पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन एक्प्रेसचा शुभारंभ; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव दाखवणार हिरवा झेंडा

पुणे स्थानकाच्या ४७३ कोटींच्या विस्तार प्रकल्पाचीही पायाभरणी

Total Views |
Pune Sainagar Shirdi Express
 
मुंबई : (Pune Sainagar Shirdi Express) पुणे रेल्वे स्थानकावरून नव्याने सुरू होत असलेल्या पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. पुणे आणि शिर्डी दरम्यानची ही पहिली थेट रेल्वे सेवा असल्याने साईभक्तांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होणार आहे. आज सोमवार, दि. १७ जून रोजी दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग, ६ नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासकामांची पायाभरणीही करण्यात येणार आहे.
 
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती
 
‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक, आयटी आणि औद्योगिक केंद्र आहे. दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे श्री साईबाबांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून देशभरातील लाखो भाविक वर्षभर येथे दर्शनासाठी येतात. नवीन रेल्वे सेवेमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच दोन्ही शहरांतील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत होणार आहेत. या गाडीचे प्रमुख थांबे दौंड , श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर येथे असतील. त्यामुळे स्थानिक प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच पुण्यातील शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे.
 
हेही वाचा : धारावीचा आता एक डिजिटल ट्विन; धारावीची सर्व माहिती या डिजिटल ट्विनमध्ये जतन 
 
पुणे स्थानकाचा ४७३ कोटी रुपयांचा विस्तार प्रकल्प
 
कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री पुणे रेल्वे स्थानकाच्या ४७३ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक विकास प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांतर्गत ७ ते १२ क्रमांकाचे सहा नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार असून विद्यमान प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त रेल्वे मार्ग, आधुनिक सिग्नलिंग व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन प्लॅटफॉर्मवर अत्याधुनिक सुविधा, तिसरे प्रवेशद्वार, नवीन पादचारी पूल, स्कायवॉक आणि कायमस्वरूपी होल्डिंग एरिया विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे स्थानकाची क्षमता वाढून रेल्वे वाहतूक अधिक कार्यक्षम होईल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. तसेच पुणे रेल्वे स्थानकाला भविष्यासाठी सज्ज ‘मेगा टर्मिनल’ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.(Pune Sainagar Shirdi Express)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.