भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करा - आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

    18-Jun-2026
Total Views |
 
Bhandup Water Project Update
 
मुंबई (Bhandup Water Project Update) : भांडुप येथे उभारण्यात येत असलेल्या २,००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पाची कामे निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा वेगाने कामाला लावाव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी दिले. भांडुप संकुलातील प्रकल्पस्थळाची पाहणी करून त्यांनी कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि भविष्यातील वाढत्या गरजांना तोंड देण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
मुंबईला दररोज पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी भांडुप संकुल हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. सध्या कार्यरत असलेला १,९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प सुमारे ४३ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. संरचनात्मकदृष्ट्या तो कमकुवत झाल्याने त्याऐवजी २,००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. जुलै २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणांमधून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी या केंद्रावर आहे.(Bhandup Water Project Update)
 
 
 
पाहणीदरम्यान माती परीक्षण, खोदकाम, वीजवाहक मनोऱ्यांचे स्थलांतर, बॅरिकेडिंग तसेच वृक्षारोपण आदी कामांना वेग देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. स्थापत्य, यांत्रिक, विद्युत आणि उपकरणीयकरणाची कामे समांतरपणे सुरू असून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश भिडे यांनी दिले. वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेता हा प्रकल्प मुंबईच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.(Bhandup Water Project Update)

भांडुप मलजल प्रक्रिया केंद्र ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश
 
याच दौऱ्यात आयुक्तांनी भांडुप येथील २१५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राचीही पाहणी केली. प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबर २०२६ पर्यंत केंद्र पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रकल्पात प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय स्तरावरील मलजल प्रक्रिया करण्यात येणार असून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्योग, उद्याने, बांधकामे आणि इतर बिगर पिण्याच्या गरजांसाठी करता येणार आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे आहे.(Bhandup Water Project Update)
 
 
 
जीएमएलआर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर
 
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३-बी अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात सुरू असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या कामाची तसेच दिंडोशी ते गोरेगाव उड्डाणपुलाच्या बांधकामाचीही भिडे यांनी पाहणी केली. बोगदा खनन यंत्रणेचे सुटे भाग शाफ्टमध्ये जोडण्याचे काम सुरू असून उड्डाणपुलाचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि इतर संसाधनांचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कामाच्या गुणवत्तेबरोबरच सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्यावरही त्यांनी भर दिला.(Bhandup Water Project Update)