सामान्य प्रशासन विभागाचे विभाजन; माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग

    17-Jun-2026   
Total Views |
Government of Maharashtra
 
मुंबई : (Government of Maharashtra) सामान्य प्रशासन विभागातून माहिती व जनसंपर्क आणि राजशिष्टाचार असे दोन स्वतंत्र विभाग नव्याने निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता राज्याच्या ३३ प्रशासकीय विभागांच्या विभाजन- समावेशनानंतर आता स्वतंत्र असे ४६ विभाग अस्तित्वात येणार आहेत.
 
सध्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सामान्य प्रशासन विभागातंर्गत कार्यरत आहे. स्वतंत्र विभाग निर्मितीमुळे निर्णय प्रक्रीयेत आणि कामकाजात गतीमानता येणार आहे. मुंबईतील मंत्रालयांतील विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता यावी दृष्टीने मागील मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय विभागांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती.
 
त्यानुसार ३३ विभागांची पुनर्रचना करून, ४५ विभाग करण्यास मान्यता देण्यात आली होती. आता त्यांची संख्या ४६ झाली आहे. या विभागांच्या पुनर्रचना आणि विभाजन- समावेशनामुळे एकंदर कामकाजात सुसूत्रता येणार आहे. तसेच निर्णय प्रक्रीया गतीने राबविता येणे शक्य होणार आहे.
 
नवीन विभाग पुढीलप्रमाणे
 
कृषि व पदुम विभागाचे विभाजन करुन कृषि विभाग आणि पदुम विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन स्वतंत्र सहकार विभाग, पणन विभाग आणि वस्त्रोद्योग विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. सामान्य प्रशासन विभागातून राजशिष्टाचार व माहिती व जनसंपर्क हे दोन उप विभाग वेगळे करुन राजशिष्टाचार विभाग व माहिती व जनसंपर्क विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. गृह विभागातून स्वतंत्र परिवहन विभाग. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे विभाजन करुन उद्योग व खनिकर्म विभाग, ऊर्जा विभाग आणि कामगार विभाग असे तीन स्वतंत्र विभाग.
 
महसूल व वन विभागाचे विभाजन करुन महसूल विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि वन विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. पूर्वी ‘भूसंपादन’ हा विषय वन विभागाकडे होता. आता तो महसूल विभागाकडे राहील. तसेच ‘नोंदणी व मुद्रांक शुल्क’ हा विषय पूर्वीप्रमाणे महसूल विभागाकडेच राहील.
 
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विभाजन करुन शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे विभाजन करुन सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन असे दोन स्वतंत्र विभाग. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे विभाजन करुन स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग. तसेच नियोजन विभागातून रोजगार हमी योजना विभाग वगळून त्याचा समावेश मृद व जलसंधारण विभागामध्ये करण्यात येणार.(Government of Maharashtra)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....