बचतगटांना मिळणार एक हेक्टर जमीन; महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी महसुल विभागाचा निर्णय; एक लाख रुपयांचे अनुदानही देणार

    17-Jun-2026   
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) राज्यातील महिला बचत गट आणि महिला सहकारी संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महिला बचत गटांना रोजगारनिर्मितीसाठी महसूल विभागाची एक हेक्टर (अडीच एकर) जमीन पाच वर्षांच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्यात येणार आहे. तसेच या गटांना खनिकर्म निधीतून एक लाख रुपयांचे अनुदानही उपलब्ध करून दिले जाणार आहे. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “राज्यातील महिला बचत गट आणि महिलांच्या कोऑपरेटिव्ह संस्थांना रोजगारनिर्मिती करण्यासाठी एका बचत गटाला एक हेक्टर (अडीच एकर) महसुल विभागाची जागा ५ वर्षांच्या लीजवर देणार आहोत. तसेच या बचत गटांना खनिकर्म निधीतून एक लक्ष रुपयांचे अनुदान देणार आहोत. या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना दिलेल्या जमिनीवर चारा किंवा बांबू लागवड करून गवताळ क्षेत्र विकसित करता येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक बचत गटाला दरवर्षी सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असून हे संपूर्ण उत्पन्न संबंधित बचत गटांकडेच राहणार आहे.”
 
ते पुढे म्हणाले की, "महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे एका बचत गटातील किमान दहा महिलांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. महसुल खात्याच्या जमिनी पडीत राहू नये, त्यावर अतिक्रमण होऊ नये, तसेच महिला बचत गटांना रोजगार देण्याच्या उद्देशाने सरकारने हे धोरण आणले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी रोजगारनिर्मितीचा एक मोठा संकल्प केला होता. त्या संकल्पाला आम्ही आता पुढे नेत आहोत आणि राज्यातील महिला बचत गटांना तसेच महिलांच्या को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांना हा प्रकल्प देत आहोत. तांत्रिक मदत आमचा कृषी विभाग देणार आहे. तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली हे बचत गट काम करणार आहेत. या बचत गटांचे संपूर्ण मॉनिटरिंग करण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये महिला अध्यक्ष असतील."
 
निधी कसा उपलब्ध होणार?
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "निधीबाबत सांगायचे झाल्यास, ज्या प्रकारे नागपूर जिल्ह्यात यावर्षी आम्ही २ हजार २०० महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये दिले आहेत, म्हणजे एकूण २२ कोटी रुपये महिला बचत गटांना देण्यात आले आहेत. त्यासाठी काही निधी मायनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, चारा पॉलिसी आणि बांबू लागवडीसाठीही आम्ही निधी उपलब्ध करून देणार आहोत. आमच्याकडे महसूल विभागाच्या मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. ज्या जमिनी सध्या पडीत आहेत आणि पुढील २० वर्षांत कोणत्याही प्रकल्पासाठी वापरात येण्याची शक्यता नाही, अशा जमिनी आम्ही महिला बचत गटांना देणार आहोत."(Chandrashekhar Bawankule)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....