ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार काळाच्या पडद्याआड

    17-Jun-2026   
Total Views |
Prasad Savkar
 
मुंबई : (Prasad Savkar) गोव्याचे प्रसिद्ध नाट्यकर्मी,गायक व कलाकार पद्मश्री प्रसाद सावकार यांचे बुधवार दि. १७ जून रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर आज दि. १८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता पणजी इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचा एक सुवर्णपट कायमचा पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत असून कला, साहित्य आणि नाट्यक्षेत्रामध्ये त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.
 
प्रसाद सावकार यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार. गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात बडोदे (गुजरात) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रघुवीर सावकार (१८९३–१९६१) हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्घ असलेले गायक-नट होते व ते ‘रंगदेवता’ या पदवीने ओळखले जात. वडिलांच्या ‘रंगबोधेच्छु नाट्यसमाज’ (स्था. १९२४) या नाट्यसंस्थेत प्रसाद सावकारांचा बालपणापासूनच वावर असल्याने त्यांच्यावर लहानवयातच नाटक व संगीत यांचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. संशयकल्लोळ नाटकात त्यांनी वडिलांबरोबर कृत्तिकेची भूमिका केली. एवढेच नव्हे, तर ह्याच नाटकात कृत्तिका, साधू, जलशातील गायक व वैशाख शेठ अशा चार भूमिका एकाच वेळी करून त्यांनी एक विक्रमच केला. गोपीनाथ सावकारांच्या ‘कलामंदिर’ संस्थेच्या सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, मानापमान अशा नाटकांतून त्यांनी सुरुवातीला काही भूमिका केल्या, तसेच हौशी रंगभूमीवर करीन ती पूर्व इ. नाटकांतूनही कामे केली.
 
मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेच्या (स्था.१९४१) रंभा (१९५२), कुलवधू, कोणे एके काळी, एक होता म्हातारा या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. लग्नाची बेडी या नाटकातील त्यांची ‘गोकर्णा’ची भूमिका उल्लेखनीय होती. पेडगावचे शहाणे, गोरा कुंभार अशा मोजक्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. १९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. १९६० मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके– पंडितराज जगन्नाथ (प्रथम प्रयोग–९ ऑक्टोबर १९६०) व सुवर्णतुला (प्रथम प्रयोग–१० ऑक्टोबर १९६०)– लागोपाठ रंगभूमीवर आली.(Prasad Savkar)
 
या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले आणि प्रसाद सावकारांनी गायिलेली त्या नाटकांतील पदे संस्मरणीय ठरली. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. या व्यतिरीक्त अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचे बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृतिपुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, गोमंतक मराठी अकादेमीच्या दीनानाथ स्मृतिप्रतिष्ठानतर्फे लता मंगेशकर पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.(Prasad Savkar)
 
 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.