बालेकिल्ले ढासळले, उबाठा महाराष्ट्रातून हद्दपार होण्याच्या मार्गावर?

    17-Jun-2026
Total Views |
 
Operation Tiger
 
मुंबई: (Operation Tiger) उबाठात अवघ्या ४ वर्षांत दुसऱ्यांदा झालेल्या फुटीमुळे पक्षाच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कधीकाळी संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून असलेल्या, हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारा हा पक्ष आता राज्याच्या पटलावरुन गायब होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.राज्यात ९ खासदार असलेल्या उबाठाच्या ६ खासदारांच्या बंडानंतर आता केवळ तीनच खासदार राहिले आहेत. तर २० आमदारांपैकी १६ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. (Operation Tiger)
 
विधानसभा निवडणुकीनंतर मोठी पडझड (Operation Tiger)
 
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उबाठाचे ९ खासदार निवडून आले. मविआसोबत रिंगणात उतरलेल्या उबाठाची आणि घटक पक्षांची कामगिरीही चांगली झाली. मात्र त्यानंतर झाीलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाच्या यशावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळाले. २०१९ साली अखंड शिवसेनेने राज्यात भाजपसोबतच्या युतीत ५६ जागा मिळवल्या होत्या. त्या जागा बंडानंतर थेट २० पर्यंत पोहचल्या. केवळ विधानसभा निवडणुकांच्या निकालापर्यंत हा पाढा थांबला नाही मुंबई महापालिकेवर २५ वर्ष असलेली एकहाती सत्ताही उबाठाला गमवावी लागली. उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येऊनही भाजप आणि महायुतीच्या विजयाच्या अश्वमेधाचा वारु थोपवण्यात उबाठा अपयशी ठरली. त्यासोबतच नगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकातही पक्षाची राज्यातून पिछेहाट होत चालल्याचेच पाहायला मिळत आहे. होऊ घातलेल्या विधान परिषद निवडमुकीत तर नेतृत्वाने आदेश देऊनही नाशिकसारख्या मतदारसंघात नेत्यांनी उमेदवारीच दाखल केली नाही. (Operation Tiger)
 
हेही वाचा: ‘ऑपरेशन टायगर’यशस्वी! ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांचा १९ जूनलाच शिंदे सेनेत प्रवेश होणार? 
 
कोकणापाठोपाठ मुंबई आणि आता मराठवाड्यातूनही बेदखल (Operation Tiger)
 
१९६६ साली मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या शिवसेनेने, राम मंदिर आंदोलनाच्या काळात हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आणि भाडजपासोबत राज्यात दमदार कामगिरी करत सत्ताकेंद्र मिळवले. मुंबई, कोकण आणि मराठवाडा हे तिन्ही प्रदेश शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जाऊ लागले. २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांपर्यंत पक्षातून राज ठाकरे, नारायण राणे बाहेर पडले तरी भाजपच्या साथीने शिवसेनेने चांगली कामगिरी केली होती. २०१९ च्या निवडमुकीत मविआच्या प्रयोगात सहभागी होऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद मिळवले खरे, पण तेव्हापासून पक्षाचा ऱ्हास झपाट्याने सुरु झाला. २०२२ साली एकनाथ शिंदेंनी ४० हून अधिक आमदारांसह केलेल्या बंडाने शिवसेनेची महाराष्ट्रातील दहशतच संपुष्टात आणली. (Operation Tiger)
 
त्यानंतर नारायण राणे भाजपसोबत आल्यानंतर कोकणात असलेल्या उबाठाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे एकत्रित काम भाजपाने राणेंच्या आणि शिवसेनेच्या साथीने केले. लोकसभेची जागा गमवावी लागल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील १० आमदारांपैकी केवळ एकाच जागी उबाठाला यश मिळू शकले. (Operation Tiger)
 
मराठवाड्यात २०२४ च्या लोकसभेत तीन जागा मिळवत उबाठाने चांगली कामगिरी केली होती. संविधान बदलाच्या नरेटिव्हमध्ये काँग्रेस आणि उबाठाला आठपैकी सहा जागा मिळवण्यात यश आले. मात्र आता हे तिन्ही खासदार दुसऱ्या फुटीनंतचर शिंदेंच्या गळाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत मराठीवाड्यातील एकूण ४६ जागांपैकी उबाठाला केवळ ३ जागा जिंकता आल्या होत्या. २०१९ साली अखंड शिवसेनेचा हा आकडा १२वर होता. आता झालेल्या बंडानंतर मराठवाड्यातून उबाठा हद्दपार होण्याच्या मार्गावर दिसते आहे. (Operation Tiger)
 
मुंबई महापालिकेत मिळालेले अपयश, कोकणात आणि आता मराठवाड्यातून हद्दपार होत असलेल्या उबाठाचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रभावशाली नसलेल्या उबाठाची मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात ही उतरती कळा सुरु झाली आहे. आगामी काळात उबाठा राज्यव्यापी राहील का, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. (Operation Tiger)
 
हे वाचलात का?:  ठाकरे गटाला मोठा धक्का! ६ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन; पुढचा टप्पा शिंदे सेनेत विलीनीकरणाचा?
 
नेतृत्वाचे अपयश (Operation Tiger)
 
विधानसभा निकालांनतर उबाठाच्या नेत्यांनी मुंबई सोडता महाराष्ट्राकडे केलेले दुर्लक्ष हे यासाठी महत्त्वाचे कारण असल्याचे मानण्यात येते आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतील नेतृत्वाला बळ देण्यात, त्यांच्याशी संवाद साधण्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे पक्षावर ही वेळ ओढावल्याचे मानण्यात येते आहे. महापालिका निवडणुकांसह, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दोन्ही नेते राज्यात फिरलेच नसल्याने त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. यातून नेतृत्वाशी संवाद होत नसल्याची खंत नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली. यातूनच पक्षात हे नवे बंड उभे राहिल्याचे मानण्यात येते आहे. (Operation Tiger)