१८ वर्षांनंतर पवई तलाव परिसराचा होणार कायापालट; मेट्रोचे काम पूर्ण होताच पुनर्विकासाला सुरुवात;
सुशोभीकरणानंतर पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारणार
फूड कोर्टचीही सुविधा उपलब्ध होणार
17-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Powai Lake) पवई तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरील आदि शंकराचार्य मार्ग परिसर गेली १८ वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत होता. मेट्रो आणि मलनिस्सारण प्रकल्पांची कामे पूर्ण होताच या परिसराच्या व्यापक पुनर्विकास व सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असून, फूड कोर्टच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पवई तलावाच्या दक्षिण भागात आदि शंकराचार्य मार्गालगत सुमारे १.७५ किलोमीटर लांबीचा वॉकवे विकसित करण्यात आला होता. या मार्गाच्या दोन्ही टोकांना गणेश घाट आणि पवारवाडी विसर्जन घाट आहेत. हा वॉकवे २००८ मध्ये बांधण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्याच्या सुशोभीकरणासाठी किंवा दुरुस्तीसाठी विशेष काम करण्यात आले नव्हते.
मेट्रो लाईन-७ अंतर्गत रामबाग आणि पवई तलाव स्थानकांचे बांधकाम सुरू आहे. या स्थानकांसाठी वॉकवेच्या माध्यमातून जिने आणि एस्केलेटर उभारले जात आहेत. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाअंतर्गत तलावात सांडपाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी वॉकवेखाली मलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे वॉकवेची स्थिती मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे.
स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारीनंतर राज्य सरकारने पवई तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प गांभीर्याने हाती घेतला. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीत तलावालगतच्या महापालिकेच्या भूखंडांच्या विकासाची व्यवहार्यता तपासून स्वयंपूर्ण प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.(Powai Lake)
या निर्देशांनुसार प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी पर्यटकांकडून प्रवेश शुल्क, फूड कोर्ट तसेच इतर सुविधांमधून महसूल मिळविण्याची योजना आखली जाणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि तांत्रिक आराखडा तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सल्लागार म्हणून कार्य केलेल्या एईकॉम कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सल्लागार सेवेवर सुमारे १.७५ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
पवई तलावाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २२३ हेक्टर असून त्याचे जलग्रहण क्षेत्र ६.६१ चौरस किलोमीटर आहे. तलावात विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती, मगरी तसेच अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे. समृद्ध जैवविविधतेमुळे हा परिसर निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे की, पुनर्विकास आणि सुशोभीकरणानंतर पवई तलाव परिसर मुंबईतील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून विकसित होईल आणि येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होईल.(Powai Lake)