‘एआय’ निर्भर ते ‘एआय’ साक्षर!

    18-Jun-2026   
Total Views |
AI Literacy Future Jobs 
 
२०२५-२६ या वर्षांत जगाने कर्मचारीकपातीची लाट पाहिली. त्यामागचे सर्वांत मोठे आणि प्रमुख कारण म्हणजे ‘एआय.’ सोबतच जागतिक अनिश्चितता, खर्चकपात, इंधन, सोने दरवाढ आणि कालबाह्य तंत्रज्ञानासारख्या अनेक कारणांची त्याला जोड लाभली. त्यातच ‘टीसीएस’च्या अध्यक्षांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा ‘एआय’ आणि नोकर्‍यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यानिमित्ताने...
 
सीएस’ने आतापर्यंत २३ हजार, ४६० कर्मचार्‍यांना नारळ दिल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित झाले. ‘अ‍ॅमेझॉन’ने १६ हजार, ‘ऑरेकल’ने २० हजार (भारतात १२ हजार), ‘मेटा’ने आठ हजार अशा शेकडो आयटी कंपन्यांमधील ‘ले ऑफ’ची उदाहरणे देता येतील. २०२५ साली जगभरात ‘स्टार्टअप्स’मध्ये काम करणार्‍यांपैकी सहा हजार, ७०० कर्मचार्‍यांना कमी करण्यात आले. तंत्रज्ञान क्षेत्रातही एकूण अडीच लाखांहून अधिक जणांना ‘एआय’चा फटका बसला. पण, ‘एआय’ची झळ सर्वाधिक बसली ती माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरदारांना. प्रसारमाध्यमे, गेमिंग, सिने-मनोरंजन क्षेत्रालाही फटका फारसा बसल्याचे वरवर जरी दिसत नसले, तरीही ‘एआय’ नोकर्‍या खाणार ही चर्चा मात्र हल्ली सर्वच क्षेत्रांच्या बाबत सुरू असते.
 
‘टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस’ (टीसीएस)चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीत जितके कर्मचारी असतील, तितकेच ‘एआय’ एजंटही असतील. ‘टीसीएस’च्या ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी हा इशारा दिला. आता इतक्या प्रमाणात मेगाभरती होणार नाही, जशी यापूर्वी केली जात होती. आजघडीला पाच लाख कर्मचारी कंपनीत कार्यरत आहेत, तर तोही दिवस येईल; ज्यात कंपनीत एकूण पाच लाख ‘एआय’ एजंट काम करीत असतील. ‘एआय’कडे कुठल्या कामाचे दायित्व असेल, कर्मचार्‍यांकडे कुठल्या जबाबदार्‍या असतील, या गोष्टींचा विचार आता केला जाऊ शकतो. ‘एआय’ आणि कर्मचार्‍यांनी एकत्रित येऊन काम केले; तर भविष्य उज्ज्वल आहे, अशी घोषणा चंद्रशेखरन यांनी या सभेत केली.
 
‘एआय’मुळे गेल्या काही वर्षांत भरतीचे प्रमाण कमी झाले, हे खरेच. मात्र, ‘एआय’च्या वापरामुळे नवे आयामदेखील खुले झाले आहेत, हे नाकारुन चालणार नाही. ‘एआय’मुळे अर्थव्यवस्थेत नव्या संधीदेखील चालून येत आहेत. पण, कंपनी नव्याने नोकरभरती करेलच असे नाही. कारण, अशी दैनंदिन कामे ज्यात कमी अनुभवांची आवश्यकता होती, ती कामे आता ‘एआय’वर सुपूर्द करण्यात आली आहेत. अर्थात, ही प्रक्रिया ‘ऑटोमेशन’द्वारे होईल किंवा त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञांची गरज भासेल, हे त्या-त्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.
 
कंपनी आता नोकरभरतीचा फारसा विचार करणार नाही. कारण, त्याचा भार ‘एआय’ एजंटने उचलला आहे. केवळ ‘टीसीएस’च नव्हे, तर अशा अनेक बड्या कंपन्यांनी आता ‘एआय’ यंत्रणा उभी करणे हे प्रामुख्याने धोरण ठेवले आहे. साध्या-सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर ‘टेक’ कंपन्यांना आव्हानांच्या काळात नफ्याचा विचार आधी करायचा आहे. कर्मचार्‍यांच्या पगारावर होणार्‍या खर्चापेक्षा स्वस्त ‘एआय मॉडेल’ उभारणी त्यांना किफायतशीर वाटू लागली आहे. कारण, ती दीर्घकाळ केलेली गुंतवणूकच ठरणार आहे.
 
‘टीसीएस’ कंपनीचा पसारा किती आहे, हे आधी लक्षात घेऊ. ही कंपनी एकूण ५५ देशांत कार्यरत आहे. जगभरात एकूण पाच लाख, ८४ हजार इतका मोठा कर्मचारीवर्ग आणि ५००हून अधिक कार्यालये व डिलिव्हरी सेंटर्स. जगविख्यात बँका, सरकारे, विमा कंपन्या, ‘एफएमसीजी’ कंपन्या असे हजारो ग्राहक त्यांच्याकडे आहेत आणि वार्षिक उलाढाल रु. अडीच लाख कोटींहूनही अधिक. भारतातील खासगी क्षेत्रात सर्वाधिक नोकर्‍या देणारी कंपनी म्हणून तिची ओळख आहे. मात्र, एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी अर्थातच मोठा कर्मचारीवर्ग सतत राबता लागतो. त्यामुळे कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करीत असते.
 
यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनी एक लाख, ३२ हजार इतकी मोठी भरती राबविणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात दोन ते तीन टक्के वाढ झाली आहे. याचा अर्थ तितकासा फटका कर्मचारी भरती किंवा कपातीवर बसलेला नाही. वर नमूद केल्यानुसार, गेल्या दोन वर्षांत अडीच लाख जणांच्या नोकर्‍या ‘एआय’च्या किंवा अन्य कारणास्तव गेल्या जरी असतील, तरीही ‘टीसीएस’सारख्या कंपन्या नव्याने भरती करणे थांबवित नाहीत, हेदेखील तितकेच खरे. मग नेमके या कर्मचार्‍यांनी करायचे काय? या क्षेत्रात राहायचे की नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताना दिसतात.
 
यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘एआय साक्षरता.’ काही वर्षांपूर्वी जेव्हा संगणकयुग अवतरले, तेव्हाही नोकर्‍या जातील, असा बागुलबुवा उभा करण्यात आला. मात्र, स्थिती त्याउलट झाली. ‘एआय’बाबतही तसेच काहीसे होण्याची शक्यता अधिक. जर ‘टीसीएस’च्या अध्यक्षांच्या विधानाचा बारकाईने विचार केला, तर त्यांनी नोकरकपात ही इतकी मोठी नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. ‘पाच लाख कर्मचार्‍यांच्या जोडीला पाच लाख ‘एआय’ एजंट, अशी तरतूद करायला हवी,’ असे त्यांनी म्हटले. याचा अर्थ, या पाच लाखांपैकी कुठल्याही कर्मचार्‍यांची नोकरी धोयात आहे, असे नाही. मात्र, त्यांनी ‘एआय’ साक्षर होण्याचे टाळले; तर त्यांना कोण वाचवणार? ही वस्तुस्थिती नाकारुनही चालणार नाही.
 
केंद्र सरकार ‘एआय फॉर ऑल’द्वारे प्रत्येकाला साक्षर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘एआय’चे शिक्षण अनेक ‘टेक जाएंट’ कंपन्या मोफत देत आहेत. कारण, ज्याप्रकारे संगणक साक्षरतेची गरज होती, तशीच गरज आता ‘एआय’च्या बाबतीत उघडपणे बोलून दाखवली जाऊ लागली आहे. ‘एआय’ सोबत काम करण्याची गरज आता कंपन्यांना वाटू लागली आहे. मुळात ही काही नोकर्‍या संपुष्टात येण्याची घोषणा नाही; तर ‘एआय’ सोबत मिळून प्राथमिक स्वरूपाची कामे ‘एआय’च्या हाती सोपविण्याची ही वेळ आहे. कोडिंग, टेस्टिंग, डॉयुमेंटेशन, डेटा लिनिंग, ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे, अशी अनेक कामे ‘एआय’वर निर्भर होऊन केली जात आहे. पूर्वी ही कामे ‘फ्रेशर्स’ना दिली जात असल्याने त्यांच्या नोकरीचा प्रश्न कायम राहणार आहे. त्यामुळे ‘एआय’ साक्षरतेविना तूर्त पर्याय नाही, अशीच स्थिती सध्यातरी कायम असल्याचे दिसते.




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.