सहदेव
माद्रीचा सर्वांत धाकटा पुत्र सहदेव. सहदेव अतिशय सुंदर होता. सहदेव सुंदर दाखविण्यात जन्मविज्ञान आणि कुंडलिनी विज्ञानाचे महान शास्त्र गुंफले आहे. उच्च संस्कारांचे जीवात्मे त्यांच्या जन्माच्या वेळी, मातृगर्भात धारण झालेल्या तितयाच उत्तम गुणांनी युक्त अशा उत्क्रांत शरीराद्वारे कर्षण केले जातात. गीता त्याबद्दलचे जन्मविज्ञान सांगते, ‘मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति| श्लो.७ अ.१५॥’ जीवात्म्याचे त्याचे सुयोग्य शरीराद्वारे होणारे कर्षणच, मातेच्या उदरात असणार्या सातवा महिना पूर्ण झालेल्या गर्भशरीराद्वारे होते. सांख्यमुनी कपिल आपली माता देवहुती हिला उपदेश करताना, भागवतातील स्कंद ३ अध्याय ३१ श्लोक १२ ते ३१ पर्यंत सांगतात,
तं जीवकर्म पदविम् अनुवर्तमानाः
तापत्रयोपशमनाय वयं भजेत|
आरभ्य सप्तमात् मासात् लब्धबोधऽपि वेपितः|
नैकभास्ते सूतिवातैः ऽष्ठामुखि सोदरः॥ भागवत-३,३१,१२॥
म्हणजे मातृ-उदरात तयार झालेल्या सात मासाच्या गर्भाद्वारे जीवात्म्याचे कर्षण होऊन, तो त्याच्या क्षमतेला प्राप्त होतो. शरीर हे जीवात्म्याचे उपकरण असल्यामुळे, जीवात्म्याच्या उत्तम संस्कारानुसार त्याचे कार्याचे उपकरण तितकेच संपूर्ण उत्क्रांत म्हणजे सुंदर असायला हवे. सहदेव वृत्तीचा पांडव जन्माला येण्याकरिता त्याचे उपकरणरूप शरीरसुद्धा तितकेच सुंदर असायला हवे, म्हणून सहदेव त्या काळातील अत्यंत सुंदर पुरुष दाखविला आहे. सहदेवाला सुंदर दाखविण्यात व्यासांनी आपल्या विलक्षण उत्क्रांत बुद्धीची ओळख करून दिली आहे. सहदेव म्हणजे उत्तम अध्यात्मिक वृत्तीचा साधक! साधक उत्तम आध्यात्मिक वृत्तीचा जन्मतःच असल्यास त्याचे शरीर जन्मतःच सुंदर तर असतेच; पण ध्यानधारणा आदी उत्क्रांत व्यवहारामुळे कुंडलिनी जागृत होऊन, त्याचे शरीर अधिक तेजःपुंज होते. ध्यानधारणा करणार्यांचे शरीर म्हणूनच तेजःपुंज दिसत असते. कुंडलिनी जागृत झालेला योगी पूर्वीपेक्षा अधिक सुंदर व तेजःपुंज दिसत असतो. ज्याची कुंडलिनी जागृत झालेला तेजःपुंज चेहर्याचा योगसाधक म्हणजेच सहदेव होय. व्यासांची ही विशाल बुद्धी समजण्याकरिता, साधनाप्राप्त अनुभव आणि तसल्या उत्क्रांत बुद्धीची आवश्यकता आहे.
नकुल
पांडवांमधील चौथा म्हणजे माद्रीचा पहिला-ज्येष्ठ पुत्र नकुल. नकुल म्हणजे ‘मुंगूस’. कोणी आपल्या पहिल्याच मुलाचे नाव नकुल म्हणजे मुंगूस ठेवेल काय? परंतु विशाल बुद्धी व्यासांच्या महाभारतरूप आध्यात्मिक काव्याकरिता, माद्रीच्या पहिल्या मुलाचे नाव नकुल म्हणजे मुंगूस ठेवणे आवश्यक आहे. कुंडलिनी जागृत झालेला साधक त्या अवस्थेत वारंवार सर्पदर्शनाचा आणि सर्पदंश विषाचा अनुभव करीत असतो. कुंडलिनी जागृत झाल्यामुळे, त्याच्या शरीरातील पेशी-पेशीतील गुणाणु त्यांचे पूर्वीचे नियत स्थान सोडून कुंडलिनी जागृत पुनर्रचनेनुसार नवीन उत्क्रांत स्थान धारण करतात. शरीरातील असल्या गुणाणुंच्या पुनर्रचनेमुळे आणि पुनरुत्थानामुळे, साधकाच्या शरीरात सर्पदंशासारखा वाटणारा विलक्षण दाह उत्पन्न होतो. हा दाह शांत होण्याकरिता, साधकाला त्याच्या कुंडलिनी जागृत अवस्थेला पचवून त्यावरील उच्च उत्क्रांत अवस्थेत जावे लागते. याकरिता साधकाला प्राणायामाचे अधिक उच्च ज्ञान असावे लागते. हे उच्च ज्ञान म्हणजेच, त्याचा केवल-कुंभक लागून त्याचा श्वास बंद पडावा लागतो. असल्या उच्च प्राणायामातील केवल-कुंभक म्हणजे, श्वास बंद झालेल्या अवस्थेला वेद व्यास ‘अ - श्व’ अवस्था असे म्हणतात. ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘श्व’ म्हणजे श्वास पूर्ण बंद श्वासावस्था म्हणजे ‘अश्व’ अवस्था होय. व्यवहारात ‘अश्व’ म्हणजे ‘घोडा’ असा दुसरा आशय आहे. व्यासांनी महाभारतात आपल्या खुबीने वर्णन केले आहे की, नकुलाला अश्वपरीक्षा उत्तम होती.
व्यासकथांचा वरवर आशय काढणारे वरील व्यासवचनाचा असा अर्थ काढतात की, नकुलाला घोड्यांची उत्तम पारख होती.परंतु व्यासांचा अश्वपरीक्षेचा तसा ओबडधोबड अर्थ नसून, नकुलाची अश्वपरीक्षा म्हणजे नकुलरूप साधक प्राणायाम परीक्षेत निष्णात होता असा आहे. आता नकुलाला ‘नकुल’ म्हणजे ‘मुंगूस’च का नाव ठेवले? हे पाहणेही आवश्यकच. साधकाच्या सहदेव अवस्थेत साधकाला सदोदित सर्पदर्शन आणि सर्पदंश विषदाहाचा अनुभव येत असतो, हे कुंडलिनी जागृतीचे योगविज्ञान आपण पाहिलेच. ते सर्पदर्शन आणि त्याचा वाटणारा सर्प विषदाह, त्याचे शमन अथवा परिमार्जन होण्याकरिता, साधकाला त्या सर्पदर्शन अवस्थेच्या वर जावे लागेल. असल्या सर्पाचा नाश करण्याकरिता सर्वांना मारणार्या नकुल म्हणजे मुंगूसाची आवश्यकता असते. म्हणूनच व्यासांनी साधकातील सहदेव अवस्थेचा मोठा भाऊ नकुल म्हणजे मुंगूस दाखविला आहे. आता आपल्या पहिल्यावहिल्या-ज्येष्ठ पुत्राचे नाव माद्रीने नकुल म्हणजे मुंगूस का ठेवले? याचा बोध होऊ शकेल. माद्रीचे सहदेव, नकुल आणि कुंतीचे अर्जुन, भीम आणि धर्मराज असे एकूण पंचप्राणांची साक्ष देणारे, पंचज्ञानेंद्रियांद्वारे साधकातील परमेश्वरस्वरूप असलेल्या सदसद्विवेक ज्येष्ठ श्रीकृष्णरूप बुद्धीला आपले परम श्रद्धास्थान ज्येष्ठ गुरू व मार्गदर्शक मानून, आपली जीवनयात्रा चालविणारे पंडुचे पाच नियोगपुत्र होत. आध्यात्मिक परंतु जगाच्या व्यवहारात कुचकामी म्हणजे, नपुंसक असलेल्या पंडुचे त्याच्या कुंती व माद्रीरूप दोन वृत्तीपत्नींद्वारे नियोग साधनाधन्य पाच पुत्र पांडव अनुक्रमे धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव होत. साधकाला अध्यात्म साधना करताना क्रमागत वरचढ अशा प्राप्त होणार्या साधना अवस्था, म्हणजेच पंडुचे पाच पुत्र.
सर्वांत धाकटा पुत्र सहदेव म्हणजे देववृत्ती बाळगणारी साधकातील सहदेववृत्ती व साधना अवस्था असून, त्यावर असलेली ज्येष्ठ प्राणायामाद्वारे केवल-कुंभक प्राप्त करणारी (रुढ अर्थाने अश्वपरीक्षा करणारी) नकुल भ्रातृ अवस्था होय. कुंडलिनी जागृतीनंतर येणार्या सर्पदर्शनाच्या निम्न अवस्थेला नष्ट करणार्या नकुलाचा क्रमांक खालून वरचा लागतो. माद्री वृत्तीच्या दोन पुत्रांनंतर, आता कुंतीचे तीन पुत्र येतात. कुंतीचा सर्वांत धाकटा पराक्रमी पुत्र अर्जुन होय. साधना जीवनात येणार्या सर्व अडचणींना एखाद्या आरी म्हणजे धारदार शस्त्राप्रमाणे चिरीत जाऊन, आपला मार्ग शोधून काढणारा वीर साधक अर्जुन होय. अर्जुनाला वीरत्वाबरोबर उत्तम धनुर्धारीही दाखविले आहे. ज्या वीर साधकाचे शरसंधान सदा ब्रह्मातच असते, अशा सदसद्विवेकबुद्धीलाच म्हणजे भगवान श्रीकृष्णाला आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणार्या उन्नत साधकाला वेदव्यास अर्जुन म्हणतात. अर्जुन अवस्था परिपक्व झाल्यावर साधक आता आत्मबलाने युक्त असा भीम बनतो.
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७