचांनी तो बाद ठरवला. तरीही त्याच्या जादूई खेळाने अल्जेरियाचा बचाव भेदत त्याने इतिहास घडवला.
मेस्सीच्या विश्वचषक प्रवासाची सुरुवात २००६ मध्ये झाली होती. तेव्हा तो अवघ्या १८ वर्षांचा होता. योगायोग असा की, त्याचा पहिला विश्वचषक सामना झाला त्याला मंगळवारी नेमकी २० वर्षे पूर्ण झाली. त्याच वर्षी फ्रान्सचा महान फुटबॉलपटू झिनेदिन झिदान आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विश्वचषक खेळत होता.
यानंतर मेस्सीने हॅट्ट्रिक पूर्ण करत विश्वचषकातील गोलसंख्या १६ वर नेली आणि जर्मनीच्या मिरोस्लाव लोझेच्या विक्रमाशी बरोबरी साधली. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १२०वा गोल ठरला. सामन्याच्या अखेरीस प्रशिक्षकांनी त्याला विश्रांती देत निको पाझला मैदानात उतरवले. जवळपास ७० हजार प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याला मानवंदना दिली.
पुढील आठवड्यात ३९ वर्षांचा होणारा मेस्सी आता विश्वचषकातील ‘सर्वांत वयोवृद्ध हॅट्ट्रिकवीर’ ठरला आहे. याआधी हा मान ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर होता. रोनाल्डोने २०१८ मध्ये स्पेनविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती.
याशिवाय सलग पाच विश्वचषक सामन्यांत गोल करणारा तो पहिलाच फुटबॉलपटू बनला आहे. २०२६ विश्वचषकातील त्याचा हा पहिलाच सामना असला, तरी त्याने पुन्हा एकदा आपली महत्ता सिद्ध केली. गतविजेत्या अर्जेंटिनाने स्पर्धेची सुरुवात दिमाखात केली असून आता डॅलसमध्ये सोमवारी ऑस्ट्रियाविरुद्ध आणि त्यानंतर दि. २७ जून रोजी जॉर्डनविरुद्ध ते गटसाखळीतील सामने खेळतील.
जर मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने सलग दुसर्यांदा विश्वचषक जिंकला, तर विश्वविजेतेपदाचे यशस्वी संरक्षण करणारा तो पहिला अर्जेंटिनाचा कर्णधार ठरेल. हा मान फुटबॉलचा महानायक मानल्या जाणार्या मॅराडोना यांनाही मिळवता आला नव्हता. शायर बशीर बद्र यांच्याच शायरीत मेस्सीचे कर्तृत्व सांगायचे झाले, तर इतकेच म्हणता येईल,
हम भी दरिया हैं हमें अपना हुनर मालूम है
जिस तरफ़ भी चल पड़ेंगे रास्ता हो जायेगा!