जलाशयांतील पाणीसाठा घटल्याने बांधकामे आणि जलतरण तलावांना पाणीपुरवठा बंद; व्यावसायिक वापरावरही निर्बंध
17-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Water Stock) मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या सात तलावांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या केवळ 10.35 टक्क्यांवर आला असून, मान्सून अद्याप पूर्णपणे सक्रिय न झाल्याने महानगरपालिकेने मंगळवारी कठोर जलसंवर्धन उपायांची घोषणा केली. त्यानुसार बांधकाम प्रकल्प आणि जलतरण तलावांना दिला जाणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात येणार असून, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे.
हे निर्बंध 17 जूनपासून लागू होणार असून, 15 मेपासून लागू असलेल्या शहरव्यापी 10 टक्के पाणीकपातीव्यतिरिक्त ही अतिरिक्त उपाययोजना असेल.
महापालिका मुख्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत जलसाठ्याच्या स्थितीचा आढावा घेऊन उपलब्ध पाणीसाठा मान्सून जोर धरून तलाव भरून येईपर्यंत पुरेल यासाठी उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार बांधकाम प्रकल्पांना देण्यात आलेले सर्व पाणी जोडणी तात्पुरती बंद करण्यात येणार असून, पुढील आदेशापर्यंत नव्या बांधकामांसाठी कोणतीही नवीन पाणी जोडणी मंजूर केली जाणार नाही. तसेच सर्व जलतरण तलावांनाही पाणीपुरवठा थांबविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या निवेदनानुसार, क्रीडा क्लबांसह औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांना मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात येईल. याशिवाय, तलावांमधील जलस्तर सुधारत नाही तोपर्यंत अतिरिक्त किंवा सुधारित पाणी जोडण्यांसाठीचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात येतील.
एरेटेड पेये आणि पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या बाटलीकरण प्रकल्पांना होणारा पाणीपुरवठाही मर्यादित करण्यात येणार असून, तो केवळ कर्मचाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांपुरताच ठेवला जाईल.
मुंबईला सध्या दररोज सुमारे 4,664 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असते. मात्र सात तलावांतून सरासरी 4,100 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. एल निनोच्या परिणामामुळे मान्सूनच्या पावसाला झालेल्या विलंबामुळे उपलब्ध पाणीसाठा सातत्याने घटत असल्याने महापालिकेला जलसंवर्धनासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागत आहेत.
महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृह चालकांना शक्य तेथे टँकर किंवा विहिरींचे पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहन धुणे, बागांना पाणी देणे आणि रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यांसारख्या पिण्यायोग्य नसलेल्या कामांसाठी विहीर किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याचा सल्ला नागरिकांना व संस्थांना देण्यात आला आहे.
पालिकेने मध्य आणि पश्चिम रेल्वे, आरसीएफ, एचपीसीएल, बीपीसीएल, भारतीय नौदल, एमआयडीसी आणि मुंबई पोर्ट प्राधिकरण यांसारख्या प्रमुख संस्थांना त्यांच्या कार्यकारी गरजांसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पाण्याची नासाडी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देत महापालिकेने नागरिकांना मान्सून सुरू होऊन तलाव भरून येईपर्यंत उपलब्ध जलसंपत्ती जपण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.(Water Stock)
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव प्रामुख्याने शहराबाहेर आहेत. याशिवाय मुंबईतील पवई तलावातून केवळ औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा केला जातो. 545 कोटी लिटर साठवण क्षमता असलेल्या या तलावातील पाणी मानवी वापरासाठी योग्य नसून ते प्रामुख्याने औद्योगिक कामांसाठी आणि आरे डेअरी परिसरातील अपेय वापरासाठी वापरले जाते. तलाव पूर्ण भरल्यानंतर त्याचे पाणी मिठी नदीत सोडले जाते.
तलावांतील जलस्तर सुधारत नाही तोपर्यंत अतिरिक्त किंवा सुधारित पाणी जोडण्यांचे अर्ज प्रलंबित ठेवले जातील.
एरेटेड पेये व पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांना कर्मचाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यापुरताच मर्यादित पाणीपुरवठा केला जाईल.
16 जून रोजीचा पाणीसाठा
2026 : 1.49 लाख दशलक्ष लिटर (10.35%)
2025 : 1.24 लाख दशलक्ष लिटर (8.60%)
2024 : 78 हजार दशलक्ष लिटर (5.42%)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची एकूण क्षमता : 14.47 लाख दशलक्ष लिटर (100%)(Water Stock)