शिवसेना पुन्हा पक्ष फुटीच्या वाटेवर; इतिहासाची पुनरावृत्ती होणार का ?

उबाठा गटात अंतर्गत भूकंपाचे संकेत

    17-Jun-2026
Total Views |
Operation Tiger
 
मुंबई : (Operation Tiger) "माझा लढा विठ्ठलाशी नाही तर त्याभोवतीच्या बडव्यांशी आहे." हे वाक्य होते २००५ साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या राज ठाकरे यांचे. आता हे वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे ऑपरेशन टायगर निमित्त उबाठामध्ये झालेली खासदारांची फूट.एकीकडे ऑपरेशन टायगर अंतर्गत उबाठा गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असे निश्चित झाले असताना. अशी फूट पहिल्यांदा झालेली नाही. १९९१ पासून ते २०२२ छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे ,आणि एकनाथ शिंदे यासारख्या दिग्गज नेत्यांनी यापूर्वीसुद्धा सेनेत बंड केले होते. हे सर्व कर्तुत्ववान तसेच जनतेचा पाठिंबा असलेले व मास लीडर प्रकारात मोडणारे शिवसेनेतील लोकप्रिय नेते होते. पण त्यांना काही किचन कॅबिनेट प्रकारातील नेत्यांमुळे सेना सोडावी लागली.
 
एकनाथ शिंदे यांनी तर शिवसेनेवरच दावा करून चिन्ह आणि पक्ष मिळवला.आता देखील हाच प्रकार पाहायला मिळत आहे.कारण ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांनी पक्ष नेतृत्वापर्यंत आमचे म्हणणे पोचवले जात नाही.तसेच आम्हाला पक्ष नेतृत्वाची भेट घेऊ दिली जात नाही असे आरोप अप्रत्यक्षरीत्या केले आहेत.शिवसेनेचे पहिले शाखाप्रमुख ते दोनदा महापौर आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही शिवसेनेच्या अंतर्गत वादातून सेनेस जय महाराष्ट्र केला होता.
 
त्यावेळी ३६ आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असताना १२ आमदार छगन भुजबळ यांच्यासोबत सेनेतून बाहेर पडले होते.बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे नारायण राणे यांनी देखील २००५ साली शिवसेना सोडली तेव्हा शिवसेनेतील नवीन नेतृत्वावर जोरदार टीका केली होती. मी शिवसेना सोडेन असे मला कधीच वाटलं नव्हतं असे वक्तव्य त्या काळात नारायण राणे यांनी केले होते.(Operation Tiger)
 
शिवसेनेतील दोन नेत्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान केली. त्यामुळे मला महाराष्ट्रात फिरताना, काम करताना त्रास होऊ लागला आणि मी सहा पानी पत्र बाळासाहेबांना लिहिले होते असे सुद्धा राणे म्हणाले होते. पण शिवसेनेतून राज ठाकरे यांचे बाहेर पडणे हे सर्वात धक्कादायक मानले जाते. कारण त्यांचा आडनाव ठाकरे होतं आणि बाळासाहेब ठाकरेंची उभेऊभ छबी ,वक्तृत्व शैली असल्याने त्यांच्याकडे भविष्यातील शिवसेनेच नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. "मला मिठी मारून बाळासाहेब म्हणाले होते आता जा." अशी आठवण राज ठाकरेंनी मागे एकदा सांगितली होती. १९८९ साली विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असलेले राज ठाकरे आणि त्यानंतर दोन वर्षांनी उद्धव ठाकरे यांचे राजकारणात झालेले आगमन हा निव्वळ योगायोग न्हवता.
 
तर राज ठाकरे यांच्या अपरिहार्यपणे पक्ष सोडण्यास झालेली सुरुवात होती. १९९५ साली तर महायुतीची सत्ता आल्यानंतर काही मंत्र्यांनी आपल्या दालनात राज ठाकरे यांचे फोटो लावले होते ते सुद्धा काढावेत असे आदेश तेव्हा देण्यात आले होते.शेवटी नोव्हेंबर २००५ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा दिला होता. एकेकाळी गटप्रमुख असलेले आणि १९९२ साली मातोश्रीवर गेलेले मिलिंद नार्वेकर हे सध्या उबाठा मधील एक मोठे नेते झाले आहेत.तर सध्या संजय राऊत देखील सगळ्यात जास्त भूमिका मांडत असतात. एकूणच शिवसेनेतील रस्त्यावर उतरून काम करणारा, लोकांच्यात मिसळणारा नेता हळूहळू बाजूला पडत गेला आणि यातूनच शिवसेनेत मोठी फूट पडत गेली. १९९२ ते २०२६ या फुटीमध्ये सगळ्यात जास्त कारण ठरलं आहे ते राज ठाकरे यांच्या वाक्यात सांगायचे झाले तर विठ्ठलाच्या भोवतीचे बडवे आणि पक्ष प्रमुखाची कार्यकर्त्यांशी तुटलेली नाळ(Operation Tiger)