गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर झोपलेल्या हिंदू मतदारांचे डोळे उघडले असून, त्याला आपल्या ताकदीची नव्याने जाणीव झाली आहे. मुस्लीम मतांचा ‘व्हेटो’ धुडकावून हिंदूहिताची भाषा करणार्या पक्षालाच निवडणुकीत विजय मिळू शकतो, याची नव्याने जाणीव विरोधी पक्षातील खासदारांना झाली. म्हणूनच, भाजपमध्ये विलीन होण्याची धावपळ सुरू आहे. कारण, हिंदूहिताची भाषा करणारा आजघडीचा एकमेव पक्ष भाजपच!
दोन वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता जरी आली, तरी भारतीय जनता पक्षाकडे स्वबळावर बहुमत राहिले नाही. निकालाच्या दिवशी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असता, त्यांच्या चेहर्यावर निराशा आणि अविश्वास या दोन्ही भावनांचे विलक्षण मिश्रण झालेले सार्या देशाने पाहिले. मोदी यांचे भाषण भलेही आशावादी होते, तरी त्यामागील काहीशी हताशपणाची भावना लपून राहिली नव्हती. मोदी यांचे ते रूप पाहताक्षणी भारतातील बहुसंख्य हिंदू मतदारांचे डोळे खाडकन उघडले! जी ऋषितुल्य व्यक्ती आपल्या आणि आपल्या मातृभूमीच्या उत्थानासाठी इतके अथक परिश्रम करीत आहे, आपल्या (हिंदूंच्या) हितासाठी झगडत आहे, त्या व्यक्तीला आपण साधे बहुमत मिळवून दिले नाही, या तीव्र अपराधीपणाच्या भावनेने बहुसंख्य हिंदू मतदारांना घेरले आणि त्यानंतर देशात झालेल्या बहुतेक सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्वाची लाट उसळली.
हरियाणा हा काही भाजपचा बालेकिल्ला नव्हे. तेथे भाजपला कधीच स्वबळावर सत्ता मिळाली नव्हती. मात्र, त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ सलग तिसर्यांदा भाजप सत्तेवर आला असे नव्हे, तर तो स्वबळावर बहुमत घेऊनच सत्तेवर आला. त्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येणार यावर बहुसंख्य राजकीय विश्लेषकांचे एकमत झाले होते. पण, निवडणुकीत चमत्कार घडला आणि तो नंतरच्या जवळपास सर्वच विधानसभा निवडणुकीत पुन:पुन्हा घडत गेला. महाराष्ट्र, दिल्ली, बिहार आणि नंतर आसाम व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्याशी अनवधानाने केलेल्या द्रोहामुळे मनातून खजिल झालेल्या हिंदू मतदाराने नंतरच्या बहुतेक सर्वच निवडणुकांत भाजपला सत्तेवर बसवून लोकसभेतील चुकीचे अंशत: परिमार्जन केले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक या देशाच्या राजकारणात मैलाचा दगड ठरली. त्या राज्यात भाजप कधीच सत्तेवर येऊ शकणार नाही, अशी दृढ समजूत अनेक मुरलेल्या पत्रकारांची होती. पण, यंदा अभूतपूर्व परिस्थितीत झालेल्या विधानसभा निवडणुकांनी बंगालच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणालाच वेगळी दिशा दिली. बंगालमध्ये हिंदुत्ववादी भाजप दोन तृतीयांश बहुमताने सत्तेत येऊ शकतो, तर तो देशातील कोणत्याही राज्यात बहुमत मिळवू शकतो, ही खूणगाठ बहुतेक हिंदू मतदारांनी बांधली आहे. तृणमूल काँग्रेसच नव्हे, तर उबाठा सेना, शरद सेना आणि आता समाजवादी पार्टीच्या खासदारांमध्ये चलबिचल सुरू आहे, ती हिंदू मतदारांच्या जागृत झालेल्या आत्मभानामुळेच!
कोणत्याही राज्यातील मुस्लीम मतदारांची एकगठ्ठा मते मिळाली की, सत्तेचे दार उघडते, अशी आजवर एक भ्रामक समजूत हेतुत: जोपासली गेली होती. त्यामुळे बहुसंख्य हिंदू मतदारांमध्ये एक निराशा पसरली होती. बहुसंख्य असूनही आपल्या हितांचे रक्षण करणारा पक्ष सत्तेवर कसा येऊ शकत नाही, याचे कोडे त्यांना उलगडत नव्हते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यावर रामबाण इलाज केला. त्यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या मंत्राने जादूची कांडी फिरावी, तशी किमया घडली. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व मते मिळाली. प. बंगालने हा मुस्लीम मतांचा ‘व्हेटो’ साफ धुडकावून लावता येतो, हे सिद्ध केले. फालता या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत तर तेथील ७९ टक्के हिंदू मतदारांची १०० टक्के मते भाजपला मिळाली. हिंदू मतदार एकवटल्यास प. बंगालसारख्या तब्बल ३८-४० टक्के मुस्लिमांची लोकसंख्या असलेल्या राज्यातही भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळू शकते, हे दिसल्यावर देशातील अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांचे डोळे उघडले. बंगालमध्ये तृणमूल, तामिळनाडूत द्रमुक यांसारखे खंदे सेयुलर पक्ष सत्तेतून उखडले गेले, हे पाहिल्यावर पुढील नंबर आपलाच आहे, याची अखिलेश यादव यांना खात्री पटल्यास नवल ते काय! पंजाबमध्येही अनपेक्षित निकाल लागू शकतात.
प. बंगालने देशातील हिंदूंचे डोळे उघडले असतील, तर ही स्थिती पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील. बंगाली मतदारांनी केवळ दडपशाही राजवटीलाच उखडले नाही, तर देशातील घराणेशाही राजवटीवरही प्राणांतिक प्रहार केला आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाला जेमतेम २५ जागांवर विजय मिळाला आणि सत्तेवर येण्याचे तेजस्वी यादवचे स्वप्न कायमचे भंगले. द्रमुकला सत्तेबाहेर फेकण्यात आले. त्यानंतर प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांची सद्दी संपविली. हे पाहिल्यावर उबाठा सेना, शरदसेना आणि समाजवादी पक्षांमध्ये जी भीतीची लाट उसळली आहे, त्याचे कारण लक्षात येईल. देशातील हिंदू मतदाराला आत्मभान आले आहे, या एकमेव जाणिवेने या कथित सेयुलर आणि घराणेशाहीवादी पक्षांची पाचावर धारण बसली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असून, तेथील समाजवादी पक्षाच्या यादव घराण्याचीही अशीच लुळीपांगळी अवस्था होणार आहे, हे निश्चित. अखिलेश यादव यांची सध्या जी घाबरगुंडी उडाली आहे, तीही यामुळेच. या कथित सेयुलर पक्षांच्या आमदार-खासदारांमध्ये सध्या भाजपमध्ये जाण्यासाठी जी पळापळ सुरू झाली आहे, ती हिंदूंच्या रोषापासून स्वत:ला वाचविण्यासाठी. कारण, हिंदूंच्या हिताची आणि राष्ट्रवादाची भाषा करणारा एकमेव पक्ष सध्या भाजपच आहे!
- राहुल बोरगांवकर